दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 डिसेंबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 29 अग्रहायण शके 1947; तिथि : अमावस्या 07:12; नक्षत्र : मूळ 25:21
- योग : गंड 16:16; करण : किंस्तुघ्न 20:13
- सूर्य : धनु; चंद्र : धनु; सूर्योदय : 07:05; सूर्यास्त : 18:04
- पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. कोणत्याही व्यक्ती, बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल. काही नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. जोडीदाराकडून समाधानकारक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नफा पाहून तुम्हाला आनंद होईल.
वृषभ – आजचा दिवस खूप धावपळीचा आणि दगदगीचा असेल. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागेल. या काळात पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. दृढनिश्चयी स्वभाव आज फायदेशीर ठरेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पैसे गुंतवायचे असतील तर ते काम आजच करा; भविष्यात चांगले फायदे मिळतील.
मिथुन – आधीच आजाराने ग्रस्त असाल तर, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सामाजिक कार्यात व्यत्यय येऊ शकतो. धार्मिकता आणि अध्यात्म याकडे तुमचा कल असेल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवे प्रस्ताव येऊ शकतात.
कर्क – आजचा दिवस भाग्याच्या दृष्टीने अनुकूल असेल. कठोर परिश्रमाचे समाधानकारक परिणाम मिळतील. मुलांवरचा विश्वास दृढ होईल. मामाच्या कुटुंबाकडून प्रेम आणि विशेष पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सुखसोयींवर खर्च कराल. तुमच्या प्रगतीमुळे विरोधकांचा हिरमोड होऊ शकतात. पालकांची विशेष काळजी घ्या; त्यांचे आशीर्वाद फायदेशीर ठरतील.
सिंह – आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. मानसिक अशांतता किंवा दुःख, उदासीनता मन अस्वस्थ करण्यास कारणीभूत ठरू शकते. पालकांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने, दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. सासरच्या लोकांकडून काही नाराजीची चिन्हे दिसू शकतात, बोलताना नियंत्रण ठेवा. डोळ्यांशी संबंधित एखाद्या समस्येवर उपचार सुरू होतील.
कन्या – निर्भयता आणि धैर्याची भावना प्रबळ असेल, ज्यामुळे कठीण कामे देखील सहजतेने पूर्ण करू शकाल. पालकांकडून पाठिंबा आणि प्रेम मिळेल. जोडीदाराला आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. अनावश्यक खर्च होऊ शकतो. इतरांसाठी मनापासून एखादे काम कराल, परंतु काहीजण याला स्वार्थ समजतील. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!
तुळ – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. अधिकार आणि संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. सेवेच्या भावनेने इतरांना मदत कराल. आज तुमचे गुरू किंवा मार्गदर्शक यांवर असणारा तुमचा विश्वास कायम ठेवा. नवीन उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
वृश्चिक – मन काहीसे अस्वस्थ आणि बेचैन असू शकते. व्यवसाय वाढवण्याचे प्रयत्न सुरुवातीला यशस्वी झाले नाहीत तरी, धीर सोडू नका. नोकरीच्या ठिकाणी हुशारी आणि संयमाने प्रतिस्पर्ध्यांचा डाव उलथून लावण्यात यशस्वी व्हाल. कोणतेही न्यायालयीन वाद किंवा सरकारी बाबी प्रलंबित असतील तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
धनु – शिक्षण, बुद्धिमत्तेत चमक दाखवाल. दान आणि परोपकाराची भावना प्रबळ असेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नशीब तुमच्या बाजूने असेल, आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. संध्याकाळी पोटाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे खाण्याच्या सवयींवर संयम ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर – एखादी मौल्यवान वस्तू भेट मिळण्याची शक्यता आहे. काही अनावश्यक खर्च येऊ शकतात, जे तुम्हाला करावेच लागतील. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. व्यवसायाची स्थिती आनंददायी असेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन गोष्टीत गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर त्याचा लाभ घ्या; भविष्यात त्यामुळे मोठा फायदा मिळेल.
कुंभ – आजचा दिवस नवीन योजना राबविण्यात किंवा एखाद्या शोधकार्यात जाईल. खर्च मर्यादित ठेवा, तुमच्या गरजांनुसार करा. कुटुंबातील एखाद्याकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे, म्हणून सावधगिरी बाळगा. आज भरपूर सांसारिक सुखसोयींचा लाभ आणि प्रियजनांचा पाठिंबा मिळेल. संध्याकाळी एखाद्या जवळच्या ठिकाणी फिरायला जाल, जे फायदेशीर ठरेल.
मीन – मुलांबद्दलच्या दीर्घकाळाच्या चिंता दूर होऊ शकतात. आनंदी स्वभावामुळे लोक तुमच्याशी संपर्क साधण्यास उत्सुक असतील. सामाजिक आदर मिळवल्याने तुमचे मनोबल वाढेल. रात्रीच्या वेळी, कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल. शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जातकांना विशेष यश मिळेल.
दिनविशेष
प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती
टीम अवांतर
प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 रोजी आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले येथे झाला. चिदंबरम, तामिळनाडू येथे त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. भरतनाट्यमच्या रीतसर शिक्षणाची सुरुवात करून देणाऱ्या आणि भरतनाट्यम नर्तिकांचा पोशाख कसा असावा, हेही ठरवणाऱ्या रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्रा’त यामिनी वयाच्या पाचव्या वर्षांपासून शिकल्या. अरंगेत्रम कधी झाले, याची नोंद नसली तरी, सतराव्या वर्षी म्हणजे 1957 साली त्यांचा पहिला कार्यक्रम प्रचंड गाजला.
यामिनी या भारतातील सर्वात लोकप्रिय भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून ओळखल्या जात होत्या. राष्ट्रपती भवनात सादरीकरणाची संधी वयाच्या 28 व्या वर्षी त्यांना मिळाली, त्याआधी त्यांनी स्वत:चे नृत्यशिक्षण वर्गही सुरू केले होते. पण भरतनाट्यममध्ये पारंगतता मिळवल्यानंतर त्या कुचिपुडी आणि ओडिसीसुद्धा शिकल्या. यापैकी कुचिपुडीचे कार्यक्रमही त्या करत.
हेही वाचा – होऊनही न झालेल्या लग्नाचे गूढ!
तालाची अंगभूत जाण, पद्यरचनेच्या आशयाला न्याय देणाऱ्या हालचाली आणि नृत्यशैलीचे व्याकरण पाळतानाही अभिव्यक्तीत वैविध्य आणणारा मुद्राभिनय… आणि या सर्व वैशिष्ट्यांपेक्षाही लक्षात राहत असत ते त्यांचे डोळे! त्यांना तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अस्थाना नर्तकी (निवासी नृत्यांगना) होण्याचा मान मिळाला होता.
यामिनी यांचे वडील संस्कृतचे जाणकार होते. संस्कृतच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी अर्थार्जनापेक्षाही, मुलीला ‘कृतीं’चे (नृत्य ज्या शब्दांआधारे होते ते गाणे) अर्थ समजावून सांगण्यास, नृत्यासाठी अपरिचित पद्यारचनांचा शोध घेण्यास केला. याचा एक परिणाम असा की, ‘यामिनी यांच्या नृत्याचे वैशिष्ट्य कृती आणि तालापासून सुरू होते’ असे समीक्षकांनी मान्य केले. पद्माश्री, पद्माभूषण आणि पद्माविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 3 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


