डॉ. विवेक वैद्य
अप्पासाहेब इनामदार वारल्यानंतर बरोबर पंधराव्या दिवशी तात्या त्यांच्या बंगल्यावर गेले. अप्पासाहेबांच्या खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या मुलाला, माधवला नमस्कार करत म्हणाले, “मी तात्या राहाणे. तुम्ही बंगला फर्निचरसकट विकायला काढला असे कळाले?”
“हो. तुम्हाला इंटरेस्ट आहे?” त्यांच्या सामान्य व्यक्तिमत्वाकडे पाहून माधवने काहीसे आश्चर्याने विचारले.
“नाही हो, एवढी माझी परिस्थिती नाही… पण एक विनंती करायला आलोय.”
“काय?” राघवने संशयाने विचारले. गरीबीचे सोंग घेऊन पैसे मागणारे बरेच जण त्याला भेटले होते.
“अप्पांना वाचनाची आवड होती. त्यांनी बरीच पुस्तके विकत घेतली होती… साहित्यापासून ते वैदकशास्त्र ज्योतिषशास्त्रापर्यंत. जर ती पुस्तके चांगल्या स्थितीत असली तर, ती मला हवी आहेत. मला म्हणजे आमच्या वाचनालयाला.”
हेही वाचा – स्वभाव बदल… वयानुसार की, परिस्थितीनुसार?
“किंमत किती द्याल?” राघवने डोळे रोखून विचारले, तसे तात्यांनी घाम पुसला, घसा खाकरला अन् म्हणाले, “वाचनालयाला मिळणारी सरकारी मदत तुटपुंजी आहे. आम्ही केवळ वाचनप्रेमापोटी काम करतोय. आम्ही काय पैसे देणार?”
“ठीक आहे. एक प्रस्ताव देतो. वाचनालयाच्या एका दालनाला अप्पासाहेबांचे नाव द्या. मी सगळी पुस्तके फुकट देतो.”
“……..”
“का हो, बोलत का नाहीत?”
“वाचनालय छोटेसे आहे. त्याला दालनच नाही तर, नाव कसे देणार? येतो मी.”
“थांबा. चहा घेऊन जा.”
“नको… खरंच नको. धन्यवाद.”
” बसा हो. चहा घ्या.”
तात्या संकोचाने बसले. काय बोलावे त्यांना कळेना. चहा घेऊन त्यांनी पुन्हा घसा खाकरला, म्हणाले,
“येतो मी.”
“थांबा. मला काही गोष्टी विचारायच्या आहे. वाचनालय कोण चालवते? म्हणजे मालक कोण?”
“नगर परिषद!”
“नवीन दालन किंवा खोली बांधता येईल का तिथे? म्हणजे जागा आहे का तिथे?”
“जागा आहे भरपूर. नगर परिषद मान्यता देईलही…पण निधी?”
थोडा वेळ शांततेत गेला.
“ठीक आहे,” माधव म्हणाला. “मी सगळी पुस्तके द्यायला तयार आहे… पण एक अट आहे!”
“साहेब, तुमची अट मान्य करणे शक्य नाही.”
“अट दुसरी आहे. तुम्ही वाचनालयासाठी नवीन दालन बांधण्याची परवानगी नगर परिषदेकडून घ्या. दालनाला अप्पासाहेबांचे नाव द्यायचे. बांधकामाचा संपूर्ण खर्च मी देईन. तुम्ही इंजिनीअरकडून एस्टिमेट घ्या. त्या रकमेचा चेक मी देईन. चेक नगर परिषदेच्या नावाने द्यायचा का?”
हेही वाचा – पडू आजारी मौज हीच वाटे भारी…
“मी तपास करतो. धन्यवाद साहेब.” तात्यांना अजून त्यांनी जे ऐकले त्यावर विश्वास बसत नसावा!
माधव उठला… तात्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करत म्हणाला, “आता मला साहेब म्हणणे बंद करा. मला माधव म्हणा. मी इथे फारसा राहिलो नाही… पण तुमच्यासारखे सच्चे आणि निरपेक्ष मनाने वाचनसंस्कृतीला वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे थोडे राहिलेत.”
त्याला हाताने धरून वरती उठवत आपल्या मिठीत घेत तात्या फक्त ‘माधवा’ म्हणू शकले, कारण त्यांचा आवाज भरून आला होता…


