डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीत मिळणारे एक नैसर्गिक आंबट-गोड चव असलेले बहुतांश महिला आणि लहान मुलींचे आवडते फळ म्हणजे गावरान बोरं! लहानपणी आमच्या शाळेच्या कंपाऊंडबाहेर एक आजी बोरं, आवळे, चिंचा विकायची. तिच्याकडे ही गावरान ताजी बोरं हिवाळ्यात खूप सुंदर आणि टवटवीत असायची.
त्या काळात एक पैसा, दोन खडकू, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, वीस पैसे अशी नाणी चलनात होती, किरकोळ खरेदी सगळी या नाण्यांवरच चालायची. ती आजी पाच पैशाला पाच आवळे, पाच पैशात चार-पाच चिंचेची बुटकं आणि दहा पैशाला एक छोटंस मापटं भरून बोरं द्यायची. मधल्या सुट्टीत शाळेतल्या सगळ्या मुली आजीजवळ बोरं, आवळे, चिंचा, कवठं घ्यायला झुंबड करायच्या, ती बोरं आणि आवळे मिळणं म्हणजे स्वर्गीय सुख असायचं. मधली सुट्टी संपल्यावर; वर्गामध्ये गेल्यावर त्या आवळ्याची आणि चिंचेची चिमणीच्या दाताने एकमेकींमध्ये मग देवाण-घेवाण व्हायची, वर्गात शिक्षिकेच्या धाकाने आवळा चोरून खाताना तो पेनातील शाईने निळा होऊन डेस्कच्या आत ठेवला जायचा, परंतु तो अर्धवट खाल्लेला… थोडासा शाईमुळे निळसर झालेला आवळा काही केल्या टाकवत नसे, तो खाण्याचा मोह काही केल्या आवरायचा नाही. आवळा खाल्ल्यावर त्यावर पाणी पिण्याची पण घाई असायची, परंतु त्या काळात पाण्याच्या बाटल्या वगैरे शाळेत नेत नसत… ते माहीतच नव्हतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शाळेच्या नळावर पाणी पिणे किंवा शाळेत चपराशाने भरून ठेवलेल्या माठातील पाणी झाकणीवर ठेवलेल्या अन् चेनने बांधून ठेवलेल्या ग्लासमध्ये घेऊन प्यायचे, हेच ठाऊक होते. आंबट-तुरट आवळ्यावर पाणी प्यायल्यावर त्याची चव मधुर लागायची. मी आजही खूप वेळा तसं करते.
बोरांच्या बाबतीत मात्र असं व्हायचं नाही. वर्गात बोरांचा वास येताच काही शिक्षक, विशेषतः पुरुष शिक्षक चिडायचे, कारण त्यांना तो बोरांचा आंबट वास सहन व्हायचा नाही, मग ते बोर आम्हाला फेकून द्यायला सांगायचे; तेव्हा खूप वाईट वाटायचे, याउलट महिला शिक्षिका आवर्जून ती आंबट-चिंबट बोर रागावून आमच्याकडून काढून घ्यायच्या, मात्र त्या देखील चुकून-माकून एखादे बोर तोंडात टाकायच्याच, गावरान बोरं म्हणजे खरचं महिला आणि मुलींचा आवडता प्रकार! या सगळ्या प्रकारात एक मजा होती, निरागसपणा होता. त्या शाळेबाहेरील आजीकडील बोरं खिसे भरून घरी नेले जायचे, तेव्हा ती बोरं खायला आई, काकू अशा सर्वांनाच आवडायचे. या ताज्या आणि फ्रेश बोरांची चव चाखल्यानंतर आई आणि आमच्या आजूबाजूच्या काकू, मावशी संक्रांतीला आजीकडून किलोने बोरं विकत घ्यायच्या. त्या काळात ही गावरान बोरं हमखास या दिवसांत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असायची, परंतु आजकाल शहरांनी ही छोटी, छोटी लालचुटूक बोरं नजरेला पडत नाहीत, यामध्ये अगदी लहान आकाराची चणोली नावाची बोरं पण असतात, त्यांची चव अजूनच छान असते! पेवंदी बोरं, ॲपल बोरांना या खास रानमेव्याची चव कुठून येणार?
हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी!
1976-77 सालातली ही गोष्ट आहे. माझ्या आजोळी म्हणजेच वडनेर (भोलजी) येथे आम्ही सुगीच्या दिवसांमध्ये जायचो, तेव्हा हिवाळ्यात तिथे खूप मजा यायची. माझे चुलत काका आम्हा सगळ्या लहान मुलांना नदी काठावर, शेतात घेऊन जायचे. नदी किनारी बोरांची आणि बाभळीची खूप झाडे होती. काका आम्हाला त्या बोरांच्या झाडाखाली उभे करून स्वतः गदगदा ती बोराची झाडे हलवून बोरं खाली पाडायचे आणि मग ते टपटप करून झाडावरून पडणारी बोरं आमच्या फ्रॉकच्या खिशात, काकांच्या पंच्यामध्ये, तर कधी पिशवीत गोळा करून घरी नेली जायची. तसेच, बाभळीच्या व हिवऱ्याच्या (ज्याला सुबाभूळ देखील म्हणतात) अशा झाडांचा डिंकही खायला मिळायचा, तेव्हा त्यात काही पौष्टिक तत्व असतात, हे आम्हाला माहीत नव्हतं. तो डिंक खायला छान लागायचा म्हणून पोटात जायचा इतकचं! आता असं वाटत की, खरचं अज्ञानात किती सुख असतं!
