Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आलीया भोगासी… एकाकीपणातून बाहेर आले देशमुख सर
    ललित

    आलीया भोगासी… एकाकीपणातून बाहेर आले देशमुख सर

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 12, 2026No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, आलीया भोगासी, प्राचार्यांचे दु:ख, निवृत्त प्राचार्याची व्यथा, ज्येष्ठ नागरिकाचे एकाकीपण, प्राचार्याच्या आयुष्यात सुखाचे क्षण, प्राचार्य देशमुखांची व्यथा, प्राचार्य देशमुखांचा मुलगा, प्राचार्य देशमुखांची मुलगी, प्राचार्य देशमुखांची पत्नी,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    जाँगिंग ट्रँकवर दहा राऊंड मारुन मी घामेजलेल्या अवस्थेत बाकावर बसलो. एक साठी उलटलेले गृहस्थ तिथे अगोदरच बसलेले होते. बऱ्याच दिवसांपासून मी त्यांना या उद्यानात पहात होतो. अर्थात आमचं बोलणं कधी झालं नाही. शहरात हीच समस्या असते कोणी कुणाशी स्वतःहून बोलत नाही. प्रत्येकजण आपापल्या कोषात गुरफटलेला! नाही म्हणायला ज्येष्ठ नागरिकांचे बरेच ग्रुप्स उद्यानात फिरताना दिसायचे. पण हे गृहस्थ मात्र एकटेच दिसायचे. ते त्या ग्रुपमध्ये का सहभागी होत नाहीत, हा नेहमीच प्रश्न पडायचा. आज मात्र मी स्वतःहूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं.

    “नमस्कार सर…”

    माझ्या बोलण्यावर ते एकदम  दचकले. कदाचित मी त्यांच्याशी बोलेन, अशी त्यांना अपेक्षाच नसावी.

    “नमस्कार नमस्कार…” ते हात जोडत म्हणाले.

    “सर, बऱ्याच दिवसांपासून या बाकावर तुम्हाला बसलेलं पहातोय. म्हटलं आज तुमच्याशी ओळख करून घ्यावी. कुठे नोकरी करत होतात सर?”

    “मी सायन्स कॉलेजला प्राचार्य होतो. तीन वर्षं झालीत रिटायर्ड होऊन.”

    “अच्छा! मुलं काय करतात? लग्नं होऊन गेली असतील ना त्यांची?”

    “हो. मुलगा नासामध्ये सायंटिस्ट आहे. मुलगी कॉम्प्युटर इंजीनिअर आहे. बंगलोरला असते एका कंपनीत. तिचे मिस्टरही सॉफ्टवेअर इंजीनिअर आहेत. तेही बंगलोरमध्येच नोकरी करतात…”

    “अरे वा, खूप छान!”

    मी चांगलाच प्रभावित झालो. एकंदरीत पूर्ण परिवारच उच्चशिक्षित दिसत होता. त्यांनी माझा परिचय विचारला. मी माझ्या नोकरीची माहिती दिली.

    “मग सध्या आरामच करताय की, इतर काही व्यवसाय?” मी विचारलं.

    “नाही. घरीच असतो. आयुष्यात खूप काही केलं. आता काही करायची इच्छा नाहीये…”

    “वेळ मिळत असेल तर, आणि हातपाय चालताहेत तोपर्यंत प्रवास करून घ्या सर. जग फार सुंदर आहे.”

    “अहो, खूप फिरलोय. वेगवेगळ्या परिषदांकरिता मी आजपर्यंत 41 देशांत जाऊन आलोय आणि भारत म्हणाल तर, सर्वच राज्यं पायाखाली घातली आहेत. अजूनही काही कॉलेजेस  सन्मानाने व्याख्यानाला बोलवतात. त्यावेळीही प्रवास होतोच…”

    मी शॉक्ड झालो. माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या कर्तृत्वाचा अंदाज येत नाही हेच खरं. 41 देशांतील संस्था त्यांना व्याख्यानाकरिता बोलवतात, याचा अर्थ सर खूप मोठे विद्वान होते, यात शंकाच नव्हती. सरांपुढे मी अगदीच नगण्य असल्याची भावना मला छळू लागली. थोड्या गप्पा झाल्यानंतर एकमेकांचा निरोप घेतला. तो पूर्ण दिवस मी सरांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखालीच होतो.

