दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 फेब्रुवारी 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 01 फाल्गुन शके 1947; तिथि : तृतीया 14:38; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 20:07
- योग : साध्य 18:23; करण : वणिज 25:51
- सूर्य : कुंभ; चंद्र : मीन; सूर्योदय : 07:05; सूर्यास्त : 18:39
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – अनावश्यक चिंता तुमच्या मनात नकारात्मक विचार निर्माण करू शकते. मात्र, मनोरंजन आणि प्रवासाचा बेत यामुळे उत्साह निर्माण होईल. भावनिक नात्यांमध्ये विश्वासाची कमतरता जाणवेल. आर्थिक संघर्षांनंतर इच्छित यश दृष्टीपथात येईल.
वृषभ – विचारपूर्वक कृती केली तर, लगेच त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. इतरांना मदत केल्याने तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. आर्थिकदृष्ट्या इतरांवर जास्त अवलंबून राहण्याचे टाळा. भावंडांसोबतचे जुने प्रश्न सुटतील.
मिथुन – कुठल्याही वादाच्या प्रसंगी संयम बाळगणे आवश्यक आहे. कायदेशीर अडचणी टाळा. बँकिंग आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवा. तसेच, बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा, आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – परिस्थितीत बदल होण्याची चिन्हे आहेत. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि ती वेळेत पूर्ण करा. वेळ अनुकूल आहे. सरकारी सहभाग असलेल्या व्यवसायांना अधिकृत पाठिंबा मिळेल. कामचा ताण जास्त असल्याने कुटुंबासाठी वेळ काढणे आज कठीण होईल.
सिंह – आज पैशाची होणारी चांगली आवक मनाला आनंद देईल, परंतु वाढणारा खर्च हा देखील चिंतेचा विषय असेल. कुटुंबासोबत होणारे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवास आनंददायी असतील. कुटुंबात काही व्यक्तींच्या अनपेक्षित भेटी होतील. यामुळे दिवस आनंदात जाईल.
कन्या – आज तुमची मजबूत व्यावसायिक स्थिती पाहून, तुमचे प्रतिस्पर्धी मत्सर आणि द्वेषामुळे नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करतील. त्यामुळे सावधगिरी बाळगा. जोडीदाराकडून वेळेवर मिळालेल्या पाठिंब्यामुळे तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून काहीसा दिलासा मिळेल. वाहनाचा वापर काळजीपूर्वक करा.
हेही वाचा – शाळेतील ज्युनिअर परमनंट झाले आणि संगीताचा राग अनावर झाला…
तुळ – स्पर्धेत सहभागी होण्याऐवजी, व्यवसायाची कामे सावधगिरीने आणि शांतपणे पूर्ण करा. आज दुसऱ्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकारणे टाळा. कार्यालयात नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या जातील. ही तुमची एकप्रकारे परीक्षाच असेल. दोन पिढ्यांचा संघर्ष फार मोठा होणार नाही याची तुम्हालाच काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक – स्पर्धा परीक्षेचे निकाल सकारात्मक लागण्याची शक्यता आहे. आज भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि खुला ठेवावा लागेल. नकारात्मक विचारांचे लोक तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू शकतात. मित्र आणि कुटुंबाकडून वेळेवर मिळालेली मदत तुमचा त्रास टाळण्यास मदत करेल.
धनु – इतरांच्या प्रभावाखाली येऊन आंधळेपणाने त्यांचे अनुसरण करणे टाळा. स्वतःवर विश्वास ठेवून आणि कठोर परिश्रम केले तर त्याचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या अनुकूल काळाचा पुरेपूर फायदा घ्या. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
मकर – नवीन व्यवसाय करारांमुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमच्या संवादात विनम्रता आणि लवचिकता ठेवा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रामाणिकपणाचा कस लागेल. कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये, तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करणे तुम्हाला कठीण वाटू शकते.
कुंभ – आज राहणीमानात सुधारणा होईल, परंतु तुम्हाला वाढत्या खर्चाचा देखील सामना करावा लागेल. विवाहोत्सुक जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी एखाद्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी भेट द्याल. त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. पथ्यपाणी सांभाळा.
मीन – कार्यक्षमतेने आणि समजुतीने, तुम्ही तुमची कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. याबाबत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. संततीशी संबंधित बाबींबद्दल मनात चिंता निर्माण होईल. आधी केलेली गुंतवणूक अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देऊ शकते.
दिनविशेष
भारतातील सर्कसचे जनक विष्णूपंत छत्रे
टीम अवांतर
भारतातील सर्कसचे जनक म्हणून ओळखले जाणारे विष्णूपंत छत्रे यांचा जन्म 1840 मध्ये झाला. विष्णूपंत शाळेत फारसे रमले नाहीत. दिवसातला त्यांचा बहुतेक वेळ मित्रांसोबत हुंदडण्यात आणि कुत्री, माकडे, ससे, कबुतरे यांच्या सानिध्यात निघून जात असे. जमखिंडीकर पटवर्धन संस्थानिकांच्या घोड्यांच्या पागेत, घोड्यावर स्वार होऊन घोडदौड करायला ते लहान वयातच शिकले. दररोजच्या कसरतीमुळे काटक आणि पिळदार बनलेली शरीरयष्टी, घौडदौडीतील त्यांची चपळता आणि धाडसाने एखादी कृती करण्याची त्यांची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. पुढे नशीब आजमण्यासाठी ते ग्वाल्हेरला गेले. तिथे घोड्यांच्या कसरतीत त्यांनी अथक मेहनत घेऊन प्रावीण्य मिळवले.
साधारणपणे 8 ते 10 वर्षांच्या या काळात श्रीमंत बाबासाहेब आपटे यांचे ते पट्टशिष्य बनले आणि महाराष्ट्रात परतले. इंदूर, विंचूर, कुरुंदवाड, जव्हार अशा अनेक संस्थानांत ते घोड्यांना चाल आणि कवायतीचे शिक्षण देऊ लागले. मुंबईत बोरीबंदर येथे चर्नी विल्सन यांची ‘हर्मिस्टन सर्कस’ही त्यावेळी सुरू होती. ही सर्कस विष्णूपंतांनी पाहिली आणि त्यांची मूळची प्राण्यांविषयीची आवड उफाळून वर आली. अश्वतज्ज्ञ तर ते होतेच. विल्सन यांच्याशी त्यांची गट्टी जमली. त्यांच्याही मनात असे प्राण्यांचे कसरतीचे प्रयोग करावेत, असे आले. विल्सन यांच्या मते, “भारतीयांना अशी सर्कस उभी करणे आणि प्राण्यांकडून कसरतीचे प्रयोग करून घेणे कदापिही जमणार नाही.” विल्सन यांचे ते बोलणे विष्णूपंतांना खटकलं आणि तिथंच त्याला ते म्हणाले, “याहून उत्तम अशी सर्कस मीच तुम्हाला उभी करून दाखवेन.” त्यांचे हे बोल त्यांनी खरे करून दाखवले आणि हिंदुस्थानातली पहिली सर्कस उभी राहिली. ‘ग्रॅंड इंडियन सर्कस’ हे तिचे नाव.
हेही वाचा – नव्या पिढीचा ‘आमचा पक्ष’…
विष्णूपंतांनी तरुण कलाकार आणि तेजदार घोडे सोबत घेऊन कुरुंदवाड येथे सर्कशीची तालीम सुरू केली. 8 ते 10 महिन्यांत त्यांनी सर्कशीला मूर्त स्वरूप आणले. छत्रे यांच्या या पहिल्या भारतीय सर्कसने नवा इतिहास घडवला. विष्णुपंत छत्रे यांच्या या पहिल्या भारतीय सर्कशीत पाश्चात्यांचे कसलेही अनुकरण नव्हते, तर स्वतंत्र अशा भारतीय बाण्याने ती उभी होती. देशभक्ती हा जणू तिचा आत्माच होता.
यथावकाश ही सर्कस भारतातच नव्हे तर परदेशातही आपले खेळ सादर करू लागली आणि पुढच्या काळात तर तिने विल्सन यांचीही सर्कस आपल्यात सामावून घेतली. विष्णूपंतांच्या या सर्कशीत महाराष्ट्रीय कसरतपटूंसोबत केरळचेही कसरतपटू काम करत होते. इतकंच नव्हे तर, स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत कार्यकर्ते या सर्कशीत तिकीट देणे तसेच प्रेक्षकांना त्यांच्या जागा दाखवत असत. 20 फेब्रुवारी 1905 रोजी विष्णूपंत छत्रे यांचे निधन झाले.


