स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक बनविण्याच्या काही टीप्स पाहूयात –
- दोन-तीन घोसाळी (घोसावळी) उभी चिरून, किसून घ्यावीत. त्याच्या किसात मावतील (भिजतील) एवढे जाड पोहे घालावेत. साली घेऊ नयेत. पंधरा मिनिटांनी कढईत नेहमीप्रमाणे हिंग वापरून फोडणी करावी. ओल्या मिरच्यांचे तुकडे आणि भिजवलेले घोसावळी किस-पोहे घालून, नेहमीच्या कांदेपोह्याप्रमाणे परतवून खूप वाफ आणावी. कोथिंबीर, ओले खोबरे, आवडत असल्यास लिंबू पिळून गरमच खाण्यास द्यावेत. सुरेख पोपटी रंगाचे आणि वेगळ्या चवीचे पोहे होतात. याचप्रमाणे कोवळ्या दोडक्यांचेही पोहे करता येतात.
- झटपट केक तयार करायचा असेल तर लोणी फेसण्यात वेळ जातो. त्याऐवजी पाव किलो मैद्यासाठी एक वाटी लोणी, पाऊण कप दुधात घालून वितळवावे व मिक्सरमधून काढून घ्यावे. एक कप पिठीसाखर, दोन चमचे बेकिंग पावडर आणि तीन अंडी, एक चमचा इसेन्स असे बाकीचे प्रमाण घेऊन केक तयार करावा. केक पटकन आणि छान होतो.
- काही वेळा शिळ्या पोळ्या उरतात; पण त्याचा नवा पदार्थ तयार करायला वेळ नसतो. तेव्हा पोळ्या वाळवल्यानंतर मिक्सरमधून बारीक पूड करून डाळीच्या पिठात तिखट, मीठ, हळद, जिरेपूड घालून शेव करावी. छान खुसखुशीत होते. ही पोळीची पूड घातल्यास मोहन घालावे लागत नाही. दुसरे दिवशीच्या पोळ्यांच्या कणकेतही घालता येते. त्यामुळे पोळ्या मऊ होतात.
हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा
- अळुवड्या करण्यापूर्वी अळूची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावीत. थोड्या वेळाने ती चाळणीत काढून एका वर्तमानपत्रावर पालथी पसरावीत. प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चांगली चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे. असे केल्याने वडी अजिबात खाजत नाही.
- खरवसाच्या चिकामध्ये एखाद्या वेळी जास्त दूध पडते आणि खरवस घट्ट होत नाही. त्या वेळी ते दूध बासुंदीइतपत आटवावे आणि त्याचा कन्डेन्स मिल्कचा केक करतात त्याप्रमाणे केक करावा. फक्त कन्डेन्स मिल्कऐवजी हे आटविलेले दूध घालावे. सुंदर केक होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…
- इडली, डोशाच्या नारळाच्या चटणीसाठी खूप नारळ वापरण्याची अजिबात गरज नाही. थोड्याशा नारळाच्या चटणीत ताकात भिजवलेले ब्रेड स्लाइस (प्रमाण आवश्यकतेनुसार) घालून मिक्सरमधून काढल्यास भरपूर चटणी होते. ही चटणी अत्यंत चविष्ट लागते आणि त्यात ब्रेड आहेत, याचा कोणालाही पत्ता लागत नाही.
- फ्रीजमध्ये आइस्क्रीम करताना त्या मिश्रणात नेहमी अर्धी वाटी लोणी घालावे, आइस्क्रीम खूपच मऊ आणि चवदार होते.


