Saturday, March 7, 2026

banner 468x60

Homeललितआराध्याने सुमित्रा आजींच्या घरी प्रवेश केला अन्…

आराध्याने सुमित्रा आजींच्या घरी प्रवेश केला अन्…

प्रणाली प्रशांत वैद्य

भाग – 15

सुनंदा निघून गेल्यावर प्राजक्ता खिडकीजवळ येऊन उभी राहिली. तिच्या नजरेत एक वेगळीच शांतता उतरली होती… “माझी मुलगी वापरण्याची वस्तू नाही… आता ती स्वतःचं आयुष्य जगायला शिकतेय आणि मी तिच्यासाठी, शेवटी एक आई म्हणून, उभी राहणारच!”

त्या क्षणी निशा आणि अन्वी, त्यांच्या कपातल्या कॉफीपेक्षा जास्त कडवट विचारांत बुडालेल्या होत्या… आणि प्राजक्ता मात्र एका नव्या उगमाचं स्वागत करत होती – जिथे आराध्या आता स्वतः चा शोध घेत होती…

निशा चिडलेल्या अविर्भावात, कमरेवर हात ठेवत सरळ स्वयंपाकघरात आली. तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि डोळ्यांतल्या संतापाची तीव्रता लपवणं शक्यच नव्हतं…

“प्राजक्ता, काय गं हे? कोण कुठली म्हातारी आली आणि तू आराध्याला पाठवलंस तिच्यासोबत? तिला कुठं ठेवलं, काय शिकवलं, काही माहिती आहे का तुला? एवढा सहज विश्वास ठेवतेस तू?”

प्राजक्ता फोडणी घालत होती. पण निशाकडे एक नजर टाकली आणि तिनं गॅस बंद केला. अत्यंत संयमी स्वरात ती म्हणाली —

“सुमित्रा मावशी काही कुणीही नाहीत. त्या आजींच्या मैत्रीण आहेत, माझ्या सासूबाईंच्या बालमैत्रीण आणि त्यांचं वागणं, बोलणं, अनुभव… हे सगळं आपण गेल्या काही दिवसांत पाहिलंच आहे. त्यांनी आराध्याला प्रेम दिलं, समजून घेतलं. त्या तिच्या भल्यासाठीच तिला घेऊन गेल्या आहेत.”

निशा हसली, पण नाखुशीनेच.

“हो का? मी नसते पाठवलं अन्वीला कधीच अशा कुठल्या आजीच्या मागे… आराध्या आहे म्हणून पाठवलंस… काम करते, ऐकते, म्हणून तिला कुठेही पाठवावं असं नाही. पुढे काय होईल, याचा विचार तरी केलास का?”

हेही वाचा – आराध्या गुरूंची शिष्या बनणार! हाच सल निशाच्या मनात…

प्राजक्ता क्षणभर शांत राहिली. मग ती जवळ येऊन निशाकडे थेट पाहत म्हणाली, “मी आई आहे तिची. तिला रोज इथे कोणत्या बोलणी ऐकायला लागतात, काय सहन करावं लागतं, हे बघते आणि ज्या ठिकाणी तिच्या मनाला शांती, मार्गदर्शन मिळतं, तिथे पाठवणं हे चुकीचं नाही. ती मुलगी लहान असूनही खूप सहन करते. आता वेळ आहे तिच्या स्वप्नपूर्तीची, तिच्या उड्डाणाची… अडकवून ठेवायची नाही.”

निशा शब्द शोधत राहिली… पण त्या क्षणी तिचा राग हा अडसर ठरला होता. कारण प्राजक्ताच्या डोळ्यांत एका आईची ताकद होती, काट्यांवर चालून निर्माण झालेली. निशा मात्र थरथरत मनाशीच म्हणाली – “ही प्राजक्ता आधी कधी काही बोलली नाही…”

निशा शांतपणे मागे वळली, पण तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा हा वादळाआधीची शांतता होती. ती आतून खवळली होती… कारण आज प्रथमच प्राजक्ताने तिच्याशी डोळ्याला डोळा लावून, धीटपणे आपलं मत मांडलं होतं आणि सगळ्यात जास्त झोंबणारं म्हणजे, सुशांतही तिच्या बाजूला शांतपणे उभा होता.

ती आपल्या खोलीत आली. दरवाजा बंद करून भिंतीवर ताडकन हात आपटून म्हणाली, “हे बरोबर नाही चाललंय… ही प्राजक्ता आज आपली ताकद दाखवत असेल, तर उद्या आराध्या…?”

