सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दाखवावयालागीं पांडवें । प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ॥233॥ आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे । तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ॥234॥ म्हणोनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखे आंधारीं । हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया ॥235॥ म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें । नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख ॥236॥
दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मनः ॥12॥
तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसयासारिखा सांगावा । कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥237॥ तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं । तऱ्ही तया तेजाची थोरी । उपमूं न ये ॥238॥ आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे । तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥239॥ तऱ्ही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें । आणि तया ऐसें की चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥240॥ ऐसें महात्म्यया हरीचें सहज । फांकतसे सर्वांगीचें तेज । तें मुनिकृपा की मज । दृष्ट जाहलें ॥241॥
तत्रैकस्थं जगत् कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ॥ अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥13॥
आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें । जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनाने दिसती ॥242॥ कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर । नाना मेरूवरी सपूर । परमाणु बैसले ॥243॥ विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं । अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥244॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर
अर्थ
तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविक रीत्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने आपले स्वाभाविक रूप दाखवावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. म्हणून आता तो सर्व विश्वरूपाने बनून राहिला, ॥233॥ आणि श्रीकृष्णांनी जी दृष्टि अर्जुनास दिली, ती दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाने प्रकट होईल (तिला दिसेल), अथवा मिटली असता तिचे पाहाण्याचेच बंद राहील, अशी नव्हती. ॥234॥ म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी, उजेडात अथवा अंधारात (म्हणजे डोळे उघडले तरी आणि मिटले तरी) ते विश्वरूप पाहावेच लागले, हे संजयाने हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्राला सांगितले. ॥235॥ संजय म्हणतो, फार काय सांगावे? अर्जुनाने नाना प्रकारच्या अलंकारांनी भरलेले आणि ज्याला सर्व बाजूंनी मुखे आहेत, असे विश्वरूप पाहिले, हे तुम्ही ऐकले काय? ॥236॥
आकाशामध्ये सहस्रावधी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर, ती त्या महात्म्या (श्रीहरीच्या) प्रभेसारखी (काहीशी) होईल ॥12॥
धृतराष्ट्र राजा, श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावे ? (पण काही कल्पना करता यावी, म्हणून दृष्टांताने सांगण्याचा यत्न करतो). प्रलयकाळी बारा सूर्यांचा जो एकच मिलाफ होतो ॥237॥ तसे ते हजारो दिव्य सूर्य एकाच वेळेला उगवले, तरी त्या (विश्वरूपाच्या) तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते (सूर्य) येणार नाहीत. ॥238॥ सर्व विजांचा समुदाय एकत्र केला आणि प्रलयकाळच्या अग्नीची सर्व साहित्ये गोळा केली, तसेच दहाही महातेजे एकत्र मिळवली, ॥239॥ तथापि, सर्वांचे हे एकत्र केलेले तेज, त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या बरोबरीला काही अल्पस्वल्प मानाने आले तर येईल. पण त्यासारखे शुद्ध तर खास असणार नाही. ॥240॥ याप्रमाणे महात्मा जे हरी, त्यांचे सर्व अंगीचे तेज (विश्वरूपाचे तेज) स्वाभाविक रीतीने फाकत होते, हे व्यासमुनींच्या कृपेने महाराज मला दिसले. ॥241॥
त्यावेळी (देव, पितर, मनुष्य इत्यादी) अनेक (भिन्न) रूपांनी विभाग पावलेले (हे) सर्व जग, देवाधिदेवांच्या त्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित, असे अर्जुनाने पाहिले. ॥13॥
आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे. ज्याप्रमाणे महासागरामध्ये बुडबुडे अलग अलग दिसतात, ॥242॥ अथवा आकाशामध्ये गंधर्वनगर भासावे किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावे अथवा मेरु पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत, ॥243॥ त्याचप्रमाणे सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये (विश्वरूपात) त्यावेळाला अर्जुनाने पाहिले. ॥244॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके


