अलीकडचीच गोष्ट. संध्याकाळी, गाडीत माझ्या समोरच एक बाई बसल्या होत्या. हल्ली पुरुषांचा प्रथम वर्गाचा डबा, अर्धा अधिक बायकांनीच व्यापलेला असतो. या बायका एकदा मुंबईला किंवा दादरला बसल्या की, थेट डोंबिवलीपर्यंत बूड हलवित नाहीत, हा नेहमीचाच अनुभव.
परवा माझ्या नशिबाने मला बसायला जागा मिळाली आणि समोरची मध्यमवयीन महिला, नेहमीप्रमाणेच भ्रमणध्वनीत गुंतलेली आणि गुंगलेली. एकंदरीत, नक्कीच सरकारी कर्मचारी असावी, हा माझा तर्क. गाडी सुटली आणि बाईंचा दूरध्वनी वाजला. कोण होतं पलीकडे कोणास ठाऊक… पण तिच्याच कार्यालयातली कोणीतरी सहकारी असावी, असा माझा आपला कयास.
तावातावाने बोलणं सुरू झालं…
“हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. वरिष्ठ काय सांगतात ते ऐकलंच पाहिजे, एक स्त्री आहात म्हणून तुम्ही उल्लंघन करणार का आदेशांचं? वरिष्ठांचा आदेश आला की, त्याचं पालन करणं हे बंधनकारक असायला हवं ना? शासकीय आदेश सगळ्यांनी पाळायलाच हवेत ना?”
“आपल्याला वेतन याच गोष्टींचं मिळतं, मग त्या वेतनाशी अनुरूप असं काम करायला नको का आपण? किती आढ्यता दाखवायची माणसानं, म्हणते मी!”
हेही वाचा – दिनचर्या… तिची अन् त्याची!
“कितीही शासन परिपत्रकं काढा, पुरवण्या जोडा, काही लोकांना त्याचं काही पडलेलं नसतं. आमच्यासारखे प्रामाणिक चाकर मात्र उगाचच भरडले जातात. आता हेच बघा ना, बैठकांना उपस्थिती अनिवार्य असताना, या खुशाल काहीतरी कारण सांगून अनुपस्थित राहतात आणि आदेश कचऱ्याच्या पेटीतच जातात. बैठकीच्या नोंदी मात्र यांना हव्या असतात लगेच. किती दुटप्पीपणा!”
“वरिष्ठपण हल्ली काही बोलू धजत नाहीत. लगेच संघटनेचे नेते येऊन प्रतिप्रश्न करतात. काम तरी कसं करावं अशा यंत्रणेत?”
काहीतरी कार्यालयीन कुचाळक्या सुरू होत्या आणि त्यात वापरल्या गेलेल्या शब्दांनी माझं लक्ष वेधून घेतलं. महिला नक्कीच महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असणार!
हेही वाचा – एका केरसुणीची कहाणी…
बोली भाषेत हल्ली असे शुद्ध आणि सात्विक मराठी शब्द कानावर पडतच नाहीत. इंग्रजी शब्दांच्या अतिक्रमणाशिवाय हल्ली आपलं वाक्य पूर्ण होतंच नाही, हीच तर आजची वास्तविकता आणि अगतिकता!
बापरे, दम लागला मला!
आज लिहिताना, एकही इंग्रजी शब्द न वापरण्याचा पण केला होता मी आणि काय सांगू, मी चक्क यशस्वी झालोय, दमछाक झाली तरी… त्या महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या महिलेने दिली मला प्रेरणा…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