एकदा असंच आमचा सर्वात मोठ्या दादा शेतावर गेला असताना त्याला डबा नेऊन द्यायची जबाबदारी काकूने आमच्यावर सोपवली. आम्ही डबा घेऊन शेतावर जायला निघालो, तेव्हा काका आमच्यासोबत होते… मग काय काकांच्या मागे लागून आम्ही नदी किनारी बोरं वेचण्याकरता गेलो आणि दादा शेतावर डब्याची वाट पाहतो आहे, हे बोरं गोळा करण्यात आणि नदीमध्ये मस्ती करण्याच्या नादात ते साफ विसरून गेलो. दादा शेतामध्ये डब्याची वाट पाहात असेल, हे आमच्या गावीही नव्हतं… इतके आम्ही आमच्याच मस्तीत दंग होतो. दुपारी शेतावर पोहचलो तर, दादा भुकेमुळे वैतागून आणि चिडून घरी निघून गेला होता… परंतु आम्ही सगळे इतके बेफिकीर होतो की, दादा तर घरी गेलाच आहे, मग त्याच्या डब्याचे काय करायचे म्हणून आम्ही तो डबाही फस्त केला आणि दिवसभर शेतात हुंदडल्यावर संध्याकाळी बैलगाडीने घरी पोहोचलो… दादा अंगणात खाटेवर हातामध्ये काठी घेऊन आमचीच वाट पाहात बसला होता!
त्या दिवशी आमची सगळी गोळा केलेली बोरं त्याने एका घमेल्यात जमा करायला लावली आणि आम्हाला एकाही बोराला हात तर लावू दिला नाही, उलट ती बोरं फेकून द्यायची धमकी दिली आणि छडीने हातावर मारही दिला होता. आम्हाला एकेक छडी मार खाण्याचे काही वाटले नाही, परंतु इतक्या मेहनतीने गोळा केलेली बोरं दादा फेकून देणार म्हणून वाईट वाटत होते, मोठा भाऊच तो! आमचे रडवेले आणि हिरमुसलेले चेहरे पाहून दादाचे मन विरघळले, पण सर्वांना शिक्षा तर, व्हायला हवी आणि अशी चूक पुन्हा घडायला नको म्हणून त्याने प्रत्येकाला दहा-दहा उठाबशा काढायला सांगितल्या आणि बोरं फेकणार नाही म्हणून सांगितलं, तेव्हा कुठे आमचे चेहरे आनंदाने फुलले! पण त्या प्रसंगानंतर आम्ही कधी असा काम चुकारपणा करायचा नाही, हे लक्षात ठेवले.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तेव्हा किती आनंद असायचा नाही? इतक्या वर्षांनी आजही बोरं पाहिली की आम्हा सगळ्या भावंडांना हा प्रसंग आठवतो आणि हसायला येतं. आमचा दादाही आता 71/72 वर्षांचा झाला, पण तोही हे सगळं आठवलं की, हसतो आणि त्याच्या मुलांना तसेच नातवंडांना आमचे असे अनेक किस्से सांगत असतो. अशा या बोरांच्या संबंधित लहानपणाच्या खूप आठवणी आहेत.
तसेच, आमच्या गावात एक म्हातारी आजी वाळवलेली बोरं विकायची. माझी चुलत बहीण आणि मी तिच्याकडे बोरं घ्यायला जायचो. तिचे बोर विकण्याचे माप एक कान तुटलेला कप होता. त्या कपाला ती सिंगल म्हणायची. एक कपभर बोरं म्हणजे दहा पैसे ‘सिंगल’… असं तिचं माप ठरलेल असायचं. कधी-कधी तिची ती ‘सिंगल’भर वाळवलेली बोरं घरी आणली की, आई नाहीतर काकू गूळ आणि मिठाच्या पाण्यात उकळून द्यायची. आजही ही उकळलेली बोरं दिसली का, त्या गावातील दहा पैसे ‘सिंगल’ मापाने बोरं विकणाऱ्या आजीची आठवण येते.
हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…
आजही गावरान बोरं बाजारात दिसली की, माझ्या घरी हरभरा आणि बोरं तीन-चार वेळेस तरी विकत आणले जातात. कुठे बाहेर फिरायला गेले असता मला जर कोणाच्या शेताच्या बांध्यावर किंवा जंगलात अशी बोराची झाडे दिसली तर, त्याची बोरं मी आवर्जून वेचून घेऊन येते. परंतु आता निसर्गाचे हे नैसर्गिक दान आपल्या पदरात सहजासहजी पडत नाही, कारण पहिल्यासारखे ना ती शेती राहिली, नाही ती बोरी-बाभळीची झाडे आणि ना नदी किनारे! हे मात्र अगदी खरं आहे की, अवास्तव प्रगतीच्या नादात आणि हव्यासापोटी आपण या दहा पैसे ‘सिंगल’च्या सुखाला मुकले आहोत, ही खंत मनामध्ये दाटून राहाते. दहा पैसे ‘सिंगल’च्या मापाने कपभर बोरं विकणाऱ्या त्या आजीच्या आठवणी आजही मनामध्ये फेर धरतात!
आता त्या बोरांची किंमत वाढली असेल, पण तरीही यदाकदाचित कधी कुठे हे दहा पैसे किंमत असलेलं ‘सिंगल’ कपभर बोराचं माप एखाद्या गावातल्या सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या म्हाताऱ्या आजीकडे दहा रुपयांत का होईना, पण विकत घेता आलं तर पाहा! जेव्हा तो सुरकुतलेला, तोंडाचं बोळक असलेल्या म्हातारीचा चेहरा दिलखुलासपणे हसून एका सिंगलभर कपाच्या बोराचे ते क्षणिक सुखाचे माप अगदी कमी पैशांत त्या थकलेल्या हाताने जेव्हा आपल्या पदरात पडतं, तेव्हा पळभराच्या त्या सुखात किती आनंद आणि समाधान आहे, हे लक्षात येतं!


