भाग – 4
आज अखेर तो क्षण आला, ज्याची मी अधीरतेने वाट बघत होतो. रोहनने अखेर दादाचे पत्र वाचायला म्हणून ती पिशवी उघडली. वाचायला सुरुवात करायच्या आधी रोहन आबा, माईला म्हणाला, “बाबाच्या शेवटच्या काही दिवसांत जेवढं जमेल तेवढे तो बोलत गेला आणि मी टाईप करत गेलो. मधे मधे दमल्यावर तो थांबायचा…. उद्या करूया पूर्ण, म्हणून तो डोळे मिटून बसायचा… पण तो दमलेला नसायचा! आबा त्याला सुद्धा सगळं सांगताना खूप रडू यायचं. मग मीच त्याच्या कपाळावर हळूहळू थोपटायचो. थोडा वेळ शांततेत गेला की, तो सावरायचा आणि परत सांगायला सुरवात करायचा. जेव्हा जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सांगायला सुरुवात करायचा, तेव्हा तो काल सांगितलेले माझ्या तोंडून परत एकदा ऐकायचा आणि मगच पुढे सांगायला सुरू करायचा. खरंतर, मोठ्या मुश्किलीने तो शब्द उच्चारायचा. खूपदा त्याच्या कानाजवळ जाऊन मला लक्षपूर्वक ऐकायला लागे, तो काय म्हणतो ते! मी असं केल्यावर तो मंद हसण्याचा प्रयत्न करायचा. पण पुष्कळ वेळा त्याला तेवढा हसता सुद्धा यायचे नाही… पण शेवटपर्यंत न थकता, न कंटाळता तो बोलत गेला आणि मी टाईप करत गेलो. त्याच्यासाठी रोज मी लवकर यायचो, माझी कामं आटपून. आमच्या अवाढव्य बंगल्यातच त्याची खोली सगळ्या वैद्यकीय सुविधांनुसार आम्ही तयार करून घेतली होती. त्याच्या सेवेला डॉक्टर, नर्स आणि इतर मिळून किमान डझनभर माणसे चोवीस तास हजर असायची. शिवाय, बंगल्यातील नोकरचाकर होते ते वेगळेच! तेव्हा सगळं सुख बाबांच्या पायाशी लोळण घेत होतं, फक्त एक गोष्ट सोडून आणि ती म्हणजे त्याचे संपत चाललेले आयुष्य! पूजेच्या खोलीतील संगमरवरी गणपती बाप्पाकडे रोज मी बाबाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायचो… सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर. ”
हेही वाचा – नासका आंबा… अन् दादानं पहाटेच घर सोडलं!
“असो, आता पत्र वाचायला सुरवात करतो मी…” असं म्हणून अखेर रोहनने हातातील कागद उघडले वाचायला…
प्रिय आबा आणि माई,
तुम्हाला प्रिय म्हणायचा माझा अधिकार माझं पत्र वाचून पूर्ण होईस्तोवर तरी मला तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे माझी. कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये! माझा स्वतःचाच शेवट जवळ आला आहे, असे डॉक्टरांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले, तेव्हा सगळ्यात प्रथम तुम्ही दोघे माझ्या डोळ्यांसमोर आलात. वाटत होतं खूपदा की, आता तरी तुम्हाला येऊन भेटावे. पण मनाची अजून तयारी होत नव्हती. सारखं वाटायचे की, स्पेशल विमान करून मुंबईला यावं आणि तिथून मोटारीने थेट आपल्या घराच्या अंगणात उतरावं. तिथे उतरल्यावर तुमची नक्की काय प्रतिक्रिया असेल? माई येईल का आतून धावत मला ओवाळायला आणि माझी दृष्ट काढायला? आबा तुमच्या डोळ्यांतील माझ्याबद्दलचा राग तसाच असेल का अजून? का काळाच्या ओघात तो शांत झाला असेल? असे विचार आले खरे, पण तेव्हा खूप उशीर झाला होता, कारण डॉक्टरांनी मला सांगितले होतं की, मला एवढ्या लांबचा प्रवास बिल्कुल झेपणार नाही. मला तुम्हाला लॅपटॉपवर भेटायचे नव्हते, कारण त्या भेटीत स्पर्श, आपुलकी, माया, प्रेम काहीच नसते! माझ्याबाबतीत तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्नं कदाचित रोहन पूर्ण करू शकेल… कारण त्याला कोकणातील लाल मातीची ओढ खूप वर्षांपासून आहे. लहान असताना त्याने कितीतरी वेळा माझ्याकडे हट्ट केला होता, तिथे येण्याबद्दल. पण मलाच खात्री नव्हती की, तुम्ही माझं स्वागत कसं कराल? जर का तेव्हा काही वेडंवाकडं घडलं असतं तर, रोहनचे तुमच्या दोघांबद्दलचे मत क्षणांत बदलून गेले असते आणि तेच मला व्हायला नको होतं… कारण त्याच्या दृष्टीने मी त्याचं सर्वस्व होतो… ते का, ते या पत्रात पुढे येईलच.
