सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझां तोंडीं । तुवां देखिलें जें ॥457॥ तरि तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इये वायांचि सैन्यें पाहीं । वल्गिजत आहाती ॥458॥ हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरि गजदळें । वाखाणिजताती ॥459॥ म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । जगाचा भरूं । घोटु यया ॥460॥ पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरि जाळूं । काई बाणवरी खिळूं । वारयातें ॥461॥ ऐशा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥462॥ बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट । मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥463॥ तरि हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळे । अगा चित्रींची फळें । वीर हे देखें ॥464॥ हां मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं ॥465॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूवमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥33॥
येर चेष्टवितें जें बळ । तें मियां मागांचि ग्रासिलें सकळ । जातां कोलौरीचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥466॥ हालविती दोरी तुटली । तरि तियें खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥467॥ तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळु न लगेल पैं गा । म्हणोनि उठीं उठीं वेगा । शाहाणा होईं ॥468॥ तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें । मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥469॥ आतां हें त्याहूनि निपटारें जाहलें । निवटीं आयितें रण पडिलें । घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥470॥ आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ॥471॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा आत्मा तूं एकु, सकळविश्वव्यापकु…
अर्थ
विजेच्या प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा, त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये जे पाहिलेस, ॥457॥ तर त्यामध्ये खात्रीपूर्वक काहीच शिल्लक राहाणार नाही. ते पाहा, या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जात आहे. ॥458॥ हे जे सैन्यांचे समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत आणि हत्तींचे थवे वगैरे आपली सैन्ये यमाच्या वरचढ आहेत, असे त्यांचे वर्णन करीत आहेत. ॥459॥ ती म्हणतात (ती सैन्ये अशी वल्गना करतात) की, आम्ही प्रतिसृष्टी करू. शपथ वाहून (प्रतिज्ञेने) मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भरू. ॥460॥ आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळू आणि हे आकाश तर वरच्या वरच पेटवून भस्म करू; इतकेच काय, एवढा चंचल वारा, पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणाने जागच्या जागी जखडून टाकू. ॥461॥ पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत, ते अशा या चतुरंग सैन्यरूप संपत्तीच्या सहाय्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात. ॥462॥ त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षा दाहक वाटतात आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषाशी तुलना केली तर, काळकूट विषाला मधुर म्हणावे लागेल. ॥463॥ (अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत) तरी हे वीर गंधर्वनगराचे लोट आहेत, किंवा पोकळीचे भेंडोळे. चित्राची रंगीत पोकळ फळे आहेत, असे समज. ॥464॥ हा सैन्यसमुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे. हे सैन्य नव्हे, तर कापडाचा साप केलेला आहे, अथवा हे सजवून मांडलेले भोत आहेत. ॥465॥
म्हणून तू (युद्धाला) उभा राहा. यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे. हे (सर्व) मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत. हे सव्यसाचिन् (तू) केवळ निमित्तमात्र हो. ॥33॥
शिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात, ते सर्व सामर्थ्य मी मधेच नाहीसे केले आहे. आता हे मातीच्या चित्रातील वेताळांसारखे निर्जीव आहेत. ॥466॥ खांबावरच्या बाहुल्यांना हालविणारी दोरी तुटली म्हणजे हवे त्याने त्या बाहुल्यास ढकलले असता त्या उलथून पडतात. ॥467॥ त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही. एवढ्याकरिता अर्जुना, शहाणा हो आणि लवकर उठ पाहू. ॥468॥ विराटराजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा हे (कौरव) मत्स्यदेशात आले होते, त्यावेळेस सरसकट सर्वांनाच तू मोहनास्त्र घातलेस. मग विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलाने सुद्धा जशी सर्वांची वस्त्रे हिसकावून त्यांस नग्न केले. ॥469॥ आता हे त्याहीपेक्षा तेजोहीन झालेले आहेत आणि आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे, तर त्यांस तू मार आणि एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले, असे यश मिळव. ॥470॥ आणि यात केवळ रिकामे यशच मिळाणार आहे, असे नाही तर, संपूर्ण राज्य देखील त्यात आलेले आहे. अर्जुना, तू केवळ नावाला मात्र कारण हो. ॥471॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु


