Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : हें मन कैसें केवढें, ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें…

Dnyaneshwari : हें मन कैसें केवढें, ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

अर्जुन उवाच –

योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् ॥33॥

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिवि सुदुष्करम् ॥34॥

अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥411॥ हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें । एऱ्हवी राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥412॥ म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल । कां राहे म्हणितलिया राहेल । महावातु ॥413॥ जें बुद्धीतें सळी । निश्चयाते टाळी । धैर्येसी हातफळी । मिळऊनि जाय ॥414॥ जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥415॥ जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ॥416॥ म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल । हें विशेषेंही न घडेल । तयालागीं ॥417॥

श्रीभगवानुवाच –

असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥35॥

तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥418॥ परि वैराग्यचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरे । तरि केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ॥419॥ कां जें यया मनाचें एक निकें । जें हें देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥420॥

हेही वाचा – Dnyaneshwari : दीपा आणि प्रकाशा, एकवंचीचा पाडु जैसा…

अर्थ

अर्जुन म्हणाला,

हे मधुसूदना, तू जो हा समदर्शनाचा योग सांगितलास तो, मन हे चंचल असल्यामुळे (माझ्या ठिकाणी) स्थिर राहील, असे मला वाटत नाही. ॥33॥

हे कृष्णा, मन चंचल, क्षोभक, बलयुक्त आणि वळविण्यास कठीण आहे, त्याचा निग्रह करणे, वायूच्या निग्रहाप्रमाणेच अत्यंत कठीण आहे, असे मला वाटते. ॥34॥

(यावर) अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही आमच्या विषयीच्या कळकळीने खरोखर सांगत आहात. परंतु महाराज, या मनाच्या स्वभावापुढे (आमचा) टिकाव लागत नाही. ॥411॥ हे मन कसे आणि केवढे आहे, याचा पत्ता लावू असे म्हटले तर, सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. ॥412॥ म्हणून हे असे कसे होईल की, माकडाला समाधी लागेल? किंवा सोसाट्याचा वारा ‘थांब’ म्हटल्याबरोबर थांबेल काय? ॥413॥ जे मन बुद्धीला छळते, ते (तिने) केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते ॥414॥ जे सारासार बुद्धीला भ्रमात पाडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी, आपणाला दाही दिशांना फिरवते. ॥415॥ ज्याला आवरू गेले असता ते जास्त उसळते, ज्याला निरोधच साहाय्य होतो, (असे) ते मन आपला स्वभाव टाकील काय? ॥416॥ म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल, हे एवढ्याकरिता फार करून घडणार नाही. ॥417॥

श्रीकृष्ण म्हणाले,

हे अर्जुना, मन हे नि:संशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे. परंतु अर्जुना, (सतत) अभ्यासाने आणि वैराग्याने याचा निग्रह करता येतो. ॥35॥

तेव्हा कृष्ण म्हणाले, तू म्हणत आहेस, ते खरोखर तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपळच आहे. ॥418॥ परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळविले तर, काही एका वेळाने ते स्थिर होईल. ॥419॥ कारण की, या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की, ते (त्याला एकदा गोडी लागली की) अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकते, म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवीत जावे. ॥420॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : हें एकैक काय सांगावें, या त्रैलोक्यचि आघवें…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!