Wednesday, February 18, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari :  युक्ति योगाचें आंग पावे, ऐसें प्रयाग जें होय बरवें…

Dnyaneshwari :  युक्ति योगाचें आंग पावे, ऐसें प्रयाग जें होय बरवें…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

मग म्हणे गा पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥344॥

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।  न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥16॥

जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला । तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ॥345॥ अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारुनियां ॥346॥ निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ॥347॥ म्हणोनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोध न व्हावा । कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको ॥348॥

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥17॥

आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजे । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥349॥ मपितलां बोलीं बोलिजे । मितलां पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥350॥ जागणें जरी जाहलें । तरी व्हावें तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सुखें ॥351॥ ऐसें युक्तिचेनि हातें । जैं इंद्रियां वोपिजे भातें । तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ॥352॥

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते । निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥18॥

बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंत सुख वाढे । तेथें सहजचि योगु घडे । नाभ्यासितां ॥353॥ जैसें भाग्याचिये भडसें । उद्यमाचेनि मिसें । मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥354॥ तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥355॥ म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकरिजे ॥356॥

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता । योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥19॥

युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग जें होय बरवें । तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥357॥ तयातें योगयुक्त म्हण । हेंही प्रसंगें जाण । तें दीपाचें उपलक्षण । निर्वातींचिया ॥358॥

हेही वाचा – Dnyaneshwari : परब्रह्माचेनि रसें, देहाकृतीचिये मुसे…

अर्थ

मग देव पुढे म्हणतात, अर्जुना, त्याचा असा नियम आहे की, जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाही. ॥344॥

पण हे अर्जुना, अति खाणारा, (अथवा) अगदीच न खाणारा (किंवा) अतिझोप घेणारा (अथवा) मुळीच झोप न घेणारा असा (जो असेल) त्याला योग प्राप्त होणार नाही. ॥16॥

जो जिव्हेच्या आधीन आहे किंवा झोपेला जीवापासून वाहिलेला आहे, तो योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही. ॥345॥ अथवा जो हट्टाच्या बंधनाने भूक आणि तहान कोंडतो तसेच भुकेला मारून आहार तोडतो ॥346॥ आणि जो निद्रेच्या वाट्यास जात नाही, याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो, त्याचे ते शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही, तर मग योग कोण करणार? ॥347॥ म्हणून विषयांचे अतिसेवन करावे, अशी विरोधी बुद्धी नसावी. किंवा वाजवीपेक्षा फाजिल नियमन करणे, हेही कामाचे नाही. ॥348॥

ज्याचे खाणे आणि हिंडणे परिमित आहे. जो सर्व कर्म मापून करतो, ज्याच्या निद्रा आणि जागर परिमित आहेत, त्याला (हा) योग (संसाररूपी) दु:खाचा नाश करणारा होतो. ॥17॥

अन्न तर सेवन करावे, परंतु नियमाच्या मापाने मोजलेले असावे. त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात. ॥349॥ मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे आणि एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. ॥350॥ जागावयाचे झाले तरी तेही परिमितच असावे. एवढ्याने अनायासे कफवातादि सर्व धातूंची समता राहिल. ॥351॥ अशा नियमितपणाने इंद्रियांना विषय दिले असता मनच संतोषाला वाढवते. ॥352॥

जेव्हा नियमन केलेले असे चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावते, (आणि जेव्हा) सर्व प्रकारच्या इच्छांविषयी (साधक) निरिच्छ होतो, तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असे म्हणतात ॥18॥

बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि मग अंत:करणात सुख वाढते. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता, योगाचा अभ्यास सहजच होतो. ॥353॥ ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला असता, मग उद्योगाचे निमित्त होते; नंतर सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येतात; ॥354॥ त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ज्यावेळेस लीलेने आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवतो, त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्तीरूपाने पिकतो. ॥355॥ म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो, तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो. ॥356॥

निवाऱ्याच्या जागी असलेला दिवा ज्याप्रमाणे हालत नाही, तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या आणि आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योगी मनुष्यासंबंधाने जाणावी. ॥19॥

नियम आणि योग ज्यावेळी एकत्र होतात आणि असा दोघींचा प्रयागरूप चांगला संगम जेथे होतो, त्या ठिकाणी ज्याचे मन क्षेत्रसंन्यास करून स्थिर होते, ॥357॥ त्याला तू योगयुक्त म्हण. त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थळीच्या दिव्याची उपमा योग्य होईल, हेही तू प्रसंगानुसार समज. ॥358॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : नावेक विरक्तु, जाहला देहधर्मी नियतु…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!