अगदी सुरुवात करायची झाली तर, आपल्या गावच्या समुद्रात मोठे जहाज वादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत आले आणि थोडेसे कलंडून चिखलात रुतून बसले. तेव्हा अख्खा गाव ते जहाज बघायला गोळा झाले होते. मला तर समुद्राचे फार पूर्वीपासूनच आकर्षण होते. त्यात आणखी भर पडली ती ते मोठे जहाज बघून! काही दिवसांनी त्या जहाजावर माणसे दिसायला लागली. एकेक करत सर्वांना जहाजावरुन सुखरूप बाहेर काढले गेले. तेव्हाच मला भेटला जॉन, त्या जहाजाचा कप्तान! माझ्या चौकस बुद्धीने त्याला भुरळ पाडली. त्यानेच मग माझी आणि सोफियाची ओळख करून दिली. ते परदेशी लोक… त्यांचे वागणं मुक्त होते… अगदी हिंदी सिनेमातील नायिकेप्रमाणे. माझे वय तेव्हा अशा वळणावर होते की, सोफियाच्या प्रेमात मी कधी पडलो, ते माझे मलाच कळले नाही. हे प्रेम पुढे जाऊन यशस्वी होणार नाही याची खात्री असून देखील मी स्वतःला सावरू शकलो नाही. क्षणिक मोहापायी मी वाहवत गेलो आणि शेवटी त्याचे पर्यावसान मला घराबाहेर काढण्यात झाले. आबा तुम्हाला मी तेव्हा किती दुखावले असेल, याची जाणीव मला अमेरिकेत पोहोचल्यावर झाली. जेव्हा तो देश, तिथली माणसे आणि तिथले वातावरण सगळेच मला परके होते! राहून राहून तुमच्या दोघांची खूप आठवण यायची. पण माझ्या हट्टापायी मीच माझ्या परतीचे दोर कापून टाकले होते, हे मला प्रकर्षाने जाणवले… विशेषत: जेव्हा माझे आणि जॉनचे पहिल्यांदा जोरदार भांडण झाले होते, तेव्हा!
