चंद्रशेखर माधव
एकदा रात्री साधारण साडेआठच्या सुमारास अचानक अरुणचा फोन आला. अरुण म्हणजे माझ्या ऑफिसमधला माझा सहकारी. मला म्हणाला “तुमच्या घराजवळ माझी गाडी बंद पडली आहे. जरा येता का?” मी त्याला लगेचच “आलोच,” असं म्हणून फोन ठेवला… मी घरीच होतो, त्यामुळे लगेचच तिथे पोहोचलो. बघितलं तर गाडीमध्ये अरुण, त्याचे दोन मोठे बंधू आणि आई पण होती. मी पोहोचताच अरुण खाली उतरला. गाडी दुरुस्त करण्यासंबंधी आम्हाला फार काही कळत होतं, असं नाही; पण तरीसुद्धा आम्ही दोघांनी मिळून थोडीशी खटपट केली. कुठे एखादी वायर वगैरे निघालेली दिसतेय का किंवा सैल झाली असेल का? असले प्रयत्न करून पाहिले. पण काही केल्या गाडी सुरू होईना. अरुणने त्याच्या नेहमीच्या मेकॅनिकला फोन केला. त्याला तातडीने आमच्या मदतीला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे अरुण आणि कुटुंबीयांना ठरलेल्या ठिकाणी जाण्याचा बेत बदलावा लागणार होता. आता सर्वांना माघारी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
चर्चेअंती असं ठरलं की, दोन मोठे बंधू आणि आई यांना रिक्षाने घरी पाठवायचं आणि मी अरुणला बस स्टॉपवर सोडायचं. एक बंधू रिक्षा आणायला गेला. अजून थोडा वेळ लागणार आहे आणि गाडी तिथेच सोडायची आहे, असं लक्षात आल्यावर आई गाडीतनं खाली उतरल्या.
हेही वाचा – वहिनीची माया
आई खाली उतरल्यावर अरुणने त्यांच्याशी माझा परिचय करून दिला. “आई, हे चंद्रशेखर. माझ्यासोबत ऑफिसमध्ये काम करतात.” “व्हय का, बरं बरं!” असं म्हणून आईंनी माझ्याकडे हसून पाहिलं. मी त्यांना वाकून नमस्कार केला. मी जसा वाकून नमस्कार केला, तसं आईंनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांनी डोक्यावरून हात फिरवल्यावर मला एकदम शांत वाटलं. त्यांचा तो थरथरणारा हात माझ्या डोक्यावरून फिरत असताना मला एक गोष्ट जाणवली की, गेल्या अनेक वर्षांत नमस्कार केल्यानंतर अशाप्रकारे मायेने आपल्या डोक्यावरून कोणीही हात फिरवलेला नाही. यानंतरच्या पाच मिनिटांत तिथे उभ्या उभ्या त्यांनी माझ्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. मी कुठे राहतो, घरी कोण असतं वगैरे अशी सगळी आस्थेने विचारपूसही केली.
ही सगळी घटना जेमतेम दहा मिनिटांत घडली, पण ती माऊली आणि डोक्यावरून फिरलेला तो प्रेमळ हात कायमचा माझ्या स्मरणात राहिला.
हेही वाचा – राजमाची येथील चकवा!