वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचें । जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥243॥ इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥244॥ मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिवसितां न दिसे ॥245॥ बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणी उरे । तोही शक्तिसवें संचरे । मध्यमेमाजी ॥246॥ तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं ॥247॥ तेणें नातकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥248॥ तातलिये मुसे । मेण निघोनि जाय जैसें । कोंदली राहे रसें । वोतलेनि ॥249॥ तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरें । पांगुरली असे ॥250॥ जैसी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरूं नये ॥251॥ तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥252॥ मग काश्मीराचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीची भांब | तैसी दिसे ॥253॥ नातरी संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग । की अंतर्जोतीचें लिंग । निर्वाळिलें ॥254॥ कुंकुमाचे भरींव । सिद्धरसांचे वोतींव । मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥255॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तेथ नक्षत्र जैसें उलंडलें, कीं सूर्याचें आसन मोडलें…
अर्थ
नाड्यांचे वाहणे बंद पडते आणि (स्थानभेदाने असणारे) वायूचे नऊ प्रकार नाहीसे होतात, म्हणून शरीराचे धर्म राहात नाहीत. ॥243॥ इडा आणि पिंगळा या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गांठी सुटून चक्रांचेही पदर फुटतात. ॥244॥ अनुमानिक कल्पनेने ठरविलेले डाव्या आणि उजव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्रसूर्यरूपी वायू, नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी, दिसत नाहीत. ॥245॥ बुद्धीचा आकार (चैतन्यात) नाहीसा होतो. नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ती, ती कुंडलिनीबरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. ॥246॥ तेव्हा वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते. ॥247॥ त्या नळीने (कुंडलिनीने) रस भरतो, तो सर्वांगामध्ये संचार करतो आणि प्राणवायू जेथल्या तेथे मुरतो. ॥248॥ तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन, ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून राहाते ॥249॥ त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काय त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजच प्रकट झालेले असते. ॥250॥ सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही, ॥251॥ त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. ॥252॥ मग जणू काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेले अंकुरच की काय, अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. ॥253॥ अथवा संध्याकाळच्या आकाशरंगाचे रंग काढून बनवलेली मूर्ती किंवा प्रत्यक्ष आत्म्याचे शुद्ध लिंगच ॥254॥ केशराने पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले, अथवा ते पहाताना मला असे वाटते की, ती मूर्तिमंत शांतीच आहे. ॥255॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मग सप्तधातूंचां सागरीं, ताहानेली घोट भरी…


