Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितसमीर अन् अपर्णा… दैव जाणिले कुणी?

समीर अन् अपर्णा… दैव जाणिले कुणी?

दिलीप कजगांवकर

समीर माने, एक यशस्वी उद्योगपती. पुणे आणि लंडन अशा दोन्ही ठिकाणी कारखाने. गेल्या वर्षीची गोष्ट, लंडन येथील कामकाजाचा विस्तार करण्यासाठी सुमारे एक महिना समीर लंडनला होता. तेथील कामे मार्गी लावूनच तो भारतात परत आला.

कारखान्यात राऊंड मारताना समीरने कंपनीच्या वर्कस् मॅनेजर राजला विचारले. “राज, अरे ती मुलगी नवीन दिसते, कोण आहे ती?”

“सर, तिचे नाव नेहा. मागच्याच आठवड्यात ट्रेनी इंजिनीअर म्हणून जॉइन झाली.”

चेहरा अगदी ओळखीचा वाटत होता. होय, अगदी हुबेहूब अपर्णा… अपर्णाची कार्बन कॉपी! समीर भूतकाळात शिरला. साधारणतः 22-23 वर्षांपूर्वीची गोष्ट. समीर माने, एक उमदा तरुण, एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आणि धडपड होती.

एके दिवशी संध्याकाळी समीरने हॅाटेलमध्ये जेवण घेतले आणि बिल देताना बघतो तर काय खिशात पाकीट नव्हते, तो पाकीट घरीच विसरला होता. समोरच्या टेबलवर बसलेल्या अपर्णाला समीरची घालमेल जाणवली आणि ती समीरच्या मदतीसाठी पुढे आली, कुठलीही ओळख नसताना! समीरने अपर्णाचे मनापासून आभार मानले.

अपर्णा सुद्धा इंजिनीअर होती आणि ती एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होती. अपर्णा आयुष्यात आली, घरापासून दूर राहणाऱ्या दोघांना एकमेकांचा आधार मिळाला. दोघेही जिवाभावाचे मित्र बनलेत. संध्याकाळी भेटणे, विविध विषयांवर चर्चा करणे हा रोजचाच दिनक्रम. मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले ते दोघांनाही समजले नाही, दोघांनी लग्न करण्याचे ठरविले.

हेही वाचा – गेट-टुगेदर… आयुष्याला नवसंजीवनी देणारं!

समीर त्याचे प्लॅन्स अपर्णाला सांगून तिची प्रतिक्रिया आणि सल्ला घेत असे. थोडे पैसे जमले की, समीरने नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा, थोडा जम बसल्यावर अपर्णानेही नोकरी सोडून समीरला व्यवसाय वाढविण्यास मदत करायची. दोघांनी मिळून अनेक मनसुबे रचले… भावी आयुष्याची स्वप्ने रंगवली…

अचानक, रोज भेटणाऱ्या अपर्णाने भेटणे बंद केले, फोन घेणेही बंद केले. समीरला समजेना असे अचानक काय झाले. काही दिवसांनी त्याला समजले की, एका मोठ्या अधिकार्‍याशी अपर्णाने लग्न केले आणि ती जबलपूरला असते.

समीरसाठी हा खूप मोठा धक्का होता. रोज अपर्णाला भेटायची अन् एकत्र वेळ घालवायची सवय लागली होती. अपर्णाची अनुपस्थिती सहन होत नव्हती. समीर खूप खचला, निराश झाला. अपर्णाने असे का केले? मला काहीच का सांगितले नाही? माझे काही चुकले का? समीरला काहीच समजत नव्हते…

एक दिवस अपर्णाचा फोन आला. काही कारणामुळे मला तातडीने लग्न करावे लागले. तुला कळवायलाही वेळ मिळाला नाही. मी खूप सुखी आहे, मला तू विसर आणि स्वतःसाठी जगणे सुरू कर…

स्वतःसाठी जगणे, सोपे होते का? दोघांनी एकत्र जगण्याचे रंगवलेले स्वप्न भंगले होते आणि अपर्णा म्हणत होती स्वतःसाठी जगणे सुरू कर!

