Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeआरोग्यHomeopathy : बदलती लाइफस्टाईल म्हणजे आजारांना निमंत्रण

Homeopathy : बदलती लाइफस्टाईल म्हणजे आजारांना निमंत्रण

डॉ. सारिका जोगळेकर

होमिओपॅथिक तज्ज्ञ

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता, थायरॉइड विकार, फॅटी लिव्हर, पचनाचे आजार… पूर्वी मध्यम आणि उतार वयात दिसणारे हे आजार आता तरुणांमध्येही झपाट्याने वाढू लागले आहेत. यामागे सर्वात मोठा दोष आपली बदलती जीवनशैली आहे. पण ही जीवनशैली शरीरात नेमके कोणते बदल घडवते आणि आजारांची निर्मिती कशी करत जाते, हे अनेकांना माहिती नसते. बऱ्याच वेळेला हे माहीत असून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार हे एका दिवसात होत नाहीत. चुकीच्या सवयी दीर्घकाळ टिकल्या की शरीराची नैसर्गिक संतुलन प्रणाली (homeostasis) बिघडते. परिणामी, शरीर हळूहळू या आजारांकडे ढकलले जाते. त्यामुळे लाइफस्टाईल (Lifestyle) डिसीजना “silent killer” असंही म्हटलं जातं. लाइफस्टाइल हे एक दुष्टचक्र आहे, ज्यात हळूहळू आपण अडकत जातो आणि मग मोहापोटी या दुष्टचक्रातून बाहेर पडणं कठीण जातं. मानवी मेंदू आपोआप कमी श्रम, जास्त आराम आणि सहज मार्ग निवडण्याकडे जास्त ओढलेला असतो, त्यामुळे वाईट सवयी सोडणे, व्यायामाची सुरुवात करणे, वेळेवरती झोपणे अशा अनेक चांगल्या सवयींची सुरुवातच आपण पुढे ढकलत असतो आणि त्यात महिने निघून जातात. ताण आणि बिझी शेड्युलमध्ये आरोग्य मागे पडतं.

या लाइफस्टाईल संबंधित आजारांच्या मुळाशी कोणती कारणे दडलेली आहेत, ते लक्षात घ्या.

चुकीच्या आहारपद्धतीमुळे होणारे जैविक बदल

आजचे आहारतंत्र अत्यंत प्रक्रियायुक्त (processed) अन्नावर आधारलेले आहे — पिझ्झा, बर्गर, पॅकेज स्नॅक्स, थंड पेये, जास्त साखर यांचा वापर सर्वत्र वाढलेला आहे.

हेही वाचा – Homeopathy : हिवाळ्यातील ॲलर्जी आणि होमिओपॅथीची ऊब 

हे अन्न शरीरात काय करते?

  • इन्सुलिनची पातळी वारंवार वाढवते : साखर आणि रिफाइन्ड कार्बोहायड्रेटमुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. दीर्घकाळ असे झाल्यास पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणं कमी करतात. याला insulin resistance म्हणतात — हा मधुमेहाचा पहिला टप्पा.
  • अस्वास्थ्यकर चरबींचा साठा वाढवते : पोटाभोवती जमा होणारी चरबी (visceral fat) शरीरात सूज (inflammation) निर्माण करते, जे हृदयरोग, पीसीओडी, थायरॉइड विकारांचे मूळ कारण आहे.
  • लिव्हरवर ताण : साखर आणि फॅट्सचे जास्त सेवन लिव्हरमध्ये चरबी जमा करते आणि ‘फॅटी लिव्हर’ निर्माण होते. त्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता मंदावते आणि मग मेटाबोलिझमवर परिणाम होतो.
  • थोडक्यात जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थ हे अन्न थेट हार्मोन्सवर परिणाम करते आणि आपलं शरीर मुख्यतः हार्मोन्सवर चालते.

हालचालींचा अभाव – ‘सिटिंग डिसीज’चा शाप

सॉफ्टवेअर आणि आयटीमध्ये काम करणाऱ्या लोकांना दीर्घकाळ बसून काम करावे लागते. ‘वर्क फ्रॉम होम’ कल्चरमुळे कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास करताना जी शरीराची हालचाल व्हायची, ती सुद्धा आता कमी होते. तासन् तास बसून राहण्यामुळे शरीराची नैसर्गिक कार्यव्यवस्था विस्कळीत होते. याचबरोबर आर्थिक स्थैर्यतेमुळे आपापल्या वाहनातून फिरण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यामुळे बहुतेक वेळेला बाहेर पडणं सुद्धा गाडीतूनच होते, तिथे सुद्धा चालणं कमी!