    हेही वाचा – शाळेतील ज्युनिअर परमनंट झाले आणि संगीताचा राग अनावर झाला…

    त्यानंतर वारंवार आमच्या भेटी होऊ लागल्या. सर अनेक विषयात तज्ज्ञ होते, त्यामुळे कोणताही विषय काढला की, ते त्यावर माहितीपूर्ण बोलायचे. त्यांना राजकारणातही रस होता आणि राजकारण हा माझ्यासह अनेकांचा आवडीचा विषय! त्यामुळे आम्ही सहसा राजकारणावरच बोलायचो.

    दोन-तीन दिवस सर दिसले नाहीत. म्हणून मग चौथ्या दिवशी माझ्याच बाकावर बसलेल्या काही रिटायर्ड लोकांना मी विचारलं.

    “का हो, ते देशमुख सर आजकाल दिसत नाहीत?”

    “कोणते देशमुख सर? तीन-चार देशमुख आहेत. त्यापैकी कोणते?”

    मला त्याचं सुरुवातीचं नाव माहीत नव्हतं.

    “ते नाही का सायन्स कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांचा मुलगा अमेरिकेत नासामध्ये आहे आणि मुलगी बंगलोरला कॉम्प्युटर इंजिनियर…”

    माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच हास्याचा स्फोट झाला. सगळे सीनियर सिटिझन्स जोरजोरात हसत होते.

    “का? काय झालं? एवढं हसताय का?” मी आश्चर्यचकित होऊन विचारलं

    “तुम्हालाही त्यांनी तेच सागितलेलं दिसतंय!”

    “म्हणजे? मी नाही समजलो?” मी अजूनच कोड्यात पडलो.

    “अहो, कसलं नासा आणि कसलं बंगलोर. त्यांचा मुलगा नंदूरबारला कोर्टात शिपाई आहे आणि मुलगी एका रिक्षावाल्यासोबत पळून गेलीय. ती आता परभणीला असते…”

    मला जबरदस्त धक्का बसला

    “काय? पण ते तर म्हणत होते की, ते प्राचार्य होते म्हणून! मग तेही खोटंच का?”

    “नाही, नाही. ते खरंच प्राचार्य होते. फार हुशार माणूस. चाळीसएक देशात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पेपर प्रेझेन्टेशन केलं असेल. शंभरवर पुरस्कार मिळालेत त्यांना. पण नशीब बघा दोन्ही मुलं नालायक निघाली. बापाचा एकही गुण घेतला नाही त्यांनी!”

    “पण, मग ते असं खोटं का सांगतात मुलांबद्दल?” मी थोडंस चिडूनच विचारलं.

    “अहो, एवढा मोठ्या नावाजलेल्या कॉलेजचा प्राचार्य आणि एवढा बुद्धिमान माणूस ज्याला देशविदेशातून सन्मानाने व्याख्यानासाठी बोलावलं जायचं, असा माणूस ज्याचे हजारो स्टुडंट्स मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत, तो आपल्या अशा नालायक मुलांबद्दल खरं कसं सांगू शकेल? त्याच्याजागी आपण असतो तर, आपणही तेच केलं असतं. खरं की नाही?”

    याच कारणासाठी ते बहुतेक इतर समवयस्कांमध्ये मिसळत नसावेत. मुलांचा विषय निघाला की, साहजिकच त्यांना लाजीरवाणं होत असावं. मला सरांबद्दल सहानुभूती वाटायला लागली. पण सरांशी एकदा बोलल्याशिवाय मनाला समाधान मिळणार नव्हतं.

    आठवड्याने सर परत त्या बाकावर बसलेले दिसले. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी मुद्द्यावर आलो…

    “सर, तुमच्या मुलांबद्दल ऐकलं. फार वाईट वाटलं…”

    मला काय म्हणायचंय हे त्यांच्या लगेच लक्षात आलं असावं. ते गंभीर झाले.

    “शेवटी तुम्हाला कळलंच तर!”

