अध्याय आठवा
येरी जीवभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये । पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥27॥ म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि शेखीं कारणही कांहीं नसे । माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥28॥ ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु । निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥29॥
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥4॥
आतां अधिभूत जे म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥30॥ तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ॥31॥ भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक ॥32॥ तयातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैव पुरुष जाणिजे । जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ॥33॥ जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु । जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ॥34॥ जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा । संतोषे शिणे ॥35॥ जीव येणें नांवें । जयातें आळविजे स्वभावें । तें अधिदैव जाणावें । पंचायतनींचें ॥36॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देवा आधियज्ञ तो काई, कवण पां इये देहीं…
अर्थ
इतर जीवभावाच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते ? म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ ते शून्य आहे. ॥27॥ म्हणून याचा मुळात कर्ता कोणी दिसत नसून, शेवटी याचे कारणही काही नाही आणि मधे कार्यच मात्र आपोआप वाढावयास लागले आहे. ॥28॥ याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी (ज्याच्या योगे) हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो, असा जो व्यापार, त्याला ‘कर्म’ असे नाव आहे. ॥29॥
हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर पदार्थ, आणि जीव हाच अधिदैवत, आणि या देहात अधियज्ञ (देहभावाचा उपशमन करणारा) मीच आहे. ॥4॥
आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो, तर ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात ॥30॥ त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व उगीच वरवर असते, आणि न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात ॥31॥ जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते, आणि पंचमहाभूतांचा संयोग (पंचीकरण) झाला तरच जे दिसते, आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता, जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते ॥32॥ त्याला (शरीराला) अधिभूत म्हणावे. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा, जो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो ॥33॥ जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे, आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी रहाण्याचा वृक्ष आहे ॥34॥ जो वास्तविक परमात्माच आहे. पण जो दुसरा (वेगळा) झाला. कारण की, त्यास अहंकाररूपी झोप येऊन (द्वैतभासात्मक) स्वप्नाच्या व्यवहाराने जो संतोष पावतो आणि कष्टी होतो, ॥35॥ ज्याला जीव या नावाने स्वभावत: बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. ॥36॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐशिया आपुलियाची सहजस्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती…


