मागील लेखात आपण सुखनिद्रेचा अर्थ समजावून घेतला आणि तद्नंतर सुखनिद्रेचे फायदे देखील जाणून घेतले. या लेखात आपण सुखनिद्रेच्या निवडक उपयुक्त उपायांबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी, आपण ‘निद्रेसंबंधित समस्या’ याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि साहजिकच परिणामी उशिरा झोपायला जाणे, ही सवय हळूहळू रूढ होत चालली आहे. अशी सवय खरोखरच चुकीची आणि वाईट असून आपल्या शारीरिक तथा मानसिक आरोग्याला हानिकारक आहे. जागरणाप्रमाणे अनिद्रा / निद्रानाश देखील गंभीर समस्या बनली असून बर्याच जणांना काही ना काही कारणास्तव ही समस्या भेडसावत असल्याचे दिसून येते. झोपायचे म्हटले तरी, झोप येत नाही, या स्थितीला आयुर्वेदाच्या भाषेत निद्रानाश म्हणतात. अनिद्रा / निद्रानाश याची नानाविध कारणे असू शकतात, तथापि ‘मानसिक ताणतणाव’ हे प्रमुख कारण होय. तणावग्रस्त परिस्थितीत व्यक्तीला झोप येत नाही अथवा झोपल्यावर अधूनमधून जाग येते, परिणामी झोप अपुरी होते आणि शरीर-मनाला अपेक्षित आराम मिळत नाही.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सकाळी लवकर उठावे
जागरण, निद्रानाश तसेच इतर झोपेसंबंधित तत्सम समस्यांचे व्यक्तीच्या शरीर-मनावर विपरीत परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर सुखनिद्रेची महती पुनश्च अधोरेखित होते.
सुखनिद्रेसाठी निवडक उपयुक्त उपाय
आता आपण सुखनिद्रेचे आरोग्य लाभ घेण्यासाठी निवडक उपयुक्त उपायांबाबत विचार करूयात.
- रात्रीचे जेवण आणि झोप यात किमान दोन तास अंतर असावे.
- झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने धुऊन पुसून कोरडे करावेत.
- झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेलाने मालीश करावे.
- झोपण्यापूर्वी तळपायांना गाईचे तूप लावून चोळावे.
- झोपायच्या वेळेस मन तणावरहित आणि आनंदी ठेवावे. असे केल्यास शांत झोप लागण्यास सहाय्य मिळते.
महत्त्वाची बाब म्हणजे, सुखनिद्रा या संकल्पनेत रात्रीची झोप अभिप्रेत आहे. लवकर झोपावे आणि लवकर उठावे, या पद्धतीच्या दिनचर्येचा अवलंब करताना दुपारी झोपणे अजिबात अपेक्षित नाही. कारण, दुपारी झोप घेतल्यास रात्री लवकर झोप लागणार नाही आणि असे झाल्यास लवकर उठणे कठीण होईल. म्हणूनच दिवसा झोपू नये. परंतु याबाबतीत अपवाद म्हणून आजारी व्यक्ती तसेच वयोवृद्ध व्यक्ती दुपारी थोडी विश्रांती घेऊ शकतात.
तसेच, झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात, परंतु असे करणे अनारोग्यास आमंत्रणच आहे. शिवाय, गोळ्या घेण्याची सवय लागल्यास ती आरोग्यास घातक ठरू शकते. म्हणून झोपेसाठी गोळ्या घेणे कटाक्षाने टाळले पाहिजे.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : रात्री झोपण्याची वेळ महत्त्वाची
झोप नैसर्गिक असून शरीर-मनाला संपूर्ण विश्रांती देण्याची ही सर्वोत्तम प्रक्रिया आहे… आणि म्हणूनच झोपेचे सुखनिद्रेत रुपांतर करण्यासाठी आपण विविध उपयुक्त उपायांचा अवलंब करायला पाहिजे.
सुखनिद्रा ही आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग होणे नितांत आवश्यक आहे आणि सततच्या सवयीने हे नक्कीच सहजशक्य आहे. अर्थातच, असे झाल्यास आपल्याला सुखनिद्रेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ अनुभवता येतील.
निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या आहार-विहार व मानसिक आरोग्य या पुस्तकांत ‘आरोग्यदायी विहार’ आणि ‘निसर्गसुसंगत दिनचर्या’ या विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
क्रमशः