जॉनने त्याच्याच कंपनीमध्ये मला नोकरीला ठेऊन घेतले होते. माझा पासपोर्ट जॉनकडे ठेवायला दिला होता. तिकिटाचे पैसे सुद्धा माझ्याजवळ साठलेले नव्हते. माझा एकूण रागरंग बघून आणि मला शांत करण्यासाठी जॉनने माझे आणि सोफियाचे लग्न लावून दिले. आमचा संसार सुरू झाला खरा, पण त्यानंतर सोफियाचा खरा स्वभाव हळूहळू माझ्या लक्षात यायला लागला. पण तरीही मी सगळे सामोपचाराने घेत होतो, कारण माझ्यावर तुमच्या दोघांचे संस्कार होते. शिवाय, आपल्याकडे लग्न हे एक पवित्र नाते समजले जाते. पण अमेरिकेत मात्र तसे समजले जात नाही. सोफिया अतिशय लाडात वाढलेली मुलगी होती. तिच्या विचित्र वागण्याने जॉन आणि मारिया म्हणजे माझी सासू कंटाळून गेले होते…
पण म्हणतात ना प्रामाणिकपणे राहणाऱ्यांच्या पाठीशी देव नेहेमी असतो! माझ्याही बाबतीत असेच झाले. माझ्याकडे आमच्या ऑफिसचे खूप काम असायचे. पण तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी ते काम कमीतकमी वेळेत पूर्ण होण्यासाठी मी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापराचो. त्यामुळे माझ्या हाताखाली काम करणारे माझ्यावर खूश असायचे… त्यांना रोज वेळेवर घरी जायला मिळायला लागले होते. कमी वेळेत काम पूर्ण व्हायला लागल्यामुळे कंपनीचं व्यवस्थापन देखील खूश होते… त्यांना ओव्हरटाइम द्यायला लागायचा नाही.
आमच्या जहाजांवर लागणाऱ्या वस्तू एका मोठ्या सुपरमार्केटमधून यायच्या. त्या सुपर मार्केटचा मॅनेजर मला चांगलाच ओळखायला लागला होता. मी जॉनचा जावई आहे, हे त्याला एव्हाना कळले होते. माझी एकंदर काम करण्याची पद्धत त्याला आवडायची. त्यामुळे त्याची बिले लवकर पेमेंट करायला जायला लागली होती. त्या मॅनेजरने माझी माहिती त्याच्या मालकाला दिली. त्या मालकाने एक दिवस मला भेटायला बोलावले आणि माझ्यासमोर एक वेगळ्याच नोकरीचा प्रस्ताव ठेवला. त्याला नव्याने सुरू होणाऱ्या सुपरमार्केटसाठी एका हुशार मॅनेजरची आवश्यकता होती. त्याने त्यासाठी मला विचारणा केली. मी देखील जॉनच्या त्रासाला कंटाळलो होतो आणि शेवटी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन मी सुपरमार्केटच्या मॅनेजरची नोकरी स्वीकारली.
त्या दिवसापासून दिवरात्र काम करत मी माझ्या मालकांच्या गळ्यातील ताईत झालो. आमच्या सुपरमार्केटचा नफा प्रचंड वेगाने वाढू लागला. अमेरिकेत आमच्या सुपरमार्केट्चे नाव अग्रणी होते. काही वर्ष तिथे काढल्यावर मला मोठी स्वप्न पडायला लागली. एका भांडवल पुरवणाऱ्या कंपनीकडून आवश्यक ते भांडवल घेऊन मी माझे स्वतःचे एक सुपरमार्केट छोट्या प्रमाणात सुरू केले. त्यानंतर मात्र मी मागे वळून बघितलेलं नाही. पुढच्या दोन-चार वर्षांत मी खूप मोठी उडी घेतली आणि नंतर माझ्या सुपरमार्केट्ची एक मोठी चेनच अमेरिकेत उभारण्यात मी यशस्वी झालो. नंतर व्यवसाय वृद्धीसाठी मी काही युरोपीयन आणि आफ्रिकन देशात देखील सुपरमार्केट्ची चेन उभारली आणि तिथला पसारा देखील वाढतच चालला आहे.
हेही वाचा – नासका आंबा… रोहन घरी आला अन् त्याने धक्कादायक बातमी दिली!
