वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
या सोपिया योगस्थिति । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥387 ॥ तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणे ॥388॥ तैसें होय तिये मेळीं । मग साम्यरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥389॥ ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥390॥
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥29॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति । तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥30॥
तरि मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं । आणि तैसेंचि माझां ठायीं । सकळ असे ॥391 ॥ हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें । बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥392॥ एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना । सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥393॥ भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें । केवल एकत्वचि माझें जाणे । सर्वत्र जो ॥294॥ मग तो एक हा मियां । बोलतां दिसतसे वायां । एऱ्हवीं न बोलिजे तरि धनंजया । तो मीचि आहें ॥395॥ दीपा आणि प्रकाशा । एकवंचीचा पाडु जैसा । तो माझां ठायी तैसा । मी तयामाजीं ॥396॥ जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु । तैसा माझेनि रुपें रुपसु । पुरुष तो गा ॥397॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जया सुखाचिया गोडी, मग आर्तीची सेचि सोडी…
अर्थ
संकल्पाच्या संपत्तीचा (विषयवासनांचा) त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योगमार्गाचा अनुभव घेतला आहे. ॥387॥ ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले. (ते कसे तर) मीठ पाण्यात मिळाले असता, पाण्यास सोडून जसे ते वेगळे राहात नाही; ॥388॥ त्याप्रमाणे त्या योग्याचा जेव्हा परब्रह्माशी मिलाफ होतो, तेव्हा एकस्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. ॥389॥ आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे. अर्जुना, म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो, ऐक. ॥390॥
ज्याचे मन योगयुक्त झाले आहे, तो प्राणिमात्रांच्या ठिकाणी आत्म्यास पाहातो आणि आत्म्याच्या ठिकाणी प्राणिमात्र आहेत, असे पाहातो. तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो. ॥29॥
जो मला सर्वत्र पाहातो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहातो, त्याला मी कधी दृष्टिआड होत नाही आणि तो मला कधी दृष्टिआड होत नाही. ॥30॥
आणि मी तर सर्व देहांमध्ये आहे, यात विचार करण्यासारखे काही नाही आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. ॥391॥ हे असेच बनलेले आहे आणि परस्पर मिसळलेले आहे, पण अरे, बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे. ॥392॥ एरवी तरी अर्जुना, जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे, असे जाणून मला भजतो ॥393॥ प्राण्याच्या भेदाने ज्याच्या अंत:करणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्वच जाणतो ॥394॥ अर्जुना, मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी, तो मीच आहे. ॥395॥ दिवा आणि त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. ॥396॥ ज्याप्रमाणे जेथपर्यंत पाणी आहे, तेथपर्यंत ओलावा आहे अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे. ॥397॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : …तैसें चित्त लया जाये आणि चैतन्यचि आघवें होये


