Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeअवांतरसंवादाची भाषा झाली ‘ॲडव्हान्स’

संवादाची भाषा झाली ‘ॲडव्हान्स’

आराधना जोशी

शिक्षक म्हणून ज्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांमध्ये वावरत असतो, त्यावेळी कळत-नकळतपणे संवादाचे अनेक तुकडे आमच्या कानावर येतात. मित्र किंवा मैत्रिणीला साधी हाक मारतानाही सुरुवातीला ‘साल्या’ किंवा ‘साली’ आणि नंतर नाव उच्चारलं जातं. ‘ही शिवी नाहीच आहे मॅम,’ अशीही माझी समजून घालण्यात आली. ‘अशी हाक मारली तर अत्यंत जिव्हाळा दिसून येतो!’ या एकमतानं दिलेल्या उत्तरावरून विद्यार्थ्यांची मानसिकता कशी बदलत चालली आहे, याचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे ‘च्या आयला’ ही शिवी नसून भावना व्यक्त करण्याचं माध्यम असल्याचंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जितक्या सहजपणानं ‘आई गं’ किंवा ‘अरे बापरे’ म्हणता तेवढ्याच सहजपणे आम्ही ‘च्या आयला’ म्हणतो, असा युक्तीवाद विद्यार्थ्यांनी केला.

याच पठडीतील एक घटना विसरत न येण्यासारखी आहे. परीक्षेचा शेवटचा दिवस… पेपर संपला… अर्धे सेमिस्टर संपल्याचा आनंद… विद्यार्थी हळूहळू परीक्षा हॅालमधून बाहेर जात होते… सुपरव्हायझर पेपरचं बंडल हजेरी क्रमांकानुसार लावण्यात गुंग… अचानक एक मुलीनं मैत्रिणीला घातलेल्या ‘भ’वरून सुरू होणाऱ्या दोन कचकचीत शिव्या… आपल्याच शिक्षकांसमोर आपण अशा शिव्या दिल्याचं आलेलं भान…. त्यावरून परत परत मागितलेली माफी… एखाद्या कथा, कादंबरी किंवा चित्रपटात शोभणारा हा प्रसंग माझ्यासमोर घडला आणि महाविद्यालयीन मुलांचीच नाही तर मुलींचीही भाषा याबाबतीत किती ‘ॲडव्हान्स’ झाली आहे, याची कळत नकळत जाणीव झाली. यासंदर्भात एक शिक्षक म्हणून माझी काही ठाम भूमिका असली तरी यावर विद्यार्थ्यांची मतं जाणून घ्यायलाही मी उत्सुक होते.

खरंतर शिवी म्हणजे अवमानकारकच! एखाद्याच्या भावना दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणं म्हणजे शिवी. शिव्यांचा वापर हा स्थल, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ भाषेत बोलणं असभ्य समजलं जातं. मात्र हल्ली विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं शिवी देत बोलणं म्हणजे ‘ॲडव्हान्स’ भाषा आहे. ही भाषा ज्याला किंवा जिला बोलता येत नाही ते इतरांच्या दृष्टीनं टिंगल करण्याचा विषय बनतात. अनेक विद्यार्थ्यांच्या मते समवयस्क व्यक्तींशी बोलताना अशा ‘ॲडव्हान्स’ भाषेचा सहजपणानं वापर होतो; त्यामागे फक्त एक गंमत, दिलखुलासपणा एवढाच भाग असतो. अनेकदा आनंदाच्या प्रसंगीही अगदी सहजपणानं ‘ॲडव्हान्स’ भाषा आम्ही वापरतो, असंही निरीक्षण याच विद्यार्थ्यांनी मांडलं. यामध्ये मित्र-मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून ते हातात आलेली प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी असल्याचं पाहूनही अनेक ‘ॲडव्हान्स’ शब्द तोंडाबाहेर पडत असल्याचंही विद्यार्थी सांगतात.

हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य

अनेक विद्यार्थिनींना अशा ‘ॲडव्हान्स’ भाषेत बोलल्यामुळे आपण प्रस्थापित समाजाच्या विरोधात उभं राहून काहीतरी कृती करत असल्याचा समज होतो. समाजानं घातलेल्या अनेक कथित ‘अन्यायकारक बंधनांनी’ जखडलेल्या या विद्यार्थिनींना अशा ‘ॲडव्हान्स’ भाषेच्या वापरामुळं एक मानसिक समाधान मिळत असल्याचं तसंच आपणही विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही कमी नसल्याचं दाखवून देणारी ही कृती वाटते. मुलं-मुलींच्या ‘मिक्स ग्रुपमध्ये’ बोलतानाही ‘ॲडव्हान्स’ भाषा सर्रास वापरली जाते आणि त्याबद्दल ग्रुपमध्ये कोणालाही काहीही आक्षेप नसतो.

आमची ही चर्चा सुरू असताना एक विद्यार्थी उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं. त्याच्या बोलीभाषेत असे ‘ॲडव्हान्स’ शब्द अगदी सर्रास वापरले जातात. मग ते लहान मूल असो वा आजोबा. हे शब्द आक्षेपार्ह आहेत, मग आमच्या भाषेत ते कसे? असा प्रश्न विचारून त्यानं मलाच कोड्यात टाकलं. खरतर ‘ॲडव्हान्स’ शब्द वापरणं हे सभ्यतेला धरून नाही, पण प्रत्येक भाषेत असे भरपूर ‘ॲडव्हान्स’ शब्द असतात ते नेमके कशासाठी? असाही त्याला प्रश्न पडला होता. शिक्षक म्हणून यांची उत्तरं देणं मला क्रमप्राप्त होतं. तरीही विद्यार्थ्यांनी मांडलेले मुद्दे अगदीच दुर्लक्षित करून चालण्यासारखे नव्हते.

आजची ही पिढी ऐकणारी आहे, पाहणारी आहे; पण वाचणारी नाही. इंग्रजी आणि हिंदी मिश्रित मराठी भाषा महाविद्यालयीन विश्वात बोलली जाते. बदलत्या जगानुसार आपण पोशाखापासून राहणीमानापर्यंत सगळ्या गोष्टी बदलल्या, मग या साऱ्यात भाषेत बदल होणं स्वाभाविकच आहे, असंही या विद्यार्थ्यांना वाटतं. हल्ली तर चावडीपासून विधानभवन, संसदभवन ते खेळाच्या मैदानापर्यंत सर्वच ठिकाणी अशा ‘ॲडव्हान्स’ भाषेचा उपयोग केला जातोय. चित्रपटातही सीन प्रभावी व्हावा म्हणून मुद्दाम असे शब्द वापरले जातात. अनेक राजकीय भाषणांमध्ये नेतेही सहजपणे असे शब्द उच्चारून टाळ्या मिळवतात, असंही मत विद्यार्थी नोंदवताना दिसतात.

विद्यार्थ्यांच्या या निरीक्षणांनंतर मी त्यांना या ‘ॲडव्हान्स’ शब्दांचे अर्थ विचारायला लागले, तेव्हा मात्र ते कोणालाच सांगता येईनात. फक्त अशा शब्दांचा वापर करून बोलायचं, एवढाच त्यांचा उद्देश असायचा. ‘संभाषणात्मक कौशल्य’ हा विषय शिकणारे हेच विद्यार्थी एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसताना केवळ फॅशन म्हणून जर असे ‘ॲडव्हान्स’ शब्द वापरत असतील तर ते नक्कीच काळजी करायला भाग पाडणारं आहे. यासाठीच ज्यांचे अर्थ मला माहीत होते किमान तेवढे शब्द तरी मी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांचे अर्थ कळल्यानंतर आत्ता आत्तापर्यंत या ‘ॲडव्हान्स’ शब्दांची बाजू घेऊन बोलणाऱ्या याच विद्यार्थ्यांची समज वाढली की, ज्ञान हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

हेही वाचा – नवी पिढी, ब्रॅण्डेड पिढी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!