नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला!
एक सीरियल करत होते… ‘नामकरण’. माझ्या रीमा दिदीची ती सीरियल होती. त्यात जेव्हा माझा ट्रॅक सुरू झाला, तेव्हा दिदी या जगात नव्हती. त्यावेळी दिवाळीची धामधूम सुरू होती. साफसफाई, फराळ, खरेदी आणि शूटिंग सुद्धा…! त्यात मला ताप भरला. टेम्परेचर अगदी 3-3 असायचं. पण शूट तर करावच लागणार होतं. अर्थात, ते करतच होते मी.
एकेदिवशी शूट संपवून मी घरी आले. आमच्या गल्लीत खूप गर्दी झाली होती. काय झालं असावं, ते कळेच ना! मला वाटलं की, दिवाळी आधीचे काही इव्हेंट्स सुरू असावेत… मी रिक्षातून खाली उतरले आणि एक मुलगा समोर दिसला. “काय रे, दिवाळी इव्हेंटची तयारी एकदम जोरदार दिसतेय!” त्या मुलाला मी विचारलं.
तसा तो मुलगा म्हणाला की, “नाही काकी, एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.” मला तर धसकाच बसला. ‘कोण… कोणाची मुलगी असेल? असं काय घडलं असेल की, तिनं एवढं मोठं पाऊल उचललं असेल? कोण असेल ती मुलगी? ओळखीची… जवळची…’ खूप सारे प्रश्न. घालमेल सुरू होती. त्यात रात्रीची वेळ होती. म्हणजे, माझ्या अंगात सडकून ताप भरायची वेळ झालेली! कारण, गेले चार-पाच दिवस याच वेळी मला ताप यायचा.
मी घरात गेले. माझी बॅग टाकली, फोनचा पाऊच गळ्यात घातला आणि ‘आलेच’ असं नवऱ्याला सांगून बाहेर धावले. बरं, बाहेर काय झालंय, याची राजेश म्हणजे माझ्या नवऱ्याला काहीच कल्पना नव्हती. मी का, कुठे चाललेय, हे सुद्धा त्याला न सांगता-बोलता घराबाहेर पडले. गर्दी अजून वाढली होती. तिच्या घरातून रडण्याचा आवाज येत होते. घराबाहेरच्या गर्दीमुळे कोणतं घर ते मला पटकन कळलं. पण ते कुटुंब आणि ती मुलगी मात्र मला अनोळखी होते.
गर्दीतून वाट काढत मी त्या एक मजली घरापर्यंत पोहोचले. “डॉक्टर ना कळवलं का? पोलिसांना कळवलं का?” मी विचारलं. कोणीतरी म्हणाले की, “हो, पोलीस यायला हवेत” तेवढ्यात पोलीस व्हॅन आली. उगाच आगाऊपणा नको म्हणून जरा दरवाजाजवल गप्प उभी होते. गाडीतून काही पोलीस उतरले. लेडी ऑफिसर मात्र एकही नव्हती. मी त्या इन्स्पेक्टरना म्हणाले की, “सर, मी हर्षा गुप्ते. तुमच्यासोबत लेडी ऑफिसर नाहीयत. काही गरज लागली तर मला हाक मारा. मी इथं दारातच उभी आहे.”
ते म्हणाले की, “आधी वर जाऊन बाई, पुरुष कोण आहे वगैरे बघतो, मग सांगतो.”
मी म्हटलं की, “मुलगी आहे.” तरीही, ते स्वत: वर जाऊन खात्री करून आले. मग मला वर बोलावलं. मी आणि अजून एक मुलगी अशा आम्ही दोघी पोलिसांसोबत वर गेलो.
… 26-30 वर्षांची तरुण मुलगी होती… गलबलून आलं. इंटिरिअर डेकोरेटर होती, ती. का बरं एवढं टोकाचं पाऊल उचललं असेल तिनं? साधारणपणे पहाटेला तिने आत्महत्या केली असावी. आता रात्र झाली होती. त्यामुळे मृतदेहाची अवस्था खराब झाली होती. तिच्या अंगात गाऊन होता. बेडवर महागडी साडी, ब्लाऊज आणि दागिने ठेवले होते. म्हणजे, रात्री ती एखाद्या समारंभाला गेली होती. ‘काय झालं असेल’चा भुंगा डोक्यात लागला होताच!
हेही वाचा – Swami Samarth : स्वामी अन् मुंगळा…
पोलिसांनी गळफासाची ओढणी कापल्यावर मुलीचा मृतदेह माझ्या अंगावरच आला. दुसऱ्या मुलीच्या मदतीने तिला खाली चादरीवर ठेवलं. आमच्या हजेरीत पोलिसांनी तिच्या अंगावरील बाकीचे दागिने काढले आणि पंचनामा केला. त्यानंतर चादरीत मृतदेह बांधून ‘हॉस्पिटलला घेऊन जायचंय,’ म्हणाले. मीसुद्धा जायला निघाले. मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्या फॉरमॅलिटिज करायला सुरुवात केली.
एकतर, आत्महत्या करणाऱ्यांचा मला वैयक्तिकरित्या खूप राग आहे. जीव दिलात आणि स्वत:ची सुटका करून घेतात. आपल्या मागे उरणाऱ्यांची काय गत होत असेल, याचा विचारच करत नाहीत. बिचारी ती आई, रडून रडून अर्धी झाली होती. आई म्हणून मी सुद्धा खूप भावूक झाली होते. एका आईचं लेकरू गेलं होतं.
बरं, तिने वेळही अशी साधली होती की, दोन-तीन दिवसांवर दिवाळी होती. म्हणजे, शेजारीपाजारी सुद्धा सण साजरा करू शकणार नव्हते. शिवाय, कधी काही ऐकीव गोष्टी कळायच्या… की, मृतदेहाशी सुद्धा वाईट प्रकार केले जातात.. निदान त्या मुलीच्या पार्थिवासोबत काही अमंगल घडू नये म्हणून मी अगदी सगळ्या फॉरमॅलिटिज् पूर्ण होऊन, मृतदेह पॅक करून शवागारात नेईपर्यंत तिथेच थांबले होते.
हेही वाचा – Discipline : कडक शिस्त… आयुष्याला वळण लावणारी!
घरून फोन येतच होते. मी कुठे, कधी, कशासाठी गेले हे घरी माहीतच नव्हतं. माझ्या अंगात ताप भरलेलाच होता. ‘अंगात ताप असताना हे सगळं करण्याची गरजच काय,’ म्हणून नवरा चिडला होता. सगळे सोपस्कार झाल्यावर पोलिसांनी मला घरी आणून सोडलं. नवऱ्याकडे माझं कौतुक केलं. त्याचाही राग शांत झाला होता. अर्थात, कोणाकडून असं कोतुक करून घेण्यासाठी मी हे नक्कीच केलं नव्हतं. एका पार्थिवाची विटंबना होऊ नये, म्हणून मी शेवटपर्यंत थांबले होते.
तिने तो निर्णय का घेतला, हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. ते लोक घर सोडून गेले. मीही आता ते घर सोडलंय. पण आठवणी नाही सुटत.
सगळ्यांना हात जोडून विनंती, ‘कृपया, काहीही झालं तरी आत्महत्या नका करू. जमले तसे परिस्थितीला सामोरे जा. कारण आत्महत्या करणारा सुटतो, पण त्याच्या मागे राहिलेले मात्र भरडले जातात…’