दीर्घकाळ बसण्याचे परिणाम

  • स्नायूंच्या हालचाली कमी → शरीरातील साखर जाळण्याची क्षमता कमी होते.
  • मेटाबॉलिझम मंदावतो → वजन वाढ, कोलेस्टेरॉल वाढ.
  • रक्तप्रवाह मंदावतो → हृदयरोगाचा धोका, व्हेरिकोज व्हेन्स
  • पाठीचे विकार, मानदुखी, तणाव वाढ
  • शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज किमान 7,500-10,000 पावले चालणे आवश्यक असताना अनेक जण दिवसातून 2-3 हजार पावले सुद्धा चालत नाहीत. शरीराच्या हालचाली — जसे चालणे, व्यायाम, स्ट्रेचिंग — यामुळे शरीरात काही महत्त्वाचे हार्मोन्स स्रवू लागतात. यामध्ये एन्डॉर्फिन, डोपामीन, सेरोटोनिन यासारखे “फील-गुड” हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स आपल्या मेंदूवर सकारात्मक परिणाम करून तणाव कमी करतात, मन शांत ठेवतात आणि मूड प्रसन्न करतात. हालचाली कमी झाल्यामुळे त्यातून होणाऱ्या चांगल्या परिणामांना सुद्धा आपण मुकतो.

दीर्घकाळचा तणाव – ‘आधुनिक जीवनाचा अदृश्य शत्रू’

तणाव हा आपल्या जीवनशैलीतील सर्वात धोकादायक घटक आहे.

तणाव शरीरात काय करतो?

  • ताण म्हणजे थोडक्यात नकारात्मक विचार. हे विचार आपल्या शरीर आणि मनावर खोलवर परिणाम करतो. ताणतणावाचे वैशिष्ट्य असे आहे की, आपण कुठल्याही कामांमध्ये व्यग्र असलो तरीही मनाच्या कोपऱ्यात खोलवर ते नकारात्मक विचार सुरूच असतात आणि  त्यामुळे आपल्या शरीरावर, मनावर, मूडवर, विचारांवर आणि त्या विचारांमुळे आपण घेणाऱ्या निर्णयांवर त्याचा परिणाम होतो. पुन्हा एकदा हे नकारात्मक विचार शरीरावर, थेट हार्मोन्सवर परिणाम करतात.
  • चिडचिड, पचनाचे त्रास, प्रतिकारशक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवतात.
  • विशेषतः, स्त्रियांमध्ये हार्मोन्स अस्थिर होऊन पाळीचे त्रास सुरू होतात.
  • दीर्घकाळ हा हार्मोन्सचा असमतोल राहिल्यास PCOD, थायरॉइड, IBS, त्वचेचे विकार, मानसिक ताण, वजन वाढ, दिवसभर थकवा, झोपेच्या तक्रारी — हे सर्व वाढू लागते.

झोपेची कमतरता – शरीराच्या दुरुस्तीची प्रक्रिया बंद

मानवी शरीरातील दुरुस्ती, हार्मोन्सचे संतुलन, मेंदूची पुनर्बांधणी ही प्रक्रिया झोपेदरम्यानच पूर्ण होते. झोप कमी झाल्यास सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो.

  • लेप्टिन/ घ्रेलिन हार्मोन्स बिघडतात → भूक अधिक असल्याने वजन वाढण्याचा धोका वाढतो.
  • शरीरातील सूज वाढते → हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका
  • मन:स्थिती अस्थिर → चिंता, चिडचिड, बेचैनी
  • एकाग्रता कमी होते आणि स्मरणशक्ती कमजोर होते.
  • प्रतिकारशक्ती कमी → वारंवार सर्दी, पचनाचे विकार

    आज झोप सहा तासांपेक्षा कमी होत असल्याने तरुणांमध्ये मधुमेह वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

तंबाखू, मद्य आणि इतर व्यसनांचे वाढणारे प्रमाण

  • धूम्रपान आणि तंबाखूतील निकोटीन रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
  • मद्याचे प्रमाण वाढले की यकृताची विषनिवारण क्षमता कमी होते.

परिणाम

  • हृदयरोगाचा धोका वाढ
  • स्ट्रोकची शक्यता
  • फॅटी लिव्हर
  • कॅन्सरचे प्रमाण वाढणे

व्यसन हा लाइफस्टाईल डिसीजेसचा सर्वात वेगाने वाढ करणारा घटक आहे.

स्क्रीनटाइम आणि डिजिटल जीवनशैलीचे दुष्परिणाम

आपला दिवस सरासरी 8-12 तास स्क्रीनसमोर जातो.

अतिरिक्त स्क्रीनटाइमचे परिणाम

  • ब्लू लाइटमुळे झोपेची गुणवत्ता कमी
  • मेंदू सतत उत्तेजित राहतो → तणाव वाढ
  • दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपण ज्या स्क्रीनवर बघतो, त्याचा परिणाम आपल्या स्वतःच्या मनावरती होतो आणि त्यामुळे आपल्याला इमोशनल इंस्टॅबिलिटी होऊ शकते.
  • शारीरिक हालचाल घट → वजन वाढ
  • डोळे कोरडेपणा, डोकेदुखी, मान दुखी
  • मोबाइलवरील सतत स्क्रोलिंग करताना वेळ कळत नाही… किती वेळ गेला याचे भान राहत नाही, पण त्याचा परिणाम मात्र नक्की जाणवतो… तोही काही वर्षानंतर!