कसेबसे समीरने स्वतःला सावरले. नाईलाजानेच एकाकी जगणे चालू केले. नोकरी सोडून पूर्ण ताकदीने धडपड चालूच ठेवली, परंतु यश येत नव्हते. होता तो सर्व पैसा संपला तरीही आशा मात्र होती. एके दिवशी समीरने अपर्णाला फोन केला आणि आश्चर्य म्हणजे तिने फोन उचलला…

“अपर्णा, थोडी पैशाची मदत करता येईल का?”

अपर्णा उत्तरली, “हो नक्की, पण कसे देणार पैसे? त्यासाठी तर तुला जबलपूरला यावे लागेल.”

कसेबसे भाड्याचे पैसे समीरने जमा केलेत आणि तो जबलपुरला दाखल झाला.

“हाय अपर्णा, मी जबलपूरला पोहोचलो. आपण केव्हा आणि कुठे भेटायचे?”

“केव्हा आलास, कसा आहेस?” अपर्णाने आपुलकीने विचारपूस केली. ती बोलत असताना अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. समीरने त्यानंतर अनेकदा फोन केला पण अपर्णाने फोन उचलला नाही आणि नंतर फोन स्विच ऑफ केला.

थोड्या वेळाने एका वेगळ्याच नंबरवरून फोन आला… “परत मॅडमला फोन करायची हिम्मत करू नकोस. मुकाट्याने परत जा, जबलपूरमध्ये कधी दिसलास तर बघ, सोडणार नाही तुला.” आवाज करडा नी धमकावणीचा होता.

समीरला समजले नाही, नक्की काय झाले? काय प्रॅाब्लेम आहे, अपर्णा अशी का वागतेय? मदत करायची नव्हती तर, मला इतक्या दूर का बोलावले? तो धमकावणारा आवाज कुणाचा होता? अपर्णाचा नवरा की, दुसरा कोणीतरी? सगळंच समजण्यापलीकडचं होतं.

तो खूप व्यथित झाला. पुण्याला परत यायलाच काय पण खायला देखील पैसे नव्हते. हातातील घड्याळ विकून समीर कसाबसा पुण्याला परतला. परतीच्या प्रवासात एका भल्या माणसाशी परिचय झाला. समीरची जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि कल्पक प्लॅन्स आवडल्याने त्यांनी समीरला मदत केली. समीरने अहोरात्र कष्ट केले, दैवाने देखील साथ दिली. समीरने लहानसे वर्कशॉप सुरू केले. बिझनेस हळूहळू वाढत गेला. लहानशा वर्कशॉपचे मोठ्या कारखान्यात रूपांतर झाले. पुढे लंडनला कारखाना सुरू केला. अपर्णाची उणीव मात्र त्याला सदैव अस्वस्थ करायची. अपर्णाची साथ मिळाली असती तर, नक्कीच अजून जास्त प्रगती झाली असती आणि आयुष्याचा प्रवास अधिक सुखकर झाला असता…

फोनच्या रिंगने समीरला वर्तमानात आणले… एचआर मॅनेजर ज्युलीने कन्फर्म केले, नेहा ही अपर्णाचीच मुलगी होती!

समीर मनातल्या मनात आनंदला. त्याच्या मनात आशा निर्माण झाली. कदाचित, अपर्णाची भेट होईल, निदान तिच्याशी बोलता येईल, जबलपूरला बोलावून ती इतकी निष्ठुरपणे का वागली ते समजेल, आणि कसलीही पूर्वसूचना न देता लग्न का केले, हेही समजेल. अर्थात, हे समजून काहीच फरक पडणार नव्हता, फक्त मनाचे समाधान, दुसरे काहीच नाही.

समीरपुढे तीन पर्याय होते. अपर्णाची मुलगी म्हणून नेहाला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची, अपर्णाचा राग नेहावर काढायचा किंवा तटस्थ राहायचे. समीरने तटस्थ राहायचे ठरविले.

नेहाची हुशारी आणि कर्तबगारी तिच्या चोख कामातून डोकावत होती. मुद्देसूद मांडणी, उत्तम संभाषण कला आणि हजरजबाबीपणामुळे नेहाने कंपनीत ठसा उमटवला होता. कंपनीतील वातावरणात उल्हास आणि चैतन्य निर्माण करण्यात नेहाचा मोठा वाटा होता!

हेही वाचा – Love Story : एक नवी रेशीमगाठ!

