काकडीचे सांदण
साहित्य
- तांदळाचा रवा – चार वाट्या
- चिरलेला गूळ – तीन वाट्या
- चांगली जून काकडी – एक किलो
- वेलदोडे – दहा-बारा
- तूप – पाव वाटी
- खोवलेले ओले खोबरे – एक वाटी
- मीठ – चवीनुसार
- सोडा – पाव चमचा
कृती
- काकडी कापून, त्यातील बिया काढून टाकून, ती बारीक किसणीने किसावी.
- तांदळाचा रवा तुपावर चांगला खमंग भाजून घ्यावा.
- नंतर एका पातेल्यात तूप टाकून काकडीचा किस घालावा. तसेच, चवीकरता मीठ घालावे.
- गूळ चिरून त्यात घालावा. थोड्या वेळाने त्यास पाणी सुटेल.
- नंतर भाजलेल्या तांदळाचा रवा, ओले खोबरे आणि वेलदोड्यांची पूड त्यात घालावी.
- पाव चमचा सोडा घालावा.
- चमच्याने हातावर पडेल, इतपत मिश्रण पातळ असावे. जरूर लागल्यास थोडे पाणी घालावे.
- नंतर त्यावर कर्दळीची अगर हळदीची पाने घालून आणि झाकण ठेवून पातेले विस्तवावर ठेवावे. झाकणावर थोडे निखारे घालावेत.
- काकडीचे सांदण पूर्ण शिजावयास साधारणपणे एक तास लागेल.
- शिजून झाल्यावर वड्या कापाव्यात. रात्री करून ठेवल्यास दुसऱ्या दिवशी खाण्यास जास्त चांगले लागेल.
हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!
टीप्स
- हे मिश्रण पातेल्यात घालून विस्तवावर ठेवण्याऐवजी ते एका भांड्यात घालून, भांडे मोदकपात्रात ठेवून, सांदण उकडून घेण्यासही हरकत नाही.
- काकडीच्या सांदणाप्रमाणे फणसाचे तसेच पिकलेल्या आंब्याचे सांदण करतात.
- सांदणाकरिता बरका फणस पाहिजे. गरे आणि आंब्याचा रस चाळणीवर गाळून घ्यावा.
घावन
साहित्य
- काकडीचा किस – दोन वाट्या
- कणीक – तीन वाट्या
- तांदळाचे पीठ – एक वाटी
- गूळ किंवा साखर – दोन वाट्या
- मीठ – चवीनुसार
- तेल – दोन पळी
कृती
- काकडीचा किस घेऊन त्यात गूळ अगर साखर आणि चवीपुरते मीठ घालून तो शिजवावा.
- शिजल्यावर गरम असताना त्यात तांदळाचे पीठ घालावे आणि ढवळून झाकण घालून ठेवून द्यावे.
- गार झाल्यावर त्यात कणीक घालावी आणि पीठ फार पातळ होणार नाही, या बेताने पाणी घालून चांगले कालवावे.
- नंतर तव्यावर तेल टाकून त्यावर पीठ घालून घावन करावेत.
हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…
टीप्स
- काकडी न घालता नुसती कणीक आणि तांदळाचे पीठ घालूनही घावन होतात.
- काकडीऐवजी लाल भोपळ्याचा अगर दूधीभोपळ्याचा कीस घालूनही घावन चांगले होतात.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