हेही वाचा – Homeopathy : थायरॉईड, शरीराचं गतिमान इंजिन 

शरीरातील ‘सूज’ (Inflammation) – सर्व आजारांचे मूळ

  • अयोग्य आहार, झोपेची कमतरता, तणाव, प्रदूषण, बदलेली जीवनशैली यामुळे शरीरात कमी पातळीची पण सततची सूज निर्माण होते.
  • ही सूज रक्तवाहिन्या, हार्मोन्स, पचनसंस्था, मेंदू यांच्या कार्यात अडथळे आणते.
  • हीच सूज पुढे अपचन, थायरॉइड, PCOD, मधुमेह, हृदयरोग, त्वचाविकार यांना जन्म देते.

या जीवनशैलींच्या आजाराच्या यादीतून बाहेर पडायला आणि कमी वयात असलेल्या लोकांनी त्यात अडकू नये यासाठी काही उपाय आहे का?

गुड न्यूज ही आहे की हे आजार कायमचे नाहीत योग्य सवयी अंगीकारल्या तर आपण त्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो आणि पुढे होणारा धोका टाळू शकतो. जीवनशैली बदलून आजारांवर मात करता येते, पण त्या प्रवासात संयम आणि सातत्य हेच तुमचे खरे सहकारी असतात.

‘छोटे बदल, पण मोठी सुधारणा’ असे स्वतःला सांगा आणि निरोगी जीवनशैलीकडे पाऊल टाका… कसे ते जाणून घ्या!

  1. किमान सात ते आठ तास शांत झोप. ही शांत झोप शक्यतो निसर्गानुसार असावे; रात्रीची झोप आपल्या शरीराला जे फायदे देते, ते दिवसा झोपलं तर नेमका उलटा परिणाम होऊ शकतो.
  2. घरचे ताजे जेवण, किमान दोन लिटर पाणी आणि कमीत कमी चीट डेज.
  3. नियमित हालचाल 30 मिनिटे चालणे, जिने वापरणे आणि हलका व्यायाम.
  4. मनावरचा ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगा, मनाला आनंद देणारा कुठलातरी छंद जोपासावा.
  5. स्क्रीनटाइम कमी करा आणि जवळच्या लोकांशी संवाद साधा.

सवयी बदलल्या की आरोग्य बदलतं… या बदलाकडे जाणाऱ्या पावलांचा नैसर्गिक साथीदार म्हणजेच ‘होमिओपॅथी’!

होमिओपॅथी या आजारांकडे फक्त लक्षणे म्हणून पाहत नाही, तर त्यामागील मूळ कारणे समजून घेते, आजच्या धावपळीच्या आणि कॉम्पिटिशनच्या काळात शरीर आजारी नाही पडत, पण ते थकलेलं असतं, होमिओपॅथी या थकव्यामागचं कारण शोधून काढतं आणि त्यावर काम करतं.

जसे की कामाचा ताण, नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारा ताण, आर्थिक अस्थिरतेमुळे असलेला ताण, जबाबदाऱ्यांमुळे असणारी मनातली भीती, स्वतःला दोष देणे, भावनिक दबाव, शरीराची कमी प्रतिकारशक्ती आणि व्यक्तीची नैसर्गिक प्रवृत्ती वगैरे.

होमिओपॅथिक औषधं शरीराच्या स्वयं-उपचारक्षमतेला (self-healing power) उत्तेजित करतात. त्यामुळे हार्मोन्सची नैसर्गिक समतोलता परत येते. हार्मोन्स संतुलनामुळे बऱ्याच गोष्टी रुळावर येतात. आतून फ्रेश वाटलं की, आपोआप व्यायाम सुरू होतो आणि मग  शांत झोप लागते, मन स्थिर होते.

पचन आणि मेटाबॉलिझम सुधारतो

तणाव आणि भावनिक संतुलन राखले जाते. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता परत येते आणि मग आत्मविश्वास सुद्धा त्यासोबत येतो. या सगळ्या सकारात्मक भावना सोबत असल्या की, नकारात्मक भावना कमी होत जातात.

पुनरावृत्ती (recurrence) कमी होते

मुख्य म्हणजे, होमिओपॅथी व्यक्तीनुसार औषधे निवडते. एकाच आजारातही दोन वेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे उपचार मिळू शकतात. त्यामुळे परिणाम अधिक नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारे असतात.

योग्य जीवनशैली + होमिओपॅथी = आरोग्याचा दीर्घकालीन समतोल


HOLISTIC HOMOEOCURE CLINIC

ऋतू पार्क, ठाणे वेस्ट  मोबाइल – 9890533941


https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr

https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!