निशाच्या मनात आता गोंधळाचं काहूर माजलं होतं. तिला जाणवत होतं की, घरातल्या सगळ्या नजरा आता आराध्याकडे वळल्या आहेत. अन्वी जरी सुंदर, स्टायलिश असली तरी तिच्या अंगात असलेल्या उथळपणाला आता सगळे ओळखू लागले होते.

ती खुर्चीवर बसली, कपाळावर हात ठेवून विचार करू लागली — “आपल्या हातून सगळं निसटून चाललंय… अन्वी सगळ्यांच्या नजरेतून उतरतेय आणि ही आराध्या मात्र हळूहळू केंद्रस्थानी येतेय… काहीतरी करावं लागेल… वेगळं… सगळ्यांचं लक्ष परत अन्वीवर केंद्रित होईल असं…”

तिच्या मनात आता नवीन डाव तयार होऊ लागला होता — एखादा कार्यक्रम, एखादी योजना किंवा काहीतरी भक्कम, जे अन्वीला पुन्हा केंद्रस्थानी आणेल आणि आराध्या पुन्हा त्या ‘कामवाली’च्या चौकटीत परत जाईल… निशाचा चेहरा आता थोडा शांत झाला होता. तिच्या मनात एक गोष्ट नक्की ठसली होती — “आई म्हणून ती काहीही करेल… अगदी पांढऱ्याला काळं आणि काळ्याला पांढरं दाखवण्यापर्यंत!”

आराध्या आणि सुमित्रा आजी गाडीतून उतरल्या आणि ज्या क्षणी तिची नजर त्या घरावर गेली, तिचे डोळे विस्फारले गेले. इतकं देखणं, आलिशान आणि शांततेनं भरलेलं घर तिने आजवर फक्त स्वप्नातच पाहिलं होतं… पुढे एका काळ्या लोखंडी गेटमधून गाडी आत शिरली. दोन्ही बाजूंना छानशा नक्षीदार झाडांची रांग होती. फुलांच्या बहराने अवतीभवती प्रसन्नता पसरली होती. लांबच लांब गवताचा गालिचा, मधोमध पायवाट, आणि त्या पायवाटेच्या टोकाला उभं होतं ते — भव्य, राजेशाही वास्तूचं भान देणारं घर!

घराच्या मुख्य दरवाजावर सुबक नक्षीकाम केलेलं, त्यावर सुंदर घंटा आणि भोवतालचा परिसर अगदी स्वच्छ… भिंतींवर टांगलेले काही शुभचिन्हे आणि दाराच्या वरती कोरलेला संस्कृत श्लोक :

“शिवाय नमः। ज्ञानं ददाति विनयं।”

आराध्या अवाक् होऊन सगळं पाहत राहिली. तिच्या मनात एकाच वेळी खूप काही चालू होतं — हे घर म्हणजे केवळ वास्तू नव्हतं, तर एखाद्या वेगळ्याच जगातलं प्रवेशद्वार वाटत होतं. तिला वाटलं,

“इथे काहीतरी विशेष आहे… काहीतरी असं, जे माझ्या आयुष्याला दिशा देईल.”

सुमित्रा आजीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाल्या, “याच ठिकाणी तुझ्या आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची सुरुवात होणार आहे आराध्या… तयार आहेस ना?”

हेही वाचा – गुरुजी म्हणतात, तुझा जन्म काही कारणासाठी आहे आराध्या!

आराध्याने हळूवारपणे मान हलवली… पण तिचे डोळे अजूनही त्या घराच्या सौंदर्याने, त्यात दडलेल्या रहस्यांनी आणि त्या जागेच्या पवित्रतेने भारावलेले होते.

सुमित्रा आजींच्या गाडीचा आवाज ऐकताच घरातलं वातावरण हलकंसं चैतन्याने भरून गेलं. मुख्य दाराजवळ उभा असलेला मदतनीस रामू झपकन पुढे आला.

“आल्या आजी! राम राम!” तो म्हणाला आणि लगेच गाडीच्या डिकीकडे वळून बॅग काढू लागला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच आदर आणि प्रेम ओसंडून वाहत होतं.

“कसं काय चाललंय तुमचं? तब्येत ठीक आहे ना?” त्यानं उत्सुकतेनं विचारलं.

“बरंय हो रामू, तुझ्या आशीर्वादानं सगळं छान आहे,” आजी हसत म्हणाल्या.

