डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
जपानच्या ओसाकामधील एक श्रीमंत व्यापारी ‘काझुकी’ हा ढोबळ अर्थानं प्रचंड सुखी होता… घरात नोकरचाकरांची फौज होती, दारात टोयोटा, निसान, होंडा, इसुझू, सुझूकी अशा अत्याधुनिक गाड्यांचा ताफा होता… सगळी सुखं पायाशी लोळण घेत असतानाही रोजची व्यापारी स्पर्धा, कामाचा प्रचंड व्याप, धकाधकीचं जीवन यामुळं काझुकी नेहमी कुठंतरी अस्वस्थ असे!
एके दिवशी एका रूटिन व्यापारी बैठकीनंतर घरी जात असताना त्याला रस्त्यात अचानक त्याचा बालमित्र ‘हारुतो’ दिसला आणि त्यानं शोफरला त्वरित गाडी थांबावयला सांगितली. तो हारुतोला घेऊन घरी आला. बालपणीच्या गप्पा रंगल्या, आठवणी ताज्या झाल्या, खूप दिवसानंतर काझुकी इतका आनंदी दिसत होता…
हारुतो पेशानं शिक्षक होता अन् आपल्या कामात तो अतिशय समाधानी होता. त्याच्या वागण्या-बोलण्यात एक शांतपणा होता… डोळ्यात एक चमक होती… काझुकीचं वैभव बघूनही त्याचे डोळे अजिबात दिपले नव्हते.
हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!
काझुकीला ते जाणवलं. त्याला क्षणभर हारुतोचा हेवाही वाटला. त्यानं न रहावून याचं रहस्य विचारलं… हारुतोनं हसत खिशातून पेन काढत बाजूला ठेवलेल्या डायरीत काहीतरी लिहिलं. नंतर काझुकीने आग्रह करूनही ‘मी निघतो’ म्हणत तो पायीच बंगल्याच्या गेटबाहेर पडला…
सकाळी उठून काझुकीनं डायरी उघडून बघितलं, त्यात एक झेन मठाचा पत्ता लिहिला होता. अनेक दिवसांची मानसिक अस्वस्थता होती, त्यामुळं त्यानं कामाला सुटी घेत शोफरच्या हाती डायरीतलं पत्ता लिहिलेलं पान सोपवलं…
शहर सोडून ‘इकोमा’ पर्वतराजी पार करत गाडी कुरागारी नावाच्या एका छोट्याशा गावात पोहोचली… गाडीतून उतरताच काझुकीला जाणवलं गावाच्या हवेत एक वेगळाच थंडावा आणि झाडांना एक वेगळाच तजेला होता! इथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधानी मंद स्मित होतं…
हेही वाचा – विलोजब्रुकमधील वेदनांचे हुंकार
ते मठात पोहोचले पण झेनगुरू ‘शेंग्येन’ यांचं कालपासूनच मौनव्रत सुरू झालं होतं आणि ते ध्यानास निघाले होते… काझुकी थोडा खट्टू झाला पण शेंग्येन यांनी कागदावर काहीतरी लिहित तो कागद त्याच्याकडं सोपवला…
“काय हवं?” शेंग्येन यांनी दोनच शब्द लिहिले होते.
काझुकीनं खाली उत्तर लिहिलं, ”मला ‘शांती’ हवी.”
शेंग्येन यांनी कागद हातात घेत त्यावर दोन रेघा काढत कागद काझुकीकडं सोपवला… कागद बघून काझुकीचे डोळे पाणावले आणि काही न बोलता तो गाडीत जाऊन बसला. संपूर्ण प्रवासात कागद त्याच्या हातात होता… घरी येऊन त्यानं पहिल्या दिवसापासून झेनगुरूंच्या सल्ल्याचं पालन सुरू केलं आणि त्याला आयुष्यात जे हवं होतं ते आपसुक मिळालं…
झेनगुरू शेंग्येन यांनी फक्त कागदावर दोन रेघा काढत, काझुकीच्या उत्तरातले दोन शब्द खोडले होते ‘मला’ आणि ‘हवी’!
मी, मला, माझं आणि हे हवं, ते हवं… यातच काझुकीची ‘शांती’ हरवली होती…