आपल्या देशातून आणि इतर आशियायी देशातून अमेरिकेत नोकरीनिमित्त आलेल्या पुष्कळ गरीब तरुणांना मी माझ्या सुपरमार्केटमध्ये प्राधान्याने नोकऱ्या द्यायला लागलो, जेणेकरून ते अधिकाधिक पैसे आपापल्या घरी पाठवू शकतील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे राहणीमान उंचावेल. आबा या व्यवसायातून मी लाखो डॉलर कमवायला लागलो. अमेरिकेत वृद्ध लोकांचे प्रमाण खूप आहे. सरकार त्यांची काळजी घेत असले तरी, सरकारी प्रयत्न तोकडे पडतात. वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेली लहान मुले बघून माझा जीव कासावीस व्हायचा. अमेरिकेला कितीतरी सामाजिक प्रश्नांनी ग्रासले आहे, आजच्या घडीला. त्यात फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण वाटा उचलायला पाहिजे, असं मला सतत वाटत राहायचे. यातूनच पुढे जन्म झाला तो तुमच्या दोघांच्या नावातील एक एक अक्षर घेऊन मी सुरू केलेल्या ट्रस्टचा. त्याचे नाव आहे ‘आई ट्रस्ट’… आबा मधला ‘आ’ आणि माई मधला ‘ई’ शब्द… आज फक्त अमेरिकेतच नाही तर, इतर देशात देखील या ट्रस्टच्या नावाने लाखो करोडो डॉलर्सची मदत विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना दिली जाते. माझा व्यवसाय तर चौफेर वाढला; पण माझे सांसारिक जीवन मात्र विस्कळीत झाले. एके दिवशी मी आणि सोफियाने घटस्फोट घेतला. माझी मुलगी सोफियाकडे राहणार आणि माझा मुलगा रोहन माझ्याजवळ राहणार, अशी अट आम्ही मान्य केली. लग्नाच्या बेडीतून आणि जॉनच्या कटकटीतून मी स्वतःला कायमचे मुक्त केले. नंतर मात्र मी पुन्हा लग्न केले नाही. मी माझ्या व्यवसायात अधिक लक्ष घालायला लागलो. रोहन आणि मी एकमेकांच्या आधाराने जगायला सुरुवात केली ती आजपर्यंत! अगदी लाखात एक आहे तुमचा नातू…
का कोणास ठाऊक पण रोहनला समजायला लागल्यापासूनच कोकणाची ओढ होती! मला नाना तऱ्हेचे प्रश्न विचारून तो अगदी भंडावून सोडायचा. तिथे नेण्याविषयी हट्ट देखील करायचा. पण सोफियाचा याला विरोध होता. शिवाय, समजा मी रोहनला घेऊन तिथे आलो असतो कधी तर, आमचे स्वागत झाले असते का? याची मला खात्री नव्हती. म्हणून मी दरवेळी त्याची समजूत काढत गेलो. पण जसजसा तो मोठा होत गेला, तसतशी त्याने इंटरनेटवरून आपल्या गावाची माहिती मिळवली. पुढे व्यवसायानिमित्त त्याला अचानक संधी मिळाली महाराष्ट्र सरकारला भेटण्याची! त्या भेटीत त्याने उद्योगमंत्र्यांना भेटून कोकणातील आंबा, काजू आणि त्या फळापासून बनवलेल्या पदार्थांना अमेरिकेत मार्केट मिळून देण्याच्या दृष्टीने एक प्रस्ताव सादर केला. कोकणातील घरगुती आणि छोट्या व्यावसायिकांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी रोहन कायम प्रत्नशील होता. मंत्र्यांना रोहनचा प्रस्ताव आवडला; त्यामुळे आणखी काही महिन्यांनी तो परत मुंबईला आला मला न सांगता आणि सरकारी माध्यमातून एक पाहणी दौरा त्याने आखून घेतला. त्याच्याबरोबर स्थानिक पातळीवरचे शासकीय अधिकारी देखील होते. याच दौऱ्यात रोहन आपल्या गावात तर येऊन गेलाच, पण त्याने आपल्या वाडीला देखील भेट देऊन बहुतेक गणेशकडून आंबा आणि काजूबद्दल अधिक माहिती घेतली. त्याच दरम्यान आपल्या घराचे त्याने असंख्य व्हिडीओ देखील काढले. काही व्हिडीओमध्ये आबा आणि माई तुम्ही दोघे तर, काहीमध्ये गणेश आणि सुनंदा आहेत! आपल्या घराचे आत येऊन चित्रीकरण देखील रोहनने केले. अर्थात, हे सगळे मी आजारी पडल्यावर जेव्हा मला तुमच्या सगळ्यांची अधिकाधिक आठवण यायला लागली तेव्हा…! रोहनने हे सगळे व्हिडीओ दाखवून मला चकित केले. असा आहे तुमचा नातू… माझ्या आणि तुमच्या नकळत, आपली खरी ओळख आणि हेतू लपवत त्याने फक्त माझ्यासाठी ते व्हिडीओ काढले… चक्क आपल्या घरात येऊन!
