Sunday, March 15, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : जरी सोनें लेणें होऊनि घडे, तरी तयाचें सोनेपण न मोडे…

Dnyaneshwari : जरी सोनें लेणें होऊनि घडे, तरी तयाचें सोनेपण न मोडे…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखें ॥72॥  तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरुपें । जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥73॥ एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेयागाडगेयांचे निघती कोंभ । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥74॥ नातरी सागरींचां पाणीं । काय तंरगाचिया आहाती खाणी । ते अवांतर करणी । वारियाची नव्हे ॥75॥ पाहें पां कापसाचां पोटीं । काय कापडाची होती पेटी । तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥76॥ जरी सोनें लेणें होऊनि घडे । तरी तयाचें सोनेपण न मोडे । येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें ॥77॥ सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करे । तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ॥78॥ तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं । जो भूतभावना आरोपी । तयासि तयाचां संकल्पीं । भूताभासु असे ॥79॥ तेचि कल्पिती प्रकृती पुरे । आणि भूताभासु आधींच सरे । मग स्वरूप उरे एकसरें । निखळ माझें ॥80॥ हें असो आंगीं भरलिया भवंडीं । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । तैशीं आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥81॥ तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझां ठायीं । हें स्वप्नींही परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥82॥ आतां मी एक भूतातें धर्ता । अथवा भूतांमाजि मी असता । या संकल्पसन्निपाता- । आंतुलिया बोलिया ॥83॥ म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥84॥

हेही वाचा – Dnyaneshwari : पाहें पां दूध पवित्र आणि गोड, पासीं त्वचेचिया पदराआड…

अर्थ

सहज विचार केला तर, कल्पनारूप संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते, म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान असले तरी, ते अस्पष्ट होते आणि (त्या ठिकाणी) भूते निरनिराळी आहेत, असे दिसते. ॥72॥ तीच कल्पनारूपी संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे, त्यावेळी मी अखंड दंडायमानच स्वरूपाने आहे. ते कसे तर, ज्याप्रमाणे माळेवर भासणारी सर्पकल्पना जाताक्षणीच, माळेचे सर्पपण जाऊन तिचे मूळचे स्वरूप दिसते. ॥73॥ सहज विचार करून पाहिले तर, घागरी आणि मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात काय? तर नाही, परंतु त्या घागरी आणि मडकी हे कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेचेच उमटलेले आकार आहेत. ॥74॥ अथवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत काय? पाण्याचे रुपांतर (लाटा) ही वार्‍याची करणी नाही का? ॥75॥ असे पहा की, कापसाच्या पोटात कापडाचा गठ्ठा असतो काय? तो कापूस नेसणाऱ्याच्या दृष्टीने कापड झाला आहे. ॥76॥ सोन्याचे जरी अलंकार झाले तरी, त्याचे सोनेपण मोडत नाही. सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात, ते दागिने घालणाऱ्याच्या दृष्टीने दिसतात. ॥77॥ प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे अथवा आरशामध्ये जे प्रतिबिंबित होते, ते (शब्द आणि रूप) आपले (असते) की खरोखर दुसरे तेथे उत्पन्न होते? सांग. ॥78॥ त्याप्रमाणे या माझ्या शुद्धस्वरूपी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो, त्याला त्याच्याच कल्पनेमध्ये भूतांचा भास होतो. ॥79॥ तीच कल्पना करणारी प्रकृति संपली की, भूताभास मूळचाच संपलेला आहे. मग अखंड माझे शुद्ध स्वरूप रहाते. ॥80॥ हे असू दे! आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता, अंगात भोवळ आल्यामुळे जसे (भोवतालच्या) भिंती, नदीचा काठ वगैरे सर्व काही इकडे तिकडे फिरल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपी भूते भासतात. ॥81॥ तीच कल्पना टाकून पाहिले असता, मी भूतांमध्ये (प्राण्यात) अथवा भूते (प्राणी) माझ्यामध्ये, असे हे स्वप्नामध्ये सुद्धा कल्पना करण्यासारखे नाही. ॥82॥ आता मी एक भूतांना धारण करणारा किंवा भूतांमध्ये असणारा, ही बोलणी संकल्प (कल्पनारूप) सन्निपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत. ॥83॥ म्हणून प्रियोत्तमा (अर्जुना), ऐक; याप्रमाणे मी विश्वसहित विश्वाचा आत्मा आहे आणि तो मी या मिथ्या भूतसमुदायाला सदा आश्रय आहे. ॥84॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari :  महदादि देहांतें, इयें अशेषेंही भूतें…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!