डॉ. प्रिया गुमास्ते
(आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सल्टंट)
सध्याच्या काळात नॅचरल, हर्बल हे शब्द वरचेवर कानावर पडत असतात आणि आयुर्वेद म्हणजे हर्बल औषधी हाच समज बहुतांश लोकांमध्ये आहे. पण आयुर्वेद फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही. मग काय आहे हे आयुर्वेद?
आपल्या भारतात सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी अत्यंत विद्वान ऋषींनी अभ्यासपूर्ण असे वेद लिहिले. वेद म्हणजे ज्ञान देणारे ग्रंथ. त्यामधील एक उपवेद म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद या शब्दाची फोड केली तर ती होते आयुषो वेदः| यातील आयु म्हणजे जीवन तर, वेद म्हणजे विज्ञान. थोडक्यात सांगायचे झाले तर, आयुष्याविषयी माहिती देणारा, जीवनाचे विज्ञान उलगडून देणारा ग्रंथ म्हणजे ‘आयुर्वेद’!
हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम्।
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते।।
म्हणजेच ज्या शास्त्रामध्ये हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर आयुष्य म्हणजे काय आणि त्या आयुष्यासाठी हितकर तसेच अहितकर गोष्टींचे वर्णन केलेले आहे, त्याला आयुर्वेद म्हणतात. आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान. ही एक प्राचीन भारतीय उपचार पद्धती आहे, जी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य नीट राहावे, यासाठी नैसर्गिकरित्या प्रयत्न करते. आयुर्वेद शरीरातील तीन ऊर्जा (वात, पित्त, कफ) यांच्या संतुलनावर भर देते.
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं च|
हा आयुर्वेदाचा मुख्य उद्देश आहे. स्वस्थ म्हणजे निरोगी माणूस. तो आजारीच पडू नये यासाठी करायचे उपाय आणि तो आजारी पडल्यास त्या व्यक्तीस पुन्हा निरोगी करण्यासाठी औषधोपचारादि उपाय करणे, हे आयुर्वेदाचे ध्येय आहे. त्यामुळे अनेकदा यात केली जाणारी उपचार प्रक्रिया ही वैयक्तिक स्वरूपाची असते.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
मनुष्याचे शरीर दोष, धातु, मल आणि अग्नि या चार मूळ तत्वांवर आधारलेले असते. त्यामुळे आयुर्वेदातही याच चार मूलतत्वांना फार महत्त्व आहे. म्हणूनच दैनंदिन आचार, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यावर आयुर्वेदात भर दिला जातो.
आजच्या धावपळीच्या जीवनात, जिथे ताणतणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, तिथे आयुर्वेद एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरतो.
चरक संहिता या आयुर्वेदातील एका प्रमुख ग्रंथाची सुरुवात ‘दीर्घम् जीवितीय’ अध्यायाने केलेली आहे. या अध्यायात, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, जसे की आहार (diet) आणि जीवनशैली (lifestyle) यांचे मार्गदर्शन केलेले आहे. यावरुन आयुर्वेदात prevention of diseaseला किती महत्व दिले आहे, हे समजून येईल. तसेच रोगावर फक्त लाक्षणिक (Symptomatic) उपचार न करता तो मुळापासून बरा करण्यावर आयुर्वेद भर देते.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!
कोरोना काळात सर्वांनाच नैसर्गिक प्रतिकार शक्तीचे (Immune power of body) महत्त्व समजून आले आहे आणि म्हणूनच प्राचीनतम असणारे आपले हे वैद्यकीय शास्त्र आजही तितकेच महत्त्वाचे आणि उपायुक्त आहे.
(क्रमश:)
Mobile : 9819340378