आबा, रोहनला बहुतेक कोकणामध्येच वास्तव्य करायचे आहे, असे मला त्याच्या बोलण्यावरून वाटते. त्याचे निर्णय घ्यायला तो स्वतंत्र आहे. पण इथे अमेरिकेत एवढा अवाढव्य व्यवसाय सुरू आहे, त्याचे काय करायचे, हा निर्णय देखील त्यानेच घ्यायचा आहे. कारण, या सगळ्या व्यवसायात ट्रस्टचे भाग भांडवल सगळ्यात जास्त आहे आणि आई ट्रस्टचा मुख्य ट्रस्टी म्हणून मी नुकतीच रोहनची नेमणूक केली आहे.
आबा, त्या एका चुकीने तुमच्या नजरेतून मी कायमचा घसरलो. तुम्हाला आणि माईला परका झालो. पण रोहन तसा नाहीये. शेवटी आपल्या घराचा वंशज आहे तो. तुम्ही आणि माईने माझ्यावर केलेले संस्कार, तुमची शिकवण, घालून दिलेले आदर्श आणि सिद्धांत याच्या जोरावर मी अमेरिकेत भरभरून यश मिळवले. तेच संस्कार, शिकवण, आदर्श आणि सिद्धांत मी जमेल तेवढे रोहनच्या मनात रुजवायचा प्रामाणिक प्रयत्न केला आजवर… त्याच्या तिथल्या वास्तव्यात कदाचित त्यातले काही संस्कार तुमच्या लक्षात देखील आले असतील!
हेही वाचा – नासका आंबा… दादाच्या पत्राबद्दलची उत्सुकता आणखी वाढली!
रोहनने काढलेल्या व्हिडीओतून एक गोष्ट लक्षात आली माझ्या आणि ती ही की, आपल्या घराची कायमस्वरूपी डागडुजी करण्याची वेळ आली आहे. त्यासंदर्भात रोहनच्या मनात काही कल्पना आहेत. तो यथावकाश त्या तुमच्यासमोर मांडेल. शिवाय, आपल्या आळीतील प्रत्येकाच्या सोयीसाठी त्याच्या मनात काही कल्पना आहेत, ज्या त्याला अमलात आणायच्या आहेत. तो सविस्तरपणे त्याचे म्हणणे आळीतील प्रत्येकासमोर मांडेल. आपल्या गावातील आणि आसपासच्या गावातील आंब्याच्या तसेच काजूच्या पदार्थांना अमेरिकेत सुपरमार्केटच्या मदतीने चांगला भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने त्याने काही योजना आखल्या आहेत. सध्या त्या फक्त कागदावरच आहेत. पण गणेशच्या मदतीने त्याला त्या मार्गी लावायच्या आहेत.
