चंद्रशेखर माधव
तसं म्हणायला गेलं तर मला दोन मामा-मामी. पण कायम आठवण यावी आणि आवर्जून उल्लेख करावा अशी मामी एकच ‘मालती मामी’. दुसऱ्या मामा, मामीकडे आमचं येणं-जाणं होतं, नाही असं नाही. पण का कुणास ठाऊक, माझ्या मनाला तिथे कधीच स्वस्थता लाभली नाही. आमची मालती मामी म्हणजे प्रचंड उत्साह असलेली आणि अखंड काम करणारी व्यक्ती.
माझी शाळा मामाच्या घरापासून खूपच जवळ होती. त्यामुळे रोज शाळा सुटली की, धावत रस्ता पार करून मामाकडे जायचं, हा ठरलेला कार्यक्रम होता. सुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळेत असताना आई घ्यायला यायची. आई येईपर्यंत मामाकडेच बसायचं. माझी शाळेतून यायची वेळ झाली की, मामी रोज काही ना काही खायला करीत असे. व्यवस्थित खाणं झालं की, मगच आम्ही घराकडे यायला निघायचो. ही तपस्या तिने अव्याहतपणे मी इयत्ता सातवी पास होईपर्यंत, म्हणजे सुमारे 7 ते 8 वर्षं सुरू ठेवली. त्यानंतर मी सायकलवर शाळेत जाऊ लागलो, त्यामुळे रोज मामीकडे जायचा उपक्रम थांबला.
नवरात्रीतील अष्टमी हे आमच्याकडे, म्हणजे मामीकडे, आनंदाचं पर्व असायचं. नवरात्री आली की, दर अष्टमीला मामीकडे उत्सव असायचा. मग काय, आमचा मुक्काम तिकडेच. अष्टमीला दिवसभर लोकांची ये-जा सुरू असायची. सलग दोन दिवस मामी अखंड कामात असायची. त्यातून जर कधी अष्टमी दोन दिवस असली की, हेच उत्सवपर्व अजूनच रुंद व्हायचं. सकाळ, संध्याकाळ देवीची आरती, त्याची सर्व तयारी करणे, नैवेद्य बनवणे, सगळ्या लोकांचा स्वयंपाक करणे, हे सर्व ती एकटी अत्यंत ताकदीने पेलवून नेत असे. हे सर्व करीत असताना ती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची अगदी आपुलकीने संवाद साधत असे. त्या दिवशी दारात कोणीही आलं की, मामी त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय जाऊ देत नसे.
हेही वाचा – New Mobile : ‘त्या’च्या हास्याचे मोल
नवरात्रातील अष्टमी तिने अनेक वर्ष न थकता अत्यंत भक्तिभावाने साजरी केली. आता मात्र वयोमानाप्रमाणे मामी थकली आहे. साहजिकच, नवरात्र अष्टमीला पूर्वीसारखा उत्सव करणे शक्य होत नाही.
हेही वाचा – नवी दिशा
माझा मात्र अष्टमीला तिच्याकडे जाण्याचा उपक्रम चालू आहे. माणसातच देवाचा वास असतो. ‘देवीचे दर्शन घेणे’ यापेक्षा ‘मामीला भेटणे’ हेच मला जास्त मोलाचे वाटते. त्या घरात माझ्या बालपणीच्या असंख्य आठवणी आजही दरवळत आहेत.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.