काल रात्री मीटिंगनंतर समीर म्हणाला, “नेहा, मी तुला घरी सोडतो.” नेहा समीरबरोबर जायला राजी नव्हती. “नेहा खूप उशीर झाला आहे, मी तुला एकटीला जाऊ देणार नाही, चूपचाप चल माझ्याबरोबर,” समीरच्या आवाजात हुकुमत होती. नेहा नाराजीनेच गाडीत बसली. ती खूपच शांत होती, काहीच बोलत नव्हती, जरा अवघडूनच बसली होती. नेहमी हसत खेळत वागणारी नेहा कुठेतरी हरवली होती, अबोल होती. समीरला हे जरा विचीत्र वाटत होतं.

“नेहा बेटी, तू गप्प गप्प का? मी थोडा रागावून बोललो, माफ कर मला. बेटी, तुझ्या काळजी पोटीच बोललो मी,” समीर भावविवश झाला होता. बेटी हे संबोधन ऐकल्यावर नेहाची भीती सरली, तिला कंठ फुटला…

“सर, अनेक वर्षांपूर्वी रात्री मीटिंगनंतर माझ्या आईला बाहेरच्या राज्यातून आलेल्या एका मोठ्या अधिकार्‍याने घरी सोडले. त्यांनी मद्य प्राशन केल्याचे आईला माहीत होते म्हणून आई त्यांच्याबरोबर जायला राजी नव्हती, पण रिक्षा किंवा टॅक्सीने जाणे देखील धोकादायक होते. नाईलाजानेच आई त्यांच्या गाडीतून गेली. त्यांनी तिला घरी पोहोचवले खरे, पण मद्याच्या नशेत तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला अन्  व्हायला नको ते झाले. स्वतःच्या प्रेमाला विसरून आईला नाईलाजाने त्या पापी पुरुषाशी लग्न करावे लागले. चांगली नोकरी सोडून आईला घरी बसावे लागले. भरपूर श्रीमंती होती, पण आईचे मन त्या घरात कधीच रमले नाही…”

“भरपूर पैसा, प्रशस्त बंगला आणि अनेक वाईट सवयी… सुटका करून घेण्यासाठी आईने तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तिच्या मित्राला बोलावले, परंतु वॉचमन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आईचा प्लॅन फसला. बाबांनी आईचा फोन काढून घेतला. ‘यापुढे कधी त्याला फोन करशील तर, त्याला त्याचा जीव गमवावा लागेल, समजलं का?’ असे धमकावून ते थांबले नाहीत तर, त्यांनी तिच्या मित्रालाही धमकावले. आईने जिवंतपणीच मरण यातना भोगल्यात. बाबा व्यसनांमुळे गेलेत आणि नंतर लगेचच आईही गेली…”

“नेहा, अपर्णावर जीवापाड प्रेम करणारा तो दुर्दैवी तरूण मीच,” असे म्हणत समीरने त्याचा नी अपर्णाचा फोटो नेहाला दाखविला. “नेहा, अपर्णाने काय काय यातना भोगल्या ते मला माहीत नव्हतं म्हणून मी तिलाच दोष देत होतो. किती सहन केलं माझ्या अपर्णाने. नेहा, तू भेटली नसतीस तर, मी अपर्णाला आयुष्यभर दोष दिला असता,” असे म्हणताना समीरच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू स्वतःच्या रूमालाने पुसताना नेहाचे डोळेही पाणावलेत. “सर, तुम्ही स्वतःला सावरा,” नेहा समीरचे सांत्वन करीत होती.

अविवाहित राहिलेल्या समीरला लग्न न करताच मुलगी मिळाली होती, जिच्यावर जिवापाड प्रेम केले त्या अपर्णाचीच मुलगी! समीरच्या भल्या मोठ्या व्यवसायाला उत्तराधिकारी मिळाला होता!! “बेटी, मी तुझा सर नाही, मी तुझा डॅड,” म्हणत समीरने नेहाला मायेने थोपटले. नेहाने फक्त आईला छळणारा पुरुष बघितला होता, पण त्याच्यातील डॅड कधीच बघितला नव्हता. आज मात्र तिने तिच्या डॅडच्या खांद्यावर हक्काने डोकं ठेवलं होतं. दोघांच्याही भावनांना आणि अश्रूंना मात्र, आता तटस्थ राहता आले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!