आबा, खूप सारे कष्ट करून देखील पैशाच्या बाबतीत कोकणी माणूस मागे राहिला. रोहनला हे चित्र बदलून टाकायचे आहे. त्याशिवाय तुमच्या नावाने आपल्या गावात सर्वांना उपयोगी पडतील, अशा काही सुधारणा मला करण्याची इच्छा होती. माझी इच्छा आता रोहन पूर्ण करेल. याबाबतीत तुम्ही गावातील प्रतिष्ठित व्यक्तींशी बोलून नवीन कामांची यादी तयार करा. ज्यात हॉस्पिटल, वरिष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, मुलांना खेळायला विविध उपकरणांसहित उद्यान, गावच्या देवळाचा जीर्णोद्धार, गावातील शाळांना वाचनालय वाढवण्यासाठी आणि कॉम्पुटर घेण्यासाठी मदत… मला सहज विचार करताना या गोष्टी सुचल्या. पण आबा तुम्ही ही यादी कितीही वाढवू शकता. तुमचा शब्द अंतिम राहील. फक्त या सगळ्या कामांसाठी लागतील तेवढे पैसे रोहन तुम्हाला देईल. मी तशी सगळी व्यवस्था त्याच्याजवळ करून दिली आहे.
मला दुर्दैवाने एका असाध्य रोगाने घेरून टाकले आहे आणि माझे आयुष्य आता फार दिवसांचे उरलेले नाही. आबा जमलं तर मला माफ करा. पण पुढच्या जन्मी देवाने विचारले तर, मी माईच्याच पोटी जन्म घेईन! तुमच्यासारखे आई-वडील भेटणे यासाठी मी गेल्या जन्मी नक्कीच काहीतरी मोठे पुण्य केले असणार… यात तिळमात्र देखील शंकाच नाही. कदाचित रोहन हे पत्र वाचेल तेव्हा मी या जगात देखील नसेन!
आणखी काय लिहू? माईच्या हातचे खाऊन कैक वर्ष लोटली. पण तिच्या हातची चव मात्र परदेशी आल्यावर मी कसून शोधून देखील मला कुठेही सापडली नाही. माई मी गेल्यानंतर मात्र तू रोज वाडीत ताट ठेव. माझा आत्मा कुठेही असला तरी, तुझ्या हातचं खाण्यासाठी आपल्या घरात घुटमळेल.
आबा तुमच्या दृष्टीने मी नासका आंबा असेन देखील… पण तुम्ही आपल्या घराच्या पेटीतून बाहेर फेकलेल्या या नासक्या आंब्याच्या कोयीतून मात्र चांगलेच झाड उगवले. त्या झाडाने आपली मुळे सातासमुद्रापार नुसती नेलीच नाही तर, त्यातून आणखी कलमं तयार करून विविध देशात व्यावसायिक आंब्याच्या वाड्याच्या वाड्या तयार करण्यात यश मिळवले. आज त्या वाड्यांचा सर्वेसर्वा म्हणून तुमचा नातू सगळ्यांच्या नजरेसमोर एक आदर्श ठेऊन मोठ्या आत्मविश्वासाने उभा आहे. परदेशातील आंब्याच्या त्या सगळ्या वाड्यांच्या बरोबरच त्याला आंब्याच्या मूळ गावातील वाड्यांना देखील प्रगतीपथावर आणायचे आहे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने… आबा आपल्या वाडीत काम करणाऱ्यांना तुम्ही वारकरी म्हणायचात… आंब्याच्या पंढरीत कष्टाची दिंडी चालवत नेणारे वारकरी! आज आपल्या घरातील या परंपरेची दिंडी आधुनिक पोशाखात चालत नेण्यासाठी तुमचा नातू रोहन उत्सुक आहे. मला खात्री आहे ही जबाबदारी तुम्ही मोठ्या आनंदाने त्याच्या खांद्यावर सोपवायला तयार व्हाल.
तुम्हाला परत एकदा विनंती करतो, जमल्यास या तुमच्या नासक्या आंब्याला माफ करा. तरच माझा पुढचा प्रवास शांतपणे सुरू होईल…
तुमचाच विनायक
समाप्त


