भाग – 2
कॉलेज संपल्यावर रोज सायंकाळी, वैद्य सरांबरोबर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये चालणे सुरू होतेच. कॉलेजच्या पहिल्यावर्षाला सरांनी फक्त मराठी आणि हिंदी साहित्याबद्दल गप्पा मारल्या. विजय तेंडुलकर, गो.पू. देशपांडे, मोहन राकेश, अमृता प्रितम, भालचंद्र नेमाडे, अरुण साधू, कुसुमाग्रज, शांता शेळके, पाडगावकर असे रोज एका लेखकाची माहिती सांगायची आणि जाताना त्या लेखकाचे किंवा कवीची पुस्तके सर द्यायचे. दुसर्या दिवशी कालची पुस्तके वाचली की, नाही याची खात्री करायचे. दर रविवारी माझे सरांकडचे जेवण ठरलेलं… त्यावेळी अरुणाची भेट व्हायची. आता हळूहळू माझी भाषा सुधारू लागली होती. कॉलेजमध्ये इंग्लिश ऐकून ऐकून तोंडात इंग्रजी पण बसली होती. त्यामुळे वैद्य सरांची बहीण अरुणाशी थोडंथोडं बोलण्याचे मी धाडस करत होतो. एकदा सप्टेंबरमध्ये अचानक पाऊस सुरू झाला. छत्री नव्हती, त्यामुळे मी भरपूर भिजलो. रात्री खूप ताप आला. नेमका माझा पार्टनर गावी गेलेला. मी कॉलेजमध्ये आलो नाही म्हणून सर हॉस्टेलमध्ये आले आणि मी पांघरुण घेऊन झोपलेला. सरांनी मला डॉक्टरकडे नेले आणि विश्रांतीसाठी आपल्या घरी घेऊन आले. ते दोन दिवस अरुणाने अगदी गरम पाणी, पातळ पेज देण्यापासून सर्वकाही केले.
मी बरा झालो आणि परत हॉस्टेलवर आलो. पण डोळ्यासमोर अरुणा यायची. अर्थात अरुणाचा विचार मनात आणणे हे चुकीचे आहे, हे समजत होते. एकतर ती श्रीमंत कुटुंबातील आणि माझे उपकारकर्ते वैद्य सरांची लाडकी बहीण होती. जातीचा विचार केला तरी ती उच्च जातीतील होती आणि मी कुठेच नव्हतो. माझ्यावर मागच्या तीन भावंडांची जबाबदारी होती. आमची ना धड शेती, ना घर… छे! छे! अरुणाचा विचार मनात आणायचा नाही, असे बजावले. तरी अरुणा स्कूटीवरून आमच्या हॉस्टेलसमोरून कॉलेजला जायची, त्यावेळी मी गच्चीत यायचोच. ती दिसेनाशी झाली की, रुममध्ये परतत असे. सायंकाळी सरांकडे जायचो तेव्हा, अरुणाची जाग लागते का, हे पाहायचो. रविवारी जेवायला गेलो की, ती आजूबाजूला असायची. तेव्हा तिला पहात रहायला आवडायचे. अरुणाचे हसणे, बोलणे, माझ्या आणि सरांच्या पुस्तकांच्या गप्पात सहभागी होणे, मधूनच चहा आणून देणे सर्वच आवडायचे. एवढे दिवस सरांकडे जाणे-येणे झाल्याने एक लक्षात आले सरांचे अरुणावर फार प्रेम आहे.
पहिल्या वर्षाला मी कॉलेजमध्ये पहिला आलो, तेव्हा सरांना फार आनंद झाला. मग सरांनी मला आणि अरुणाला घेऊन हॉटेल ओपलमध्ये जेवायला नेले. सुट्टीत मी गावी गेलो, तेव्हा सरांनी वाचायला भरपूर पुस्तके सोबत दिली. कॉलेजचे दुसरे वर्ष सुरू झाले आणि सर वर्गात इंग्लिश साहित्य शिकवायला लागले. सरांचा तास कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हे लक्षात यायचे नाही. शेक्सस्पिअरची नाटके हॅम्लेट, अथेल्लो, ज्युलिअर सिझर, किंग लिअर तसेच इंग्रजी कादंबर्या सरांनी शिकविल्या. माझा आणखी फायदा म्हणजे सायंकाळी याच कथांवर सर माझ्याशी पुन्हा चर्चा करायचे. एकंदरीत, मी सर आणि सरांच्या घरात घरचा झालो होतो.
