डॉ. श्रीकांत राजे
होमिओपॅथी चिकित्सक
वेळ सकाळी सातची. मी स्टेशनरी दुकानात गेलो होतो. त्यावेळी एक युनिफॉर्ममधला, नावाजलेल्या शाळेचा विद्यार्थी दुकानात आला. वडील गाडीत बसले होते. मुलगा दुकानदाराला म्हणाला, “काका थम्सअप आहे? हं, एक स्प्राइट द्या… आणि एक एनर्जी ड्रिंक द्या.”
माझ्यासमोर त्याने आपल्या शाळेची वॉटर बॅग उघडली. फसफसणारे सॉफ्ट ड्रिंक त्याने एकत्र करून त्या वॉटर बॅगमध्ये भरले. रिकाम्या झालेल्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्या तशाच ठेवल्या. “काका, बाबा म्हणाले हे पैसे उद्या देतो…” असे म्हणून आपल्या गाडीत बसून निघून गेला.
मोठ्या “हाय प्रोफाइल” शाळा आम्ही निवडल्या. तेथील ‘कल्चर’ कशा प्रकारच्या धोकादायक वळणावर आहे, त्याचा हा एक अनुभव.
सकाळच्या शाळा… चांगल्या आहाराचा नावापुरताच आग्रह धरणारे शिक्षक… स्वच्छतागृहाची व्यस्त संख्येमध्ये असणारी उपलब्धता… आपला डबा सोडून इतरांच्या डब्यातील ‘नको तो आहार’ घेऊन डबा ‘फिनिश’ करणारे विद्यार्थी… घरचा डबा कचरापेटीत टाकून घरच्या पालकांना समाधान देणारे विद्यार्थी… अशा आपल्या हाय प्रोफाइल शाळा आणि तिथे असणारी ‘हाय प्रोफाइल संस्कृती’! पालकांना फक्त मिळणाऱ्या ‘परसेंटेज’मध्ये, संस्थांना फक्त मिळणाऱ्या ‘डोनेशन’ आणि ‘फी’मध्ये रस आहे…
हेही वाचा – ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य
अशी पिढी भविष्यामध्ये समाजासाठी एक संकट ठरू शकते, याचे भान आम्हाला नाही! बर्थडे, पिंक डे, कल्चरल प्रोग्रॅम यामध्ये आम्ही किती वाहवत जातो, याचे भान नसते. पुढील काळाने आमच्या परिवाराचे परतण्याचे दोर कापलेले असतील…
कट् टू……
वेळ संध्याकाळची माझ्या घराबाहेर काही लहान मुलं नेहमी खेळत असतात. मी त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देतो. किमान ते मोबाइलपासून दूर असतात, याचा मला आनंद असतो. सुरुवातीला ‘डॉक्टर काका’ म्हणणारे, नंतर मला सहजतेने फक्त ‘काका’ म्हणू लागले…
मी त्यांना साधे-सरळ खेळ शिकवू लागलो. संघाच्या शाखेमध्ये कोणतीही साधनं नसताना केवळ शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांना आवाहन करून, कधी ‘उभा खो’, कधी ‘खो -भगवा’, कधी अग्निकुंड, फळ ओळखणे, नेता ओळखणे, आरसा… असे खेळ असतात… तशाच प्रकारचे खेळ मी त्या मुलांचे घेऊ लागलो. एकदा ‘फळ ओळखणे’ या खेळामध्ये आपण एक फळ ठरवायचे आणि ज्याच्यावर राज्य आहे, त्यांनी त्याचे वर्णन विचारून, ऐकून ते फळ ओळखायचे, असा हा साधा सरळ खेळ होता. फळ ठरविताना सर्वच मुलांनी स्ट्रॉबेरी, किवी, ड्रॅगन फ्रुट, ॲप्पल अशीच फळं सांगणे सुरू केले!
आमचीच असणारी इतकी फळं, त्यांचे ऋतू, त्यांचे गुणधर्म, आम्ही का विसरलो…? कारण आम्ही विसरतोय आमचं कल्चर. पाश्चात्य रीती-रिवाजानुसार आम्ही आचरण केल्यानंतर आम्हाला आमची फळं कशी आठवतील?
हेही वाचा – योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य
आमचे दिवाळीतील फराळाचे पदार्थ विसरून आम्हाला ‘नूडल्स’ आणि ‘पास्ता’ यांचे व्यसन लागले आहे. एकदाच तर खाल्ले त्याने काय बिघडणार, असे म्हणता म्हणता अशा फूड कल्चरचा गळफास आम्हाला कधी लागला, हे कळणार नाही. तिथून पुन्हा परतीचे रस्ते बंद झालेले असतील!
सकाळी सकाळी सॉफ्ट ड्रिंक घेणारी पिढी बघितली. कधी कधी त्यामधील सोडियम बायकार्बोनेट याचा अतिरेक होतो आणि त्यामुळे पचनाचे विकार तर मागे लागतात! परंतु पचन संस्थेच्या कॅन्सरची आम्ही बालवयातच पायाभरणी करत असतो. अजिनोमोटो, सेलिसिलीक ॲसिड क्रिस्टल, प्रिझर्वेटिव्हज, सोडा बाय कार्ब अशा घटकांमुळे पचन संस्थेचा कर्करोग होण्यासाठी आम्ही राजमार्ग तयार करीत आहोत. आमच्याजवळ आरोग्य विमा आहे, याचा अर्थ दवाखान्याच्या खर्चाची व्यवस्था आहे!
पण आनंदी आयुष्याला पर्याय नाही, हे कधी लक्षात घेणार? आता तरी त्यासाठी वाटचाल करू या… आरोग्याची आनंदी पहाट बघू या…
मोबाइल – 9921 548 851


