वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥67॥ जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें । सांगे कथा ॥68॥ हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृतीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥69॥ मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देई ॥70॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् । अयुक्तः कामकारेण फले सक्तो निवध्यते ॥12॥
तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला । तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ॥71॥ येरु कर्मबधें किरीटी । अभिलाषाचिया गांठीं । कळासला खुंटी । फळभोगाचां ॥72॥
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी । नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन् ॥13॥
जैसा फळाचिया हावे । ऐसें कर्म करी आघवें । मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥73॥ तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥74॥ नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं । करितुचि न करी कांही । फलत्यागी ॥75॥
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः । न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥14॥
जैसा कां सर्वेश्वरु । पाहिजे तंव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥76॥ आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपें । जे हातुपावो न लिंपे । उदास वृतीचा ॥77॥ योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परि महाभूतांचे दळवाडें । उभारी भलें ॥78॥ जगाचां जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होये जाये । तो शुद्धीही नेणे ॥79॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जे पार्था तया देहीं, मी ऐसा आठऊ नाहीं…
अर्थ
जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले. ॥ ६७॥ जे स्वभावत: शब्दांच्या पलीकडचे आहे, ते बोलण्यात जर सापडले तर, इतरांचे काय प्रयोजन? तेव्हा तू श्रीकृष्णार्जुन संवादाची चाललेली कथा सांग. ॥68॥ श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तिनाथांचे शिष्य (ज्ञानेश्वर महाराज) म्हणतात, ‘कृष्ण आणि अर्जुन या दोघांत झालेले संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात देऊन यापुढे ऐका.” ॥69॥ मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन. तू चांगले लक्ष दे. ॥ 70॥
(कर्म करणारा) योगी कर्मफालाचा त्याग करून अत्यंत श्रेष्ठ अशी शांती (मोक्ष) मिळवतो. (कर्मयोगाच्या ठिकाणी) अयुक्त असलेला आणि फलाचे ठिकाणी आसक्त असलेला (मनुष्य) कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो. ॥12॥
तरी या जगात ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे, त्याला घरात घुसून शांती वरते. ॥71॥ अर्जुना, त्याहून दुसरा (आसक्त) कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. ॥72॥
सर्व कर्मांचा मनाने (साक्षात नाही) संन्यास करून, जितेंद्रिय पुरुष नवद्वारांच्या या (देहरूपी) नगरांत (सर्व करूनही) काही न करता आणि न करविता आनंदाने राहातो. ॥13॥
फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही, अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन राहातो. ॥73॥ तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. ॥74॥ नऊ छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असताही (तत्वत:) काहीच करीत नाही. ॥75॥
सर्वेश्वर, विश्वाची निर्मिती, त्यातील व्यापार आणि त्या व्यापारांचा फलाशी संयोग यापैकी काहीही उत्पन्न करीत नाही, सर्व स्वभावाने म्हणजे प्रकृतीकडूनच होत असते. ॥14॥
ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला, तर तो वस्तुत: क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो. ॥76॥ आणि त्यास कर्ता असे म्हणावे, तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही. कारण त्याच्या ठिकाणी असणार्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. (ज्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही. ॥77॥ त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही आणि त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही (खराब होत नाही), असे असूनही तो महाभूतांचे अनेक समुदाय चांगल्या तर्हेने उत्पन्न करतो. ॥78॥ तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो. परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे जग उत्पन्न होते आणि नाहीसे होते, याची त्य़ास खबरही नसते. ॥79॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : योगिये तोही करिती, परी कर्में तेणें न बंधिजती…