    “हो सर. पण सर असं झालंच कसं? तुम्ही इतके हुशार, नावाजलेले…”

    “ती एक फार मोठी शोकांतिका आहे. सविस्तर सांगतो. मी ग्रॅज्युएट झाल्याबरोबर वडिलांनी माझं लग्न त्यांच्या खेड्यातल्या मित्राच्या मुलीशी लावून दिलं. मुलगी दहावी नापास होती, पण देखणी होती. त्यातून वडिलांचा आग्रह. शिवाय ‘आपण तिला पुढे शिकवू. कमीत कमी ग्रॅज्युएट तरी करू’ असा मलाही आत्मविश्वास वाटत होता. म्हणून मी ते लग्न केलं. मात्र लग्नानंतर बायको अगदीच सुमार बुध्दीची आहे, हे माझ्या लक्षात आलं. तिला शिकण्यात अजिबात रस नव्हता. तिचे गावातल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, हेही ऐकण्यातं आलं. पण ते वयच वेडं असतं, असं म्हणून मी मोठ्या मनाने तिला माफ केलं. मी पोस्ट-ग्रॅज्युएट झाल्यावर एका काँलेजात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. बायकोला शिकवण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण पालथ्या घड्यावर पाणी. शेवटी मी नाद सोडून दिला आणि पीएचडीच्या तयारीला लागलो. नंतर मुलं झाली. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. इकडे मुलं वाढत होती. तिकडे माझ्या करिअरचा ग्राफ उंचावर जाऊ लागला.”

    “मी मुलांना चांगल्या शाळेत टाकलं. पण शाळेतून येणाऱ्या रिपोर्ट्सवरून लक्षात आलं की, मुलांनी दुर्दैवाने आईची सुमार बुद्धी घेतली होती. चांगले क्लासेस, माझं मार्गदर्शन असूनही ती मोठ्या मुष्किलीने पास होत होती. शेवटी मी त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून करिअरवर भर देऊ लागलो. संशोधनं, जागतिक स्तरावरच्या परिषदांमध्ये सहभाग यात मी गुंतून गेलो. शेकडो पुरस्कार जिंकले. इकडे मुलं कॉलेजला गेली आणि त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मुलीच्या भानगडींना त्रासून मी तिला पुण्याला शिकायला  पाठवलं. कॉलेजला यायला जायला रिक्षा लावून दिली. तर, ती रिक्षावाल्यासोबत पळून गेली. मी माझं वजन वापरून दोघांना पकडून आणलं. पण मुलगी सज्ञान असल्यामुळे काहीच करू शकलो नाही. शेवटी दोघांनी परभणीला जाऊन रजिस्टर लग्न केलं. आता ती तिथेच आहे. तिचा नवरा तिथेही रिक्षाच चालवतो. इकडे मुलगाही काही कमी नव्हता. लहान वयातच त्याला सगळी व्यसनं लागली. बारावीतच तो चार वेळा फेल झाला. त्याचे रंगढंग बघून त्याच्या मामाने त्याला नंदूरबारच्या कोर्टात शिपाई म्हणून लावून दिलं. तिकडेच त्याने एका परजातीय मुलीशी लग्न करून टाकलं. माझं दुर्दैव बघा की, मला अनेक लग्नात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण असायचं. पण माझ्या दोन्ही मुलांनी मला न सांगता, न बोलावताच लग्नं केली. मी प्राचार्य झालो. कुलगुरुपदासाठीही मला आँफर आल्या. पण मी त्या स्वीकारल्या नाहीत. इतका मी कौटुंबिक परिस्थितीने खचून गेलो होतो,” बोलता बोलता सरांना गहिवरून आलं.

    “तुमच्या मिसेसने कधी मुलांना सुधारण्याचा प्रयत्न केला नाही?”

    “तोच तर मुख्य प्रॉब्लेम होता. तिने कायम मुलांना पाठीशी घातलं. माझ्यावर तिचं प्रेम कधीच नव्हतं. त्यामुळे माझ्या बुद्धिमत्तेचा तिने कायम दुस्वास केला. माझ्या प्रगतीचं, प्रसिद्धीचंही तिने कधी कौतुक केलं नाही. मुलांच्या मनातही ती माझ्याबद्दल विषच कालवत राहिली. त्यामुळे मुलांनीही माझा रागरागच केला. माझी फार इच्छा होती मुलाने सायंटिस्ट होऊन नासामध्ये जावं तर, मुलीने कॉम्प्युटर इंजीनिअर व्हावं, पण मुलांनी माझ्या तोंडाला काळं फासलं. मला माझ्या मित्रमंडळीत, समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही.”

    “आता तुमचे कसे संबंध आहेत त्यांच्याशी?”

    “पूर्णपणे तुटले आहेत. मी त्यांना घरी येण्यास मनाई केली आहे. तेही मला कधी बोलवत नाहीत. त्यांची घरं, त्यांचे संसार मी अजून बघितलेले नाहीत.”

