मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास याबाबत जाणून घेणार आहोत. प्राणायाम ही अष्टांग योगातील चवथी पायरी आहे. आता आपण प्राणायाम या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
प्राणायाम म्हणजे काय?
प्राणायाम हा संस्कृत शब्द आहे.
प्राण + आयाम = प्राणायाम
प्राण म्हणजे चेतना अथवा शक्ती अथवा ऊर्जा होय. सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक शक्ती म्हणजे प्राणशक्ती होय. आयाम म्हणजे नियंत्रण करणे. प्राणायाम म्हणजे प्राणशक्तीवर नियंत्रण. श्वसनपद्धती नियंत्रण करण्याची कला म्हणजे प्राणायाम होय.
प्राणायामाची आवश्यकता
आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करण्याचे प्राणायाम हे अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त साधन आहे. प्राणायाम अभ्यासाचा उद्देश मनःशांती आणि मनःस्वाथ्य प्राप्त करणे असा आहे. यावरून प्राणायाम अभ्यासाची आवश्यकता खचितच अधोरेखित होते.
हेही वाचा – दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
प्राणायामाची पूर्वतयारी आणि महत्त्वाचे मुद्दे
- प्राणायाम सकाळी रिकाम्या पोटी करावा. तसे न जमल्यास सायंकाळी रिकाम्या पोटी करावा.
- प्राणायामाची जागा शांत, स्वच्छ आणि हवेशीर असावी.
- पोषाख सैलसर आणि सुटसुटीत असावा.
- प्राणायामासाठी ध्यानोपयोगी आसनात बसावे. जमिनीवर बसणे अवघड वाटत असेल तर खुर्चीवर बसावे.
- प्राणायाम अभ्यास यथाशक्ती करावा आणि अतिरेक टाळावा.
- प्राणायाम अभ्यास शांत आणि प्रसन्न मनाने करावा.
प्राणायामाचे प्रकार
प्राणायामाचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत :
- सुलभ प्राणायाम
- चंद्रानुलोम – विलोम प्राणायाम
- सूर्यानुलोम – विलोम प्राणायाम
- चंद्रभेदन प्राणायाम
- सूर्यभेदन प्राणायाम
- अनुलोम-विलोम प्राणायाम
- भ्रामरी प्राणायाम
- उज्जायी प्राणायाम
- भस्त्रिका प्राणायाम
- सीत्कारी प्राणायाम
- शीतली प्राणायाम
प्राणायामाच्या काही प्रकारांचा अभ्यास करत असताना प्राणायाम मुद्रा म्हणजे प्रणव मुद्रा याचा उपयोग करावा लागतो.
त्रिबंध आणि प्राणायाम
प्राणायाम अभ्यास कुंभकरहित अथवा कुंभकसहित करतात. श्वास रोखण्याच्या क्रियेला कुंभक म्हणतात. प्राणायाम अभ्यास कुंभकसहित अधिक कालपर्यंत करावयाचा असल्यास पुढील त्रिबंधांचा उपयोग करणे अनिवार्य आहे :
- जालंधर बंध
- मूलबंध
- उड्डियान बंध
हे त्रिबंध विशिष्ट पद्धतीने बांधण्यासाठी तसेच सोडण्यासाठी सखोल शास्त्रशुद्ध तसेच प्रत्यक्ष वैयक्तिक मार्गदर्शन आवश्यक आहे.
वास्तविक, कुंभकरहित प्राणायाम सहजसाध्य आहे. कुंभकरहित प्राणायामाचे यथायोग्य आरोग्य लाभ खचितच मिळतात.
हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
प्राणायामाचे आरोग्य लाभ
- प्राणायामाच्या विविध प्रकारांच्या अभ्यासातून साधकास अनंत शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ प्राप्त होतात.
- प्राणायामाने रक्तशुद्धी, श्वसनशुद्धी तसेच शरीरातील सर्व नाड्यांची शुद्धी होते.
- प्राणायाम अभ्यासाने मानसिक विकार दूर होण्यास साहाय्य लाभते.
- प्राणायाम ही आपल्या निरामय आरोग्याची संजीवनी आहे.
दैनंदिन योग साधना करताना कपालभाती अभ्यास झाल्यावर प्राणायामाचा अभ्यास यथाशक्ती क्षमतेनुसार करावा.
योगाभ्यासातील विविध प्राणायाम प्रकार, कृती आणि फायदे तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


