नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
कलर्स हिंदीवर माझी एक सीरियल सुरू होती, ‘लागी तुझसे लगन’. खूप छान विषय होता. माझा रोल पण मस्त होता. त्या सीरियलला सगळे दत्ता भाऊची सीरियल म्हणायचे. आधीच खूप पॉप्युलर होती. माझी मध्यात एन्ट्री झाली. मलाही त्या सीरियलमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. एवढ्या वर्षांनंतर सुद्धा लोक मला ‘माई’ म्हणून ओळखतात. आजही लोक रस्त्यात थांबवून विचारतात की, “तुम्ही ‘दत्ताभाऊच्या माई’ ना?” खूप छान वाटतं. खरंतर, त्यानंतर ‘माई’ या नावाच्या कितीतरी भूमिका केल्या. पण ‘दत्ताभाऊची माई’ काही लोक विसरायला तयार नाहीत!
तेव्हाच्या तर कितीतरी गोष्टी किस्से… बापरे! म्हणजे पार्लरवाल्या मुली पण म्हणायच्या की, “माई आम्ही तुमच्या घरी येऊन ब्युटी थेरपी देऊ का?” काही जण विचारायचे की, “तुम्हाला काय आवडत? आम्ही घरी डबा पाठवू.” आपापल्या घरी कार्यक्रमांना आमंत्रण द्यायला लागले. बरं, मला हेही माहीत नव्हतं की, माझ्या नावाने ‘माई लेडीज क्लब’ सुरू झाला होता. एका फेसबुक फ्रेंडकडून समजल्यावर जाम खूश होते मी… पण जेव्हा कळलं की, हा क्लब पाकिस्तानात आहे, तेव्हा मी सगळं नीट चेक करून पाकिस्तानी फेसबुक फ्रेंडना ब्लॉक करून टाकलं!
हेही वाचा – सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!
एका मुलीने तर, “माझ्या शाळेत ओपन हाऊसला याल का? मला आई, बाबा नाहीयेत ना. दोन भाऊ आहेत. खूप चांगले आहेत पण आई हवीच नं.” खूपच भावनिक क्षण होता तो!
कितीही अडकायचं नाही म्हटलं तरी, मी अडकतेच. अशीच एका मुलीमध्ये अडकले… अगदी गुरफटले. तिची कथा व्यथा वेगळीच! ती तिच्या आईमुळे माझी सीरियल बघायची, त्या मुलीचं नाव पायल. माझ्याशी फेसबुकवर बोलायची, फेसबुक कॉल करायची. बरं चाललं होतं. एक दिवस कळलं की, तिची आई गेली… अचानक! तिने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. नंतर भावाने तिच्या त्या खोलीत टीव्ही आणून ठेवला होता. तिचा आणि तिच्या आईचा आवडता शो ‘लागी तुझ से लगन’ सतत बघत बसायची.
हळूहळू आई गेल्याच्या दुःखातून ती सावरायला लागली. त्या पायलची मी आई झाले. ती माझ्याशी हळूहळू बोलायला लागली. मेरठला राहणारी मुलगी माझ्याशी बोलून, दुःख मागे सारून पुन्हा उभी राहिली. ती गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ड्रॉइंग शिक्षिका म्हणून जॉइन झाली. हळूहळू प्रगती करत गेली. आज ती मुलगी शाळेत मुख्याध्यापिका झालीय. मला आई, माझ्या नवऱ्याला बाबा, मुलाला दादा म्हणते. माझी मुलगी कॉलेजच्या पिकनिकला गेली होती. मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास दिल्लीला ट्रेन थांबली. तेव्हा या बाईने 15-20 मुली खातील एवढी गरम गरम पुरी-भाजी स्वतः बनवून आणली होती. तिने ती माझ्या लेकीला आणि तिच्या मैत्रिणींना दिली.
हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…
आजही दरवर्षी ती माझ्या वाढदिवसाला मुंबईला येते. खूप गिफ्ट आणते, म्हणजे साडी असते, ड्रेस असतो, अगदी हेयर पिन, सेफ्टी पिना, बांगड्या, कानातले किंवा काहीही… तिला एखादी वस्तू दिसली, आवडली आणि वाटलं की, हे मम्मीसाठी घ्यावं की, ते ती आता माझ्यासाठी म्हणजे आईसाठी घेते. एक मोठं पार्सल बनवते आणि मला भेटायला येते. वर म्हणते की, मी माझा एकटेपणा विसरायला तुमच्या फॅमिलीमध्ये येते. ती येते तेव्हा आम्ही खूप धम्माल करतो. अगदी मी तिच्या हातावर मेहेंदी काढण्याचे उद्योग पण करते. मीही तिला साजेस म्हणजे एक टीचरच नाही तर, एक मुलगी वापरू शकेल, अशा असंख्य गोष्टी तिच्यासाठी घेऊन ठेवलेल्या असतात. इस्कॉन मंदिर, जुहू बीच, पिझ्झा, कानातले झुमके, वाळूचा डोंगर, लाटांवर स्वारी. अगदी काहीही येडचापगिरी करतो. ते दोन-तीन दिवस आमचे दोघींचे असतात.
हल्ली मात्र ती सकाळी विमानाने येते आणि संध्याकाळी परत जाते. तिच्या घरी तिची चार पायांची दोन लेकरं (कुत्रे) आहेत. या आईला भेटून त्या लेकरांची आई धावत पळत पुन्हा मुंबई मेरठ फ्लाइट पकडून रिटर्न जाते. पुढल्या वर्षी परत अशीच धावपळ करण्यासाठी…
Love you Principal Payal beta…