एका रविवारी मी सरांकडे जेवायला गेलो, तेव्हा लक्षात आले अरुणा घरात नाही. मग सरच म्हणाले, “अरे अरुणाला गाण्याची फार आवड… इथे गावात स्वरशिल्प नावाचा एक नाटकाचा ग्रुप आहे. त्यांनी गाण्यांचा कार्यक्रम सुरू केलाय, थोडक्यात ऑर्केस्ट्रा! अरुणाला त्यांनी बोलावलेय. सध्या अरुणा रोज संध्याकाळी आणि रविवारी त्यांच्या सरावाला जाते.” मग हळूहळू लक्षात यायला लागले, अरुणा नेहमीच घरात नसते. एक दिवस सर म्हणाले, “मनोहर अरुणाच्या ग्रुपचा पहिला कार्यक्रम दसरा चौकात, शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी रात्री आहे. अरुणाने दोन तिकिटे ठेवली आहेत. तेव्हा येत्या शनिवारी आपल्याला कार्यक्रमाला जायचे आहे.” मी आनंदाने “हो” म्हणालो.
हेही वाचा – वैद्य सरांची शिकवणी सुरू झाली… शिष्टाचाराची!
शनिवारी मी आणि सर शाहू स्मारक भवनमध्ये स्वरशिल्प ग्रुपच्या ‘सूरसंगम’ कार्यक्रमाला गेलो. हॉल फुल्ल होता. कॉलेजमधील मुलं, त्यांचे आईवडील, नातेवाईक यांनी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरू झाला… अरुणा आणि विनोद नगरकर यांची जोडीने गाणी होती. शिवाय, इतर मंडळींची होती. पण जास्त शिट्ट्या, टाळ्या आणि वन्समोर विनोद नगरकरला मिळत होत्या. विनोद होता पण देखणा, रुबाबदार कपडे आणि स्टायलिश बोलणे… एकंदरीत या ग्रुपमध्ये तोच लक्षात राहणारा होता. कार्यक्रम संपला तसे मी आणि सर आतमध्ये भेटायला गेलो. सर्वांचे कौतुक केले. एवढ्यात अरुणा पुढे आली आणि सरांशी सर्व मंडळींची ओळख करून दिली. विशेषतः, विनोदची अगदी हसून प्रेमाने ओळख करून दिली.
जसजशी वार्षिक परीक्षा जवळ येऊ लागली तसतसा मी अभ्यासात रमलो. कोणत्याही परिस्थितीत विशेष प्राविण्यासह पास व्हायचं होतं, तरच माझ पुढचं भवितव्य होतं आणि माझ्या लहान भावंडांना शिकवून मोठं करायचं होतं. अभ्यासामुळे सरांबरोबर सायंकाळी फिरणं बंद केलं. मात्र सरांकडे रविवारी जेवायला जायचो. पण अरुणा दिसायची नाही. ती गाणे आणि गाण्याचे कार्यक्रम यांच्यात अडकली होती. हल्ली बर्याचवेळा विनोद नगरकर युनिव्हर्सिटीत दिसायला लागला. दोन-तीन वेळा अरुणा विनोदच्या मोटरसायकलवर बसून युनिव्हर्सिटीत दिसली. सरांचे याकडे लक्ष होते का कोण जाणे? मी मात्र गप्प होतो.
फायनल परीक्षा झाली आणि मी भरपूर पुस्तके घेऊन गावाकडे गेलो. माझा मागचा भाऊ अकरावीत होता. त्याच्या मागचा नववीत होता. बहीण पाचवीत होती. आता लवकरात लवकर नोकरीला लागायचे आणि मागच्या भावंडांचे शिक्षण करायचे हे ठरविलेच होते. गावी येऊन जेमतेम पंधरा दिवस झाले असतील नसतील. एवढ्यात सरांची तार आली.
“ताबडतोब येऊन घरी भेट…”
मी घाबरलो… म्हटले, रिझल्टला अजून पंधरा दिवस बाकी आहेत. मग सरांनी तातडीने का बोलावले?