तेवढ्यात सुमित्रा आजीनं हलकेच आराध्याच्या पाठीवर हात ठेवत तिला सांगितलं, “या आपल्या घरी आहेस आता, संकोचू नको. चल, आत जाऊया.”

त्यांनी आत प्रवेश केला, आतून मंद सुवास बाहेर येत होता — चंदनाच्या अगरबत्तीचा. घरातल्या पायऱ्या चढताना सुमित्रा आजीनं रामूला सांगितलं, “आनंदीला सांग, मी आलेय आणि आराध्या पण आली आहे. दारात ये म्हणून सांग.”

मग काय — लगेच आत धाव घेतलेली रामूची बायको, मीनाबाई, आनंदीपर्यंत पोहोचली आणि बातमी दिली. ती ऐकताच आनंदीने हाताचं पीठ झटकत उभं राहत साडीचा पदर सांभाळला आणि ती थेट दारात आली. दारात येऊन पाहताच — तिचा चेहरा खुलला…

“आईसाहेब! तुमचीच वाटच पाहात होते. तुमचं घरातलं पाऊल म्हणजे घरात साक्षात लक्ष्मीचं आगमन वाटतं,” असं म्हणून ती पुढे झाली… आराध्याकडे पाहून ती क्षणभर थबकली.

“ही आराध्या?” तिने कुतूहलानं विचारलं.

सुमित्रा आजी हसत म्हणाल्या, “हो, ही आराध्या — खास आहे माझ्यासाठी. तिच्या आयुष्यातला नवा अध्याय आपल्या घरातून सुरू होतोय, आनंदी. आपणच बघायचं तिच्यातलं तेज फुलवता येतं का ते.”

घराच्या ओसरीत आता एक नवा श्वास आला होता — साक्षात परिवर्तनाचं प्रथम पाऊल पडलं होतं… आराध्याने जेव्हा घरात पाऊल टाकलं, तेव्हा तिच्या नजरेला भुरळ घालणारं सौंदर्य सगळीकडून तिच्या मनात खोलवर उतरू लागलं… छताला लटकलेलं सुंदर झुंबर, भिंतींवर टांगलेली पारंपरिक चित्रं आणि कोपऱ्यात एक मोठ्ठं विठोबा-रखुमाईचं सुंदर मूर्ती असलेलं मंदिर… सारं काही एक विलक्षण शांतीचं आणि दिव्यतेचं प्रतीक होतं.

तिचे डोळे एकामागोमाग एक दृश्य वेधून घेत होते. घरभर पसरणाऱ्या चंदनाच्या आणि तुळशीच्या सुवासात एक सृजनशील सात्विकता होती. ओसरीवरून मऊशार पायघड्या टाकत, सुमित्रा आजी आराध्याला आतल्या बैठकीकडे घेऊन जात होत्या.

“हे बघ आराध्या,” आजी म्हणाल्या, “हे घर फक्त दगडमातीचं नाही, इथे वर्षानुवर्षांचा विश्वास, श्रद्धा आणि संस्कार आहेत. जेव्हा गुरूजींचं पहिल्यांदा इथे आगमन झालं, तेव्हाच हे घर त्यांच्या आशीर्वादाने पवित्र झालं.”

आराध्या शांतपणे सगळं ऐकत होती, पण तिच्या मनात एक वेगळाच भाव उमटत होता — इथं तिला कुठेतरी आपल्या अस्तित्वाचं स्थान सापडेल असं वाटत होतं.

तेवढ्यात आनंदी फुलांचं ताट आणि गोडधोड घेऊन आली.

“आराध्या बेटा, थोडं खाऊन घे. तू आमच्या घरी आलीस हेच खूप आहे. सासूबाईंच्या तोंडून तुझ्याबद्दल खूप ऐकलंय.”

आराध्या थोडी संकोचत पुढे सरसावली… “धन्यवाद काकू,” ती हळूच म्हणाली.

सुमित्रा आजी त्यावर हसल्या, “हे बोलणं आजच ऐक. उद्या गुरूजींना भेटल्यावर तुझं मनच बदलेल. आपलीच ओळख तिथे खरी होते.”

आराध्या थोडं आश्चर्यचकित झाली. तिच्या आयुष्यात एवढ्या सहजतेनं कोणीतरी तिचा हात धरून नवं दार उघडून देईल, असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या मनातला गोंधळ, भीती आणि आतापर्यंतचा तिरस्कार… काही क्षणांसाठी तरी मागं सरकला होता. आता तिचं आयुष्य एका नव्या दिशेकडे वळत होतं — गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली.

क्रमशः

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!