सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
आतां बोलिजतसे आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका । मुखौनि निघाला ॥25॥ बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥26॥ तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें शंभूचिये मति नागवे । तें आतां नमस्कारिजे जीवें भावें । हेंचि भलें ॥27॥ मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥28॥ हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनासी ॥29॥ हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड । कां जे विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ॥30॥ म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनि पुसिलें नाहीं । सहसा कैसें काइ । सांगा म्हणों ॥31॥ मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहुनी अंतरंगु । परि तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥32॥ माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली । परी तोही हे बोली । करीचिना ॥33॥ मी काय सनकादिकांहूनि जवळां । परि तयाही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ॥34॥ तयातेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले । परि विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा ॥35॥ हा ठायवरी गुज । याचिये अंतरींचें हें निज । केवीं उराउरी मज । पुसों ये पां ॥36॥ आणि न पुसेंचि जरी म्हणें । तरी विश्वरूप देखिलियाविणें । सुख नोहेचि परि जिणें । तेंही विपायें ॥37॥ म्हणोनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा ठाके तैसें । येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ॥38॥ परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें । दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी ॥39॥
हेही वाचा – Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…
अर्थ
आता जो (प्रत्यक्ष) वैकुंठीचा राजा, श्रीकृष्ण त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा अभिप्राय नीट सांगतो, तिकडे लक्ष द्यावे. ॥25॥ धन्य धन्य गीता ग्रंथ की, ज्या गीताग्रंथाचा वक्ता, वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा, तो आहे. ॥26॥ त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा? कारण ते गीतातत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही, त्याला आता सर्वभावाने नमस्कार करावा, हेच बरे. ॥27॥ यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसे बोलला, ते ऐका. ॥28॥ हे सर्वही सर्वेश्वरस्वरूप अशा अनुभवास आलेला जो परमात्मा, तो आपल्यापुढे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावा, ॥29॥ ही मनातील इच्छा खरी, परंतु ती देवास सांगताना संकट वाटते, कारण ज्याअर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे, त्याअर्थी उघड करून दाखवा, असे आपण कसे विचारावे? ॥30॥ अर्जुन म्हणतो, पूर्वी कोणीही केव्हाच जे अत्यंत प्रिय असणाऱ्यांनाही विचारले नाही, ते एकाएकी सांगा म्हणून कसे काय म्हणावे? ॥31॥ मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो तरी, लक्ष्मीमातेपेक्षा जवळचा आहे का? परंतु ती इतक्या जवळची असून देखील हा विषय विचारावयास भ्याली. ॥32॥ माझी वाटेल तितकी जरी सेवा झाली असली, तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल काय? परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड तो देखील या संबंधीची गोष्ट काढीतच नाही. ॥33॥ मी सनकादिकांपेक्षा जास्त जवळचा आहे काय? परंतु त्यांना देखील ही उठाठेव करता आली नाही. मी गोकुळामधील प्रेमळ गोपगोपींइतका प्रिय आहे काय? ॥34॥ त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत, असे दाखवून फसविले. एकाकरिता (अंबरिष राजाकरिता) दहा गर्भवास देखील सोसले. परंतु विश्वरूप हे गुप्त राखून ठेवले. ते कोणाला दाखवले नाही. ॥35॥ इतकी ही गुह्य गोष्ट. याच्या अंतर्यामातील खास गोष्ट आहे. तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल? ॥36॥ बरे, पुसू नये असे जर म्हटले तर, ते विश्वरूप पाहिल्यावाचून सुख होणार नाहीच, परंतु जगणे, ते देखील क्वचितच संभवणार आहे. ॥37॥ तर आता थोडेसे विचारूया, मग देवाची मर्जी असेल तसे करू. अशा रीतीने अर्जुन भीत भीत बोलावयास लागला. ॥38॥ परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीचे होते की, एक-दोन शब्दांबरोबरच देव झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखवील. ॥39॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…


