स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये स्वादिष्ट केक, घरगुती चॉकलेट्स अन् खमंग चकली बनविण्याच्या टिप्स पाहुयात.
- चार चांगले पिकलेले टोमॅटो, दोन वाट्या डाळीचे पीठ, एक वाटी तांदळाचे पीठ, मीठ, तिखट, धणेपूड, जिरेपूड, कोथिंबीर, मीठ, तेल हे सर्व साहित्य मिसळून घ्यावे. हे मिश्रण सरसरीत भिजवावे आणि तासभर झाकून ठेवावे. नंतर गॅसवर पसरट तवा ठेवून ते मिश्रण पळीने नीट तव्यावर टाकावे आणि पातळ पसरावे. दोन मिनिटे झाकून ठेवावे. वाफ आल्यावर उतरवावे. तिखट चटणीबरोबर हा पदार्थ रुचकर लागतो.
- बहुतेक प्रकारच्या चकल्या करताना तांदूळ वापरला जातो. सर्व धान्ये धुतली नाहीत तरी तांदूळ धुऊन वाळवावेत आणि नंतर सर्व धान्ये एकत्र दळावीत. तांदूळ धुऊन एक तास पाण्यात भिजत ठेवावेत आणि या पाण्यात तुरटी फिरवावी. नंतर तांदूळ निथळून, वाळवून दळावेत. अशा प्रकारे केलेली चकली अतिशय हलकी होते.
हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी…
- दर वेळेस विकतची चॉकलेट आणण्याऐवजी हे सोपं चॉकलेट घरी बनवून बघा. पाव किलो टोमॅटोचा मिक्सरवर रस काढून गाळून घ्यावा. रसापेक्षा थोडी कमी साखर घालून मंद गॅसवर आटवावे. खवा असल्यास थोडा खवा अथवा आटत आल्यावर थोडीशीच पिठीसाखर घालून चॉकलेट-गोळ्यांचे आकार द्यावेत. टोमॅटोच्या रंगामुळे अगदी चॉकलेटसारखी दिसणारी आणि किंचित आंबटगोड चॉकलेटं तयार होतात. पाव किलो टोमॅटोची पंधरा-वीस चॉकलेटं होतात. कुठलाही कृत्रिम रंग वा स्वाद लागत नाही.
- केकसाठी आयसिंग करताना जर आयसिंग जास्त पातळ झाले, तर नक्षी चांगली येत नाही. त्यासाठी आयसिंगमध्ये थोडे कॉर्नफ्लोअर मिसळावे किंवा घरच्या घरी आयसिंग शुगर तयार करावी. ती अगदी कमी वेळात आणि अल्प किमतीत तयार होते. पाव किलो पिठीसाखरेत, (पिठीसाखर घरी मिक्सरमध्ये करावी. बाजारच्या पिठीसारखेत खूप कचरा असतो.) साधारण एक ते सव्वा टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालून पिठीच्या चाळणीने 3 ते 4 वेळा चाळावे म्हणजे मिश्रण चांगले एकजीव होते.
हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा
- केकच्या मिश्रणात अंड्यातील पिवळा आणि पांढरा भाग एकत्र न घालता पांढरा भाग शेवटी घालावा. हे मिश्रण निर्लेप सॉस पॅनमध्ये घालून गॅसवर ठेवावे. पॅनखाली पोळीचा सपाट तवा ठेवावा. गॅस मंद ठेवा. एक तासाने केक छान फुलून येतो. निर्लेप पॅनमुळे केक चिकटत नाही. शिवाय भांड्याला तूपही फारसे लावावे लागत नाही.


