माधवी जोशी माहुलकर
उडदाची डाळ ही मधुमेहींना चालत नाही, असं म्हटलं जातं; त्यात जर ही डाळ वापरून ईडली करायची म्हटलं तर, तांदुळही याच्या जोडीला घ्यावे लागतात! त्याशिवाय, इडली कशी बरं तयार होणार? त्याकरिता मी इडलीचा एक पारंपरिक मुख्य घटक म्हणजे उडदाची डाळ बदलली आणि त्याऐवजी मूगडाळ आणि तांदूळ वापरून इडली केली… पचायला हलकी आणि सर्वांनाच आवडणारी!
साहित्य
- जाडे तांदूळ – 2 वाट्या
- मूगडाळ – 1 वाटी
- मेथी दाणा – अर्धा चमचा
- मीठ – चवीनुसार
- जाडे पोहे – अर्धी मूठ
हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!
कृती
- जाडे तांदूळ आणि मूगडाळ स्वच्छ धुऊन घ्या
- त्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा घालून भिजत ठेवावी.
- हे मिश्रण 7 – 8 तासांनी रवाळ वाटून घ्यावे.
- वाटताना त्यामध्ये अर्धी मूठ जाडे पोहेसुद्धा बारीक करून घ्यावे.
- नंतर चवीनुसार मीठ घालून हे इडलीचे बॅटर एखादा मिनिट हाताने चांगले फेटून घ्यावे.
- बॅटर फेटून झाल्यावर 10 मिनिटे तसेच झाकून ठेवावे.
- दहा मिनिटांनी इडलीपात्राला तेलाचा हात लावून सर्व इडलीपात्र तयार बॅटरने भरून घ्यावे.
- कुकरमध्ये स्टॅण्ड लावून पंधरा ते वीस मिनिटे इडल्या वाफवून घ्या.
- पंधरा मिनिटांनी दिसायला अतिशय सुंदर आणि सुबक तसेच चवीला भन्नाट, वाफाळलेल्या अशा मूगडाळीच्या पिवळ्या इडल्या पाहिल्यावर तुमची रसना चाळवणारच!
हेही वाचा – Recipe : खमंग शेगाव कचोरी
टिप्स
- लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायलाही मस्तपैकी नाश्ता तयार होतो.
- बॅटर 10 मिनिटांसाठी झाकून ठेवले असताना ओले खोबरे, दोन हिरव्या मिरच्या, मूठभर डाळे (चिवड्यात वापरतात), एक चमचा जिरं, मूठभर कोथिंबीर आणि दोन चमचे गोडं दही वापरून चटणी तयार करून घ्यावी. मोहरी, जिरं, कढीपत्ता, दोन सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा मूगडाळ आणि चिमुटभर हिंग घातलेल्या तेलाचा तडका या चटणीला द्यावा. हे चटणीचा स्वाद आणखी वाढवते.
कालावधी
- मूगडाळ आणि तांदूळ भिजवायला सात ते आठ तास
- प्रत्यक्ष इडल्यांसाठी साधारण एक तास
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


