Wednesday, March 4, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : तें उगाणिलें मज कर्म, तेव्हाचि पुसिलें मरण जन्म…

Dnyaneshwari : तें उगाणिलें मज कर्म, तेव्हाचि पुसिलें मरण जन्म…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणें । आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥395॥ येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ । वांचूनि आमुचा लाग निष्कल । भक्तितत्त्व ॥396॥ म्हणोनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धि एकी सोपारी करीं । तरी सहजें आपुलां मनोमंदिरीं । न विसंबें मातें ॥397॥

यत् करोषि यदश्नासि यज् जुहोषि ददासि यत् । यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम् ॥27॥

जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी । अथवा यज्ञीं यजिसी । नानाविधीं ॥398॥ नातरी पात्रविशेषें दानें । कां सेवकां देसी जीवनें । तपादि साधनें । व्रतें करिसी ॥399॥ तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें । तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥400॥ परि सर्वथा आपुलां जीवीं । केलियाची शंका कांहींचि नुरवीं । ऐसीं धुवोनि कर्मे द्यावीं । माझां हातीं ॥401॥

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै: । संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥28॥

मग अग्निकुंडी बीजें घातलीं । तियें अंकुरदशे जेविं मुकलीं । तेविं न फळतीचि मज अर्पिलीं । शुभाशुभें ॥402॥ अगा कर्मे जैं उरावें । तैं तिहीं सुखदुःखीं फळावें । आणि तयातें भोगावया यावें । देहा एका ॥403॥ तें उगाणिलें मज कर्म । तेव्हाचि पुसिलें मरण जन्म । जन्मासवें श्रम । वरचिलही गेले ॥404॥ म्हणऊनि अर्जुना यापरी । पाहेचा वेळु नव्हेल भारी । हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥405॥ या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखाचां सागरीं न बुडिजे । सुखें सुखरूपा घडिजे । माझियाचि अंगा ॥406॥

हेही वाचा – Dnyaneshwari : करितां तापसांची कडसणी, कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी…

अर्थ

मी एक भक्तीच ओळखतो. मग त्या ठिकाणी लहान-थोर अशी निवड करीत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीचे पाहुणे होतो. ॥395॥ बाकी पान, फूल, फळ यांचे अर्पण करणे, ते मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिले तर, आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्त्वच होय. ॥396॥ म्हणून अर्जुना, ऐक. प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे; असे जर करणे असेल, तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू मला विसरू नकोस. ॥397॥

हे कौंतेया, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते (सर्व) मला अर्पण कर. ॥27॥

तू जे जे काही व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा भोग घेशील अथवा अनेक प्रकारच्या यशरूप कर्मांनी हवन करशील ॥398॥ किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाने देशील अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने साधशील किंवा व्रतांचे आचरण करशील ॥399॥ (तात्पर्य) जे जे कर्म, जसे तुझ्याकडून स्वभावत: घडेल (मग ते सांग असो अथवा असांग असो) ते सर्व कर्म माझ्याप्रीत्यर्थ आहे, अशा समजुतीने कर. ॥400॥ परंतु अमूक कर्म मी केले, अशी कर्तृत्वाची आठवण मुळीच आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवू नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर. ॥401॥

या प्रकारे (केले असता) कर्माची जी शुभाशुभफलरूप बंधने, त्यापासून तू मुक्त होशील. (या) संन्यासरूपी कर्मयोगाने युक्त होऊन मुक्त झालास, म्हणजे तू मला प्राप्त होशील. ॥28॥

मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी, अंकुर उत्पन्न होण्याच्या योग्यतेला आचवते, त्याचप्रमाणे मला अर्पण केलेली बरी-वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत. ॥402॥ अर्जुना, ज्या वेळेला कर्मे (अर्पण न केल्यामुळे) शिल्लक राहतात, त्यावेळेला त्यांचे फळ सुखदु:खांच्या रूपाने तयार होते आणि ते भोगण्याकरिता एखादा देह घ्यावा लागतो. ॥403॥ ते कर्म ज्या वेळेला मला अर्पण केले, त्या क्षणीच जन्ममरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले. ॥404॥ म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे. (तर ही याच क्षणी अमलात आण). ती जर उद्या अमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीस (कर्मरहित होण्यास) तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय? ॥405॥ (वर सांगितलेली युक्ती अमलात आणली असता) देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप, त्याच्याशी अनायासे ऐक्य होते. ॥406॥

हेही वाचा – Dnyaneshwari : कर्पूर चंदन अगरु, ऐसेया सुगंधाचा महामेरु…

क्रमश:

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!