नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
येत्या 19 डिसेंबर 2025 ला माझा सिनेमा रीलीज होतोय, ‘आशा’… आशा रुग्णसेविकांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमा खूप छान झालाय. त्याचा प्रत्यय पण आलाय. हा चित्रपट महाराष्ट्र राज्य पुरस्काराचा मानकरी ठरलाय, तेही चार पुरस्कारांचा… उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट अभिनेत्री! देश-विदेशातल्या चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाने धम्माल उडवली. थिएटरमध्ये जाऊन बघा बरं हा सिनेमा सगळ्यांनी! Enjoy करा… तर, तुम्ही ओळखलं असेलच की, आजचा लेख ‘आशा’ सिनेमाशी जोडलेला आहे.
भर नवरात्रीमध्ये जळगाव-धुळ्यामध्ये आम्ही सिनेमाच शूटिंग करत होतो. रिंकू राजगुरू, खरंतर फार लहान वयात उगवलेली चांदणी (स्टार). बरेचदा अशी मुले अर्धी कच्ची असतात. जमिनीवर पाय टेकवतच नाहीत. तरंगत चालतात. त्यामुळे तस जरासं टेन्शनच होतं… ही आपल्याशी कशी वागेल? पण शिक्षक आई-वडिलांची मुलगी जमिनीवरच होती… आहे, घरचे संस्कार! तिच्याशी खूप छान मैत्री झाली. त्यामुळे सीन पण उत्तम होत गेले.
हेही वाचा – बारीक व्हायचंय? तर मग…
सगळी टीम उत्तम होती… वस्तुत: सगळी टीम माझ्यासाठी नवीन होती आणि मी त्यांच्यासाठी. पण असे कुठे जाणवलेच नाही. पटकन दोस्ती झाली सगळ्यांची एकमेकांशी. त्यामुळे काम छान होत गेलं. त्याचा रिझल्ट म्हणजे आमची ‘आशा’. निर्मात्याने आमची छान काळजी घेतली. उत्तम बडदास्त ठेवली. अगदी मी माझं काम आवरून मुंबईला निघणार म्हणून माझ्यासाठी खास पुरणपोळ्या बनवून घेतल्या. त्यांच्या पद्धतीने!
त्या पट्ट्यामध्ये कानबाई देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. कानबाई उत्सवाची पूजा घराच्या अंगणात केली जाते. तिथली घरं प्रशस्त आणि घरासमोरच अंगण सुद्धा मोठं! अशाच एका मोठ्या घराच्या अंगणात पूजेचा सेट लावला होता. दुपारपासून गडबड सुरू होती. संध्याकाळी सगळी माणसे जमायला लागली. शूटिंग सुरू झालं. देवपूजा, भजन, लोकनृत्य… खूप छान सुरू होत सगळं. खरंतर, त्या रात्रीतच तो सगळा सीन शूट करून संपवायचा होता. दुसऱ्या दिवशीसाठी दुसरे सीन प्लॅन झाले होते. शूटच्या मधे जरा वारं सुटलं होतं. वातावरण पावसाळी झालेलं… त्यामुळे जरा टेन्शनच आलं होतं. पण रात्रभरात सीन संपवायचा होता… दिग्दर्शक दीपक पाटील हिम्मतवान. रात्रीत शूट पूर्ण केलं.
हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!
आम्ही सगळे जण अर्धा तास दूर असलेल्या आमच्या हॉटेलवर पोहोचलो. गाडीतून उतरण्याआधी आजूबाजूला बघितलं, अरे देवा, इथे म्हणजे पावसाने धुमाकूळ घातला होता. भरमसाठ पाऊस पडून अर्धा फूट एवढ पाणी तुंबलं होतं. सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. आश्चर्य वाटलं… अर्ध्या तासाच्या अंतरावर हा एवढा पाऊस? अणि आम्ही कानबाई उत्सवाचं शूट शांतपणे करून घेतले! काय बरं म्हणायचं या सगळ्याला? खोटा खोटा का होईना, कानबाईच्या पूजेचा खेळ… हो, खेळच तर होता तो! तरीही त्यात त्या देवीच सत्व होतं. नाहीतर, त्या रात्रीत तो संपूर्ण सीन शूट होऊच शकला नसता. काय म्हणतात ते, देवाची करणी आणि नारळात पाणी…! तसंच काहीसं… पूजा नाही, पण आम्ही आमचं काम मनोभावे केलं आणि तिचा आशीर्वाद पाठीशी राहिला.
पावसातून तर आम्हाला वाचवलंच, पण चार-चार पुरस्कारही मिळवून दिले. म्हणून मित्र-मैत्रिणींनो 19 डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होतोय. चित्रपटगृहात जाऊन आवर्जून बघा…
आशा वर्कर्सना समर्पित असा हा सिनेमा… ‘आशा’!