मी दुसर्याच दिवशी एसटीत बसलो आणि सरांकडे पोहोचलो. सर हॉलमध्ये जोराजोरात फेर्या घालत होते. मी गेट उघडून आत गेलो सरांनी मला पाहिले आणि दार उघडून आत घेतले. मी आत येताच दार बंद केले आणि मला घेऊन बेडरूममध्ये आले. मी सरांच्या बेडरूममध्ये कधीच आलो नव्हतो. मी सरांकडे पाहिले, सरांचा असा अवतार मी कधीच पाहिला नव्हता. कदाचित, एक-दोन दिवस सर धड झोपले नसावेत. कपडे चुरगळलेले होते. दाढी वाढलेली होती. मी बेडमधील खुर्चीत बसल्याक्षणी सरांनी चिडून बोलायला सुरुवात केली…
‘‘मनोहर, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. गरीब, पण हुशार मुलगा म्हणून मी तुला जवळ केले. तुला घरी घेतले. कधीही घरी येण्याची मुभा दिली. पण तू गैरफायदा घेतलास. मला अडचणीत आणलेस.’’
‘‘सर, काय झालं?’’ मला समजेना.
‘‘अरुणा दोन महिन्यांची गरोदर आहे.’’
‘‘काय?’’
‘‘होय, आणि तिने तुझे नाव घेतले!’’
‘‘माझं?’’
‘‘होय, तुझं…’’
‘‘पण मी…. माझा काही संबंध नाही ओ सर…’’
‘‘नाही कसा, नाहीतर या घरात दुसरं कोण येतं?’’
‘‘मला कल्पना नाही सर, पण मी नाही.’’
‘‘तूच असणार, ती तुझं नाव घेते, ती उगाचच नाव का घेईल? आता एकच उपाय ताबडतोब अरुणाशी लग्न कर आणि दुसर्या शहरात नोकरीला जा.’’
‘‘सर नाही ओ, कसं शक्य आहे? सर, तुम्ही नसताना या घरात फारसा येत नाही आणि आलोच तर पुस्तकं द्यायला, पण हॉलमध्येही कधी जात नाही…’’
हेही वाचा – एका संपाची कहाणी
‘‘खोटं बोलू नकोस, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अब्रूचा प्रश्न आहे. पुढील आठवड्यात तुमचे लग्न करूया आणि मग तुला जिल्ह्यातील कोणत्यातरी कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी मिळविण्याची व्यवस्था करतो.’’
‘‘नाही, ओ सर. हा माझ्यावर विनाकारण आळ आला आहे. मी गरीब आईवडिलांचा मुलगा आहे. माझ्यावर माझ्या भावंडांची जबाबदारी आहे. मी यावेळी कुणाशीही लग्न करू शकत नाही.’’
‘‘मग चालता हो, आणि पुन्हा मला तोंड दाखवू नकोस.’’ सर कडाडले आणि रागाने थरथरत सरांनी मला धक्के मारत बाहेर काढले आणि दार बंद करून घेतले.
सरांच्या घराचे दार माझ्यासारख्या खेडेगावातील विद्यार्थ्याला सताड उघडे होते, तेच दार माझ्यासाठी कायमचे बंद झाले होते. मी थरथरत होतो. कसला आरोप सरांनी माझ्यावर केला? आणि अरुणाने माझे नाव का घ्यावे? मी गरीब आहे म्हणून? मी खालच्या जातीचा आहे म्हणून? की माझ्या कुटुंबातील कोणी जाब विचारणारा नाही म्हणून?… मला रडू येत होते. सरांची कशी समजूत घालू मी? सरांची वेगवेगळी रूपंही पाहिली होती मी. माझे फाटके कपडे पाहून नवीन कपडे शिवणारे सर, मी आजारी पडलो तेव्हा घरी घेऊन जाणारे सर, रोज सोबत फिरायला नेणारे सर, मला हवी ती पुस्तके देणारे सर… सरांची ही रूपे मनाला आनंद देत होती. पण आजचे सरांचे रुप…?
मी गावी आलो. पंधरा दिवसांनी अंतिम रिझल्ट लागला. मी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालो. माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. वेगळी परिस्थिती असती तर, मी पेढे घेऊन सरांकडे गेलो असतो. सरांना किती आनंद झाला असता? सरांना कदाचित माझा रिझल्ट कळलाही असेल. अरुणाचे पुढे काय? अनेक प्रश्न…
क्रमश:


