Wednesday, February 25, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : मीचि गा पांडवा, या त्रिभुवनासि वोलावा…

Dnyaneshwari : मीचि गा पांडवा, या त्रिभुवनासि वोलावा…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारीं मी जन्म मरण । यालागीं शरणागता शरण्य । मीचि एकु ॥288॥ मीचि एक अनेकपणें । वेगळालेनि प्रकृतिगुणें । जीत जगाचेनि प्राणें । वर्तत असें ॥289॥ जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंब सविता । तैसा ब्रह्मादि सर्वां भूतां । सुहृद तो मी ॥290॥ मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासि वोलावा । सृष्टिक्षयप्रभावा । मूळ तें मी ॥291॥ बीज शाखातें प्रसवे । मग तें रुखपण बीजीं सामावे । तैसें संकल्पें होय आघवें । पाठीं संकल्पीं मिळे ॥292॥ ऐसें जगाचें बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारू      पु । तया कल्पांतीं जेथ निक्षेपु । होय तें मी ॥293॥ इयें नामरुपें लोटती । वर्णव्यक्ती आटती । जातींचे भेद फिटती । जैं आकाश नाहीं ॥294॥ तैं संकल्पु वासनासंस्कार । माघौतें रचावया आकार । जेथ राहोनि असती अमर । तें निधान मी ॥295॥

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च । अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥19॥

मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे । पाठीं इंद्र होऊनि वर्षै । तैं पुढती भरे ॥296॥ अग्नि काष्ठें खाये । तें काष्ठचि अग्नि होये । तैसें मरतें मारितें पाहें । स्वरूप माझें ॥297॥ यालागीं मृत्यूचां भागीं जें जें । तेंही पैं रूप माझें । आणि न मरतें तंव सहजें । अविनाशु मी ॥298॥

हेही वाचा – Dnyaneshwari : स्वाहा मी स्वधा, सोमादि औषधी विविधा…

अर्थ

जो मला एकनिष्ठपणाने शरण येतो, त्याचे जन्म आणि मरण मी दूर करतो. एवढ्याकरिता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे. ॥288॥ मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून, प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभावधर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग, त्याच्या प्राणाच्या रूपाने वागतो. ॥289॥ ज्याप्रमाणे सूर्य हा हे डबके, हा समुद्र असा भेद न पाहता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो (त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव आणि हा कीटक आहे असा भेद न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता) ब्रह्मादी सर्व भूतांवर सारखा उपकार करणारा तो मीच आहे ॥290॥ अर्जुना, या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या नाशाला आणि उत्पत्तीला जे कारण, ते मीच आहे. ॥291॥ बीजापासून फांद्या उत्पन्न होतात आणि मग ते सर्व वृक्षत्व ज्याप्रमाणे त्या बीजामध्येच लीन होते, त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीसे होते. ॥292॥ याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प, जो सूक्ष्म वासनारूप असतो, तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो, ते (स्थान) मीच आहे. ॥293॥ ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात, वर्ण आणि व्यक्ती आटून जातात, जातींचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशही नाहीसे होते (तात्पर्य, जेव्हा हा सर्व जगदाकार नाहीसा होतो), ॥294॥ त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे पुन: जगदाकार रचण्याकरिता जेथे अमर होऊन असतात, ते ठिकाण मी आहे. ॥295॥

हे अर्जुना, (सूर्याच्या रूपाने) मी उष्णता देतो, पाणी शोषून घेतो आणि मीच (पुन्हा) पाऊस पाडतो. अमर वस्तू, मृत्यू तसेच सत्-असत् सर्व मीच आहे. ॥19॥

मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो, त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्यावेळेला पाऊस पाडतो, त्यावेळी पुन्हा आबादानी होते. ॥296॥ अग्नी लाकडे खातो, तेव्हा लाकडेच अग्नी बनतात, त्याप्रमाणे मरणारे आणि मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत, असे समज. ॥297॥ याकरिता मृत्यूने घेरलेले जे जे आहे, ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश आहे, ते तर मी आहेच आहे. ॥298॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : आकाशें सर्वत्र वसावें, वायूनें नावभरी उगें नसावें…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!