    “अरेरे!”

    मला आँफिसला जायचं असल्याने मी त्यांचा निरोप घेतला. पण संपूर्ण दिवसभर मी त्यांचाच विचार करत होतो.

    सरांशी परत भेट झाली तेव्हा मी त्यांना म्हटलं, “सर, तुमच्या मुलांनी तुमच्या ज्ञानाचा, बुद्धिमत्तेचा, अनुभवाचा काहीच उपयोग करून घेतला नाही. पण अशी अनेक मुलं आहेत की, ज्यांना या सर्वाची गरज आहे.”

    “म्हणजे? मी नाही समजलो!”

    “सर, अनेक गरीब मुलांना एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षा देण्याची इच्छा असते, पण एकतर चांगले कोचिंग क्लासेस नसतात आणि असले तरी त्यांची महागडी फी परवडणारी नसते. अशा मुलांना तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा नक्कीच फायदा होईल.”

    सरांचे डोळे चमकले. खूश होऊन ते म्हणाले “वा, छान कल्पना आहे. मी अशा मुलांना मोफत शिकवायला तयार आहे.”

    “नाही सर. मोफत शिकवलं तर त्यांना त्याची किंमत वाटणार नाही. अगदी नाममात्र शुल्क घेऊन तुम्ही शिकवू शकता”

    “चालेल. पण असे विद्यार्थी मिळणार कसे?”

    “सर, तुमची प्रसिद्धी करण्याचं आणि तुम्हाला विद्यार्थी मिळवून देण्याचं काम माझं.”

    “वा वा! मग तर फारच छान!”

    सरांचा चेहरा आनंदाने फुलून गेला. ते पाहून मी म्हणालो, “सर अजून एक! राग मानू नका, पण तुमची आयुष्याची आता फार वर्षं नाही राहिली. ही उरलेली वर्षं आनंदात का घालवू नये?”

    “हो बरोबर… पण मी काय करायला हवं?”

    “सर, तुमच्या मुलांच्या बाबतीतली वस्तुस्थिती तर, आपण टाळू नाही शकत! आपले संत म्हणून गेलेत ‘आलिया भोगासी असावे सादर’. मुलांबाबतीतले भोग तुम्ही भोगून चुकलात. झालं गेलं गंगेला मिळालं… आता नव्याने सुरुवात करायला हवी. मुला-मुलीला घरी बोलावून घ्या. नातवांशी खेळायचे, हेच तर तुमचे दिवस आहेत. नातवंडं मोठी व्हायच्या आत तो आनंद तुम्हाला घ्यायचा आहे.”

    नातवंडाच्या ओढीने सरांचे डोळे भरून आले… “तुम्ही म्हणताय ते मला कळतंय हो. पण ते वळणार कसं? त्या दोघांनी मला प्रचंड त्रास दिलाय. जीव नकोसा करून टाकलाय. आता मीच त्यांच्याकडे नाक घासत जायचं का?”

    “तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण ते तुम्हाला करायची गरजच नाही. तुमची परवानगी असेल तर, मी ते काम करायला तयार आहे.”

    सरांचा चेहरा उजळला… “अहो, परवानगीची काय गरज? तुम्ही आजोबा नातवंडांची भेट घालून देताय. त्याच्यासारखं पुण्याचं काम नाही.”

     त्यानंतरचा पूर्ण महिना धावपळीत गेला. सरांना मी वीस विद्यार्थी मिळवून दिले. त्यांच्या बंगल्यातच क्लासेस सुरू झाले. सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीने खूश होऊन त्या वीस विद्यार्थ्यांनी आणखी तीस विद्यार्थी आणले. क्लासची व्यवस्था लागल्यावर आता सरांच्या मुलांकडे बघायचं होतं. मी परभणीला सरांच्या मुलीकडे गेलो. वडिलांचं नाव काढल्यावर सुरुवातीला ती चिडली, पण मी तिला म्हणालो,

    “बघा ताई, मुलगी ही वडिलांची जास्तच लाडकी असते. तुम्हीही नक्कीच असाल. आपल्या या लाडक्या मुलीने चांगलं शिकावं, जमल्यास चांगली नोकरी करावी. एखाद्या चांगल्या घराण्यातल्या सुशिक्षित मुलाशी लग्न करून सुखात रहावं एवढीच माफक अपेक्षा बापाची असते. तुम्ही कॉम्प्युटर इंजीनिअर व्हावं, अशी तुमच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले. पण तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण न करता पळून जाऊन लग्न केलंत. त्यांच्या मनाला, त्यांच्या समाजातील प्रतिष्ठेला किती मोठा धक्का दिलात याचा जरा शांततेनं विचार करा. तरीही ते सर्व विसरुन तुम्हांला, तुमच्या मिस्टरांना बोलवताहेत, याचा अर्थ तुमच्यावर त्यांचं अजूनही खूप प्रेम आहे.”

