सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें । तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके ॥221॥ श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारदें डवरिला । नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा ॥222॥ जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घालविली । तैसी चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें ॥223॥ जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये ॥224॥ जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगीं धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी ॥225॥ ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसे क्षोभा । तेवींचि देवो बैसला कीं उभा । का सेयांतु हें नेणवे ॥226॥ बाहेर दिठी उघडोनि पाहे । तरि आघवें मूर्तिमय देखतु जाये । मग आतां न पाहे म्हणोनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥227॥ अनावरें मुखें समोर देखे । तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके । तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि ॥228॥ अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ कांही नवलावो काइ असे । परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥229॥ कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें । तयाही सकट नारायणें । व्यापूनि घातलें ॥230॥ म्हणोनि आश्चर्याचां पुरीं एकीं । पडिला ठायेंठाव थडी ठाकी । तंव चमत्काराचां आणिकीं । महार्णवीं पडे ॥231॥ ऐसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें । कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ॥232॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके
अर्थ
स्वर्गाने जसे सूर्यतेज नेसावे, किंवा जसे मेरुपर्वताला सोन्याने मढवावे, त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर कसलेला पितांबर चमकत होता. ॥221॥ श्रीशंकराला जशी कापराची उटी लावावी, अथवा कैलासास जसा पार्याचा लेप द्यावा, अथवा क्षीरसमुद्राला जसे क्षीरोदकाचे पांघरूण घालावे, ॥222॥ ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग त्याचे पांघरूण आकाशाकडून घेववावे, त्याप्रमाणे पांढरोशुभ्र चंदनाची उटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिली. ॥223॥ ज्याच्या योगाने स्वरूपप्रकाशाला तेज चढते आणि ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते आणि ज्याच्या सुवासाने पृथ्वीला अस्तित्व प्राप्त होते ॥224॥ ज्या चंदनाची उटी ब्रह्मही आपल्या अंगास लावते आणि मदन देखील ज्यास आपल्या अंगावर धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करील? ॥225॥ अशी एक एक शृंगाराची शोभा पाहात असता अर्जुन भांबावला, त्याचप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत, की निजले आहेत, हे त्यास कळेना. ॥226॥ दृष्टि उघडू्न तो बाहेर पाहू लागला, तरी सर्वच विश्वरूपमय आहे, असे त्यास दिसू लागले. मग आता मी काही पाहाणार नाही, असा निश्चय करून त्याने डोळे मिटून घेतले, तरी आतही त्याला तसेच विश्वरूप दिसले. ॥227॥ अर्जुन आपल्यासमोर अगणित मुखे पाहात होता, त्यांच्या भयाने जेव्हा तो त्यांच्याकडे पाठ करून उभा राहिला, तेव्हा तिकडेही विश्वरूपाची मुखे, हात, पाय हे तसेच होते (असे त्यास दिसले). ॥228॥ अहो, पाहू लागले म्हणजे खरोखर दिसते, यात काही आश्चर्य आहे काय? परंतु हे आश्चर्य ऐका की, या विश्वरूपाच्या बाबतीत डोळे मिटून घेतले असताही विश्वरूप दिसत होते. ॥229॥ प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पाहा! अर्जुनाचे पाहाणे आणि न पाहाणे हे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले. ॥230॥ म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता, तो तत्काळ किनारा गाठी, तो आणखी दुसर्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात पडे. ॥231॥ याप्रमाणे त्य़ा अनंतरूपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या कौशल्याने व्यापून टाकले. ॥232॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर


