दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 13 फेब्रुवारी 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 24 माघ शके 1947; तिथि : एकादशी 14:25; नक्षत्र : मूळ 16:11
- योग : वज्र 27:22; करण : कौलव 27:17
- सूर्य : कुंभ; चंद्र : धनु; सूर्योदय : 07:09; सूर्यास्त : 18:36
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
विजया एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – नोकरदारांकडील कामाचा ताण वाढू शकतो. पण सहकाऱ्यांच्या सहकार्याने कामाचा उरक राहील. व्यवसायात आपल्या योजनांवर विश्वास ठेवा. आर्थिक लाभासाठी व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांचा आज शैक्षणिक उपक्रमांमध्ये रस वाढेल. तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल. या सगळ्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे स्वतःकडेही लक्ष द्या.
वृषभ – नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक पावले उचला. कोणत्याही बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे टाळा. भावनिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. त्यांचे कारण शोधून वेळेत उपाय करा. कुटुंबात एखाद्या सदस्याच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
मिथुन – भागीदारासोबत सुरू असणारे वाद मिटतील. नवीन कल्पनांसह नवीन काम सुरू करण्याची आणि त्यासाठी नवी टीम उभी करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. एकमेकांच्या विचारांचा आदर करणे आवश्यक असेल. नोकरदारांना कार्यालयीन कामात काही अडचणी येतील, पण त्या सहजपणे दूर कराल. परदेशी व्यापार आणि शिक्षणाशी संबंधित कामांना गती मिळेल.
कर्क – कामाच्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असलेला पाठिंबा सहकाऱ्यांकडून मिळणे कठीण होईल. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तुमच्या कामातील कौशल्य पोहोचवणे जिकिरीचे होईल. विरोधकांपासून सावध रहा. मनोरंजन आणि सुग्रास भोजन यांचा मनापासून आस्वाद घेण्याची संधी मिळेल. तब्येतीची काळजी घ्या.
सिंह – आज नवीन संपर्क प्रस्थापित होतील. व्यावसायिक उपक्रमांमधील स्पर्धेमुळे नफ्याचे प्रमाण कमी होऊ शकतो. व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू खऱेदी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – तुम्ही चांगले काम करूनही वरिष्ठांकडून तुम्हाला टीकात्मक बोलणे सहन करावे लागू शकते. मात्र त्यासाठी इतरांना दोष देऊन परिस्थिती आणखी बिघडवणे टाळा. काम आणि घराशी संबंधित योजना पुढे ढकलाव्या लागतील. व्यवसायाच्या बाबतीत दिवस सर्वसाधारणच राहील. तथापि, नव्या योजनांचा विचार करू शकता. मात्र त्याची फारशी वाच्यता करू नका.
तुळ – इतरांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे जलद परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला सामाजिक समस्यांशी संबंधित एखाद्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तिथे तुमच्या मागील कामाबद्दल तुम्हाला सन्मानित केले जाईल. कुटुंबात वाढत्या आर्थिक अपेक्षांमुळे तुम्ही चिंतेत असाल. संततीच्या भविष्यासाठी अचानकपणे मोठा खर्च करावा लागू शकतो.
हेही वाचा – या सुखांनो या… गदिमांची अलौकिक प्रतिभा!
वृश्चिक – बँकिंग आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आज स्वतःच्या कामात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणतीही जोखीम स्वीकारण्यापूर्वी सखोल विचार करा. आरोग्याच्या चिंता वाढू शकतात. कुटुंबातील जुने वाद पुन्हा उद्भवण्याचा धोका आहे. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला तुमची बाजू जोरदारपणे मांडावी लागेल.
धनु – इतरांच्या प्रभावाखाली येऊन तुमच्या योजना ऐनवेळी बदलल्याने तुमचीच प्रतिमा खराब होईल. त्यामुळे तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला दृढनिश्चय दाखवावा लागेल. भावनिक नात्यांमध्ये पूर्णपणे शरणागती पत्करावी लागेल. मात्र, त्यामुळे नाती दृढ होतील. आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहाल.
मकर – तुम्हाला नवीन करार करावे लागू शकतात. त्याचे भविष्यात मोठे फायदे मिळतील. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. शब्द जपून वापरा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. नवीन तंत्रज्ञान जाणून घ्या, नोकरीच्या ठिकाणी ते कामाला येईल. झोपेचा अभाव आणि थकवा तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे काळजी घ्या.
कुंभ – स्वतः:घ्या सामाजिक प्रभावाचा वापर करून चांगले पैसे कमविण्याच्या संधी तुम्हाला मिळतील. जुने संपर्क उपयुक्त ठरतील. मित्रांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. शैक्षणिक कामात रस वाढेल. जोडीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. आज डोळ्यांचे आरोग्य सांभाळा. ध्यान धारणा आणि योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
मीन – दिवसभर कामात व्यग्र राहाल. जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घेणे उत्तम ठरेल. व्यवसायातील जुन्या बिलांचे पैसे कसे द्यायचे, हा तुमच्या काळजीचा विषय असेल. मात्र, मित्रांकडून मदत मिळू शकते. कुटुंबासाठी वेळ काढणे तुम्हाला आज कठीण जाईल. त्यावरून जोडीदार नाराज होणार नाही याची काळजी घ्या.
दिनविशेष
ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी
टीम अवांतर
ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1932 रोजी कलकत्ता येथे झाला. दिवंगत अभिनेते आणि चित्रपटनिर्माते गुरु दत्त यांच्या त्या भगिनी होत्या. ललिताजी यांचे बालपण मुंबईत गेले. शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये झाले. मॅट्रिक होताच त्यांचा मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करणाऱ्या गोपाळकृष्ण लाजमी यांच्याशी विवाह झाला. तत्पूर्वी, काही काळ त्यांनी गजानन हळदणकर आणि एम. आर. आचरेकर यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरवले.
लग्नानंतर त्या कुलाबा येथे राहण्यास आल्या. तिथे त्यांनी रेखाटन आणि निसर्ग चित्रे काढण्यास सुरुवात केली. या काळात त्यांचा के. एच. आरा यांच्याशी परिचय झाला. आरा यांच्या प्रोत्साहनाने ललितांनी 1961 साली जहांगीर आर्ट गॅलरीत पहिले प्रदर्शन भरवले. यानंतर त्या मुद्रा चित्र शिकण्यासाठी जे जे स्कूलमध्ये संध्याकाळी होणाऱ्या वर्गात जाऊ लागल्या. या काळात त्यांनी आर्ट मास्टर ही पदविका संपादन केली. दरम्यानच्या काळात त्यांचे पती आजारी पडले आणि घरात आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळे त्यांनी दोन शाळांमध्ये अर्धवेळ चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी पत्करली.
हेही वाचा – चुकले वाट रे…
याच काळात त्यांचा अमोल पालेकर यांच्याशी परिचय झाला. त्यांनी अमोल पालेकर यांच्या नाटकांसाठी वेशभूषा तसेच विविध प्रकारचे मुखवटे बनवले. यातूनच त्यांच्या व्यक्तिप्रधान चित्रांना चालना मिळाली. चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या अस्तित्व ग्रुपमध्ये त्या सहभागी होऊ लागल्या. त्यात होणाऱ्या चर्चांनी ललिता लाजमी यांच्या कलाविषयक जाणीव प्रगल्भ होत गेल्या.
आयुष्याच्या अखेरपर्यंत ललिताजी आपल्या शैलीत विविध प्रयोग करत मानवी जीवनाचे विविध पैलू रंगवत राहिल्या. अभिनेता आमीर खान याच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातदेखील त्या परीक्षक बनल्या आहेत. 13 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांचे निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे चित्रप्रदर्शन सुरू होते.