    बराच वेळ समजावून सांगितल्यावर तिला आपली चूक समजली. आपण प्रेमात वेडे झालो होतो आणि त्या वेडात आपण चुकीचं वागलो, हे तिने मान्य केलं. आपलं माहेर आपल्याला परत मिळतंय, याचा आनंद झाला. पुढच्या महिन्यात सरांच्या वाढदिवसाला नवरा, मुलांना घेऊन जरूर येईन, असं तिने मला वचन दिलं.

    हेही वाचा – आभासीपेक्षा वास्तवातलं जग खूप सुंदर…

    त्यानंतर मी नंदूरबारला सरांच्या मुलाकडे गेलो. सरांचं निमंत्रण त्याने साफ नाकारलं. बापाचं तोंडही पाहायची इच्छा नाही, असं म्हणाला. त्याच्या बहिणीला जसं समजावलं तसं त्यालाही मी समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणालो, “बाकी सगळं जाऊ द्या. तुमच्या वडिलांनी सर्व कर्तव्यं व्यवस्थित पार पाडली. ते कुठं चुकले याचा तुम्ही शांततेत विचार केला तर, त्यांच्यापेक्षा तुमच्याच चुका आढळून येतील. तुम्ही त्यांची स्वप्नं पूर्ण केली नाहीत, हे ते विसरायला तयार आहेत. आता म्हातारपणी नातवंडांशी खेळायची त्यांची शेवटची इच्छा तर, पूर्ण करा.”

    तरीही तो ऐकेना. तेव्हा मी माझं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं…

    “बघा. तुम्ही येणार नाही, पण तुमची बहीण येणार आहे. ते पाहून कदाचित सर त्यांची करोडोंची संपत्ती तिच्या नावावर करून टाकतील किंवा तुमचा हिस्सा समाजसेवी संस्थांना दान करुन टाकतील. मग तुम्हाला हात चोळत रहाण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय शिल्लक रहाणार नाही. बघा विचार करा…” त्याच्या हुशार बायकोच्या ते लक्षात आलं असावं. तिने त्याला आतल्या रुममध्ये नेऊन समजावलं. शेवटी तोही तयार झाला. मला खूप आनंद झाला.

    सरांच्या विशेष निमंत्रणावरून मी त्यांच्या वाढदिवसाला गेलो. जंगी पार्टी होती. सरांची मुलगी आणि मुलगा सहकुटूंब हजर होते. उद्यानात सरांना हसणारे सगळे ज्येष्ठ नागरिक, सरांचे विद्यार्थीही उपस्थित होते. सर, खूप आनंदी आणि समाधानी दिसत होते. माझी सर्वांशी ओळख करून देताना सरांनी मला जवळ घेतलं. म्हटले, “हा माझा दुसरा मुलगा. याच्यामुळेच आयुष्य कसं जगावं, हे मी शिकलो. आजचा आनंदी दिवस याच्यामुळेच आपल्याला पहायला मिळतोय…”

    सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सरांनी मला मुलगा म्हंटल्याने सरांची बायको, मुलगा, मुलगी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पहायला लागले. त्यांच्या मनातले संशयाचे भाव ओळखून मी माइक हातात घेतला आणि म्हणालो, “घाबरु नका सरांच्या प्रॉपर्टीतला एक रुपयासुद्धा मी घेणार नाहीये…” हास्याचा एकच स्फोट झाला. मी पाहिलं सर आपले आनंदाश्रू पुसत होते.


    मोबाइल – 9209763049

    (ही कथा काल्पनिक असून माझ्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील आहे. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा.)


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026 ललित

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026 ललित

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    By मधुर सुनील कुलकर्णीApril 19, 2026

    पुण्याहून आलेलं, साठेकाकांचं पत्र मी वाचलं. अश्रूंनी पत्रातील अक्षरं धूसर व्हायला लागली. माझ्या हातातले पत्र…

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 271
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 389
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 562
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.