Wednesday, February 11, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : जैसें विरजणियाचेनि संगें, दूधचि आटेजों लागे…

Dnyaneshwari : जैसें विरजणियाचेनि संगें, दूधचि आटेजों लागे…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥7॥

जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरूपा ॥98॥ हा प्रकृतीविखो आघवा । तुंवा मागां परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥99॥ तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंतीं । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती ॥100॥ ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥101॥ कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥102॥ नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे । कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥103॥ अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे । तैसें प्राकृत प्रकृती मिळे । कल्पक्षयीं ॥104॥ मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती । तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ति आइक ॥105॥

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः । भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥8॥

तरी हेचि प्रकृति किरीटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं । तेथ तंतूसमवायपटीं । जेविं विणावणी दिसे ॥106॥ मग तिये विणावणीचेनि आधारें । लहानां चौकडियां पटत्व भरे । तैसी पंचात्मकें आकारें । प्रकृतिचि होये ॥107॥ जैसें विरजणियाचेनि संगें । दूधचि आटेजों लागे । तैसी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया ॥108॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जरी सोनें लेणें होऊनि घडे, तरी तयाचें सोनेपण न मोडे…

अर्थ

हे कौन्तेया, कल्पान्ती सर्व भूते माझ्या मायेप्रत जातात. त्यांना पुन्हा (दुसर्‍या) कल्पाच्या आरंभी मी निर्माण करतो. ॥7॥

जिला प्रकृती असे नाव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगितली; एक आठ प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली आणि दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली. ॥98॥ हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना, तू मागे (अध्याय 7वा, श्लोक 4 आणि 5 मध्ये) ऐकला आहेस, म्हणून आता तो राहू दे. वारंवार कशास सांगावयास पाहिजे? ॥99॥ तरी, ही सर्व भूते महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. ॥100॥ ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेत बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये पूर्णपणे लीन होतात, ॥101॥ अथवा वर्षाऋतूचे अवडंबर नाहीसे होते आणि जेव्हा शरदऋतूचे झाकलेपण नाहीसे होते (म्हणजे शरद ऋतू जेव्हा लागतो), तेव्हा मेघमात्र आकाशाच्या आकाशातच नाहीसे होतात. ॥102॥ अथवा आकाशाच्या घरात वायू शांतच होऊन नाहीसा होतो अथवा लाटेचा आकार ज्याप्रमाणे पाण्यात नाहीसा होतो ॥103॥ अथवा जागृती आली म्हणजे स्वप्न मनातल्या मनात नाहीसे होते, त्याप्रमाणे कल्पक्षयाचे वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन: प्रकृतीत लीन होते. ॥104॥ नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो, असे लोक बोलतात, तर याविषयीचा खरा विचार ऐक. ॥105॥

(मी) आपल्या प्रकृतीचा अंगीकार करून प्रकृतीच्या नियंत्रणामुळे पराधीन असलेले सर्व भूतसमुदाय मी पुन्हा पुन्हा निर्माण करतो. ॥8॥

तर अर्जुना, या माझ्या मायेचा मी स्वभावत: अंगीकार करतो, तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे वीण दिसते, ॥106॥ त्या विणीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन जसे वस्त्र होते, तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रकट होते. ॥107॥ ज्याप्रमाणे विरजणाच्या संयोगाने पातळ दूध दहीरूपाने घट्ट होत जाते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टिपणाच्या आकाराला येते. ॥108॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : पैं गगन जेवढें जैसें, पवनु गगनीं तेवढाचि असे…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!