भाग – 1
रोहनची इथे कोकणातील घरी यायची तारीख जवळ येत चालली होती, तसतशी मला आबांची काळजी जास्त वाटत होती. नुकत्याच एका मोठ्या आजारातून ते बरे झाले होते आणि आमचं घर हळूहळू पूर्वपदावर येत होते. एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याच्या सीझनला खरंतर इतकी धावपळ सुरू असते आमची… त्यात यंदा आबांची देखरेख आणि जातीने लक्ष देणं नव्हतं. मी खरं नकोच म्हणालो होतो आबांना, पण ते ऐकायला तयार नव्हते. कारणही तसेच होते…
इतक्या वर्षांची परंपरा खांद्यावर मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने पेलून घेतली होती त्यांनी. त्यात गेले कित्येक वर्षे गडीमाणसांना कायमच माणुसकी म्हणजे काय ते आबांनी दाखवून दिले होते. त्यामुळे वाडीतले आंबे खाली उतरवून घ्यायला आमच्या घराला गडीमाणसांची कधीच कमतरता जाणवली नाही. आबा नेहमी सांगत आले होते आम्हाला की, “आंब्यांच्या या पंढरपुरी हीच गडी माणसं वारकरी म्हणून येतात आणि तहानभूक विसरून कष्टाच्या गजरात कामं करतात. म्हणूनच सुखसमृद्धीच्या विठोबाचे दर्शन आणि आशीर्वाद आपल्या घराला कायम मिळाला आहे… ते शक्य झालं आहे या वारकऱ्यांमुळे! त्यामुळे त्यांची शेवटपर्यंत काळजी घेणं, ही या घराची पिढीजात परंपरा आहे. आजवर ही परंपरा डोळ्यांत तेल घालून इथवर मी आणली आहे, यापुढे तुम्हाला ती चालू ठेवायची आहे.”
खरंतर, ही परंपरा चालवायचा अधिकार दादाचा आहे. पण तो हा अधिकार गमावून बसला, त्याला आता कित्येक वर्षे झाली. इतकी वर्षे खरंतर दादाची काहीच खबरबात नव्हती. तो अमेरिकेत नक्की कुठे रहातो? काय करतो? याबद्दल काहीच संदर्भ सापडत नव्हते. साधारणपणे दहा वर्षांपूर्वी त्याची खुशाली रत्नागिरीमधील एका डॉक्टरांकडून कळली होती. डॉक्टरांचा निरोप घेऊन एक इसम आमचा पत्ता शोधत नेमका बाजारात मला भेटला होता… त्याच्याकडून दादाची खुशाली कळली होती. दादाला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे देखील कळले होते. दादाने त्याचा पत्ता किंवा फोन नंबर मात्र दिला नव्हता! याचा अर्थ घरच्यांबद्दल त्याच्या मनात अजूनही अढी होती आणि आम्ही कोणी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये, अशी त्याची इच्छा होती.
त्यानंतर माझ्या मनात काहीतरी गडबड सुरू आहे, हे माईने ओळखले. तिने आग्रहाने खोदून खोदून मला विचारले, तेव्हा एक दिवस रात्रीची निजानीज व्हायच्या आधी मागच्या परसात विहिरीजवळच्या कठड्यावर बसून हलक्या आवाजात मी दादाची खुशाली माईच्या कानावर घातली होती. माईच्या डबडबलेल्या डोळ्यांनी न बोलता मला बरंच काही सांगितले होते. यांच्याजवळ एक अवाक्षरही बोलू नकोस, असं तिने मला निक्षून सांगितले होते. तेव्हापासून आजतागायत मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती…
पण गेल्या महिन्यात माझ्या नावाने आलेल्या एका बंद पाकिटाने मात्र माझी झोप उडाली होती. सुदैवाने पोस्टमन आला तेव्हा मीच पुढच्या अंगणात काम करीत होतो. त्याने दिलेलं पाकीट बघून त्याक्षणी तरी काहीच उलगडा झाला नाही. पण दुपारी वामकुक्षी घेताना मात्र मी पाकीट उघडलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. आतमध्ये एका चिठ्ठीवर त्रोटक मजकूर लिहिलेला होता…
गणेश,
माझा मुलगा रोहन पुढच्या महिन्यात आपल्या घरी कोकणात येणार आहे. त्याच्यासोबत आबांच्या नावाने लिहिलेले एक पत्र आहे. बाकी काही गोष्टी रोहन स्वतःच सांगेल. आम्ही इथे मजेत आहोत. माझं म्हणशील तर सगळं संपत चाललं आहे. पण रोहन मात्र तिथे यायला खुप उत्सुक आहे. त्याच्याजवळ दिलेलं पत्र आबांना वाचून दाखव. ते ऐकून त्यांची प्रतिक्रिया काय असेल, मला माहीत नाही. पण प्लीज रोहनला सांभाळून घे. तो तिथे किती दिवस राहणार आहे, हे त्याच तोच ठरवणार आहे. तुझं सगळं छान सुरू असेल, अशी आशा आहे. आजकाल माईची खूप आठवण येते मला आणि जीव कासावीस होतो माझा!
वाटतं रे कधीतरी तिथे यावं. पण, आता खूप उशीर झाला आहे.
तुझा दादा
दादाचं पत्र वाचलं. त्याने खुशाली कळवली म्हणून बरं वाटलं. पण ते बरं वाटणं तेवढ्यापुरतेच होते, कारण पत्राचा शेवट वाचून मला दादाची काळजी वाटायला लागली. दादाने लिहिले होते ‘आता उशीर झाला आहे’ म्हणजे नेमकं काय ते कळत नव्हते! त्याची तब्येत तर ठीक असेल ना? का आणखी काही घटना घडली असेल.? काही कळायला मार्ग नव्हता. सगळ्या प्रश्नांची उत्तरे रोहन आल्यावरच मिळणार होती.
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
किती वर्ष झाली त्याला शेवटचं बघून. त्या दिवशी लाल बुंद झालेला त्याचा चेहरा अजूनही आठवतो. आबांबरोबर त्याचा झालेला वाद विकोपाला गेला होता. माईने तीन-चार वेळा तरी मधे पडून मध्यस्थी करायचा प्रयत्न केला; पण आबांनी तिला ते करून दिलं नाही. आबांना इतकं रागावलेले मी कधीच बघितले नव्हते. दुपारी जेवून वामकुक्षी घेणारे आमच्या शेतातील मजूर परसदारी त्यांच्यासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये उभे राहून घरात चाललेल्या मानापमानाच्या नाट्याचा कानोसा घेत होती. दुपारच्या कामासाठी आलेल्या सखुबाईचं अर्ध लक्ष भांडी घासण्याकडे तर अर्धे आत चाललेल्या खड्या आवाजाकडे होते. मी आणि कुसुम दिवाणखान्यालगतच्या खोलीत चिडीचूप बसून होतो. आबा आणि दादामधला वाद आता अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला होता. आबा घामाने भिजलेले होते. इतका वेळ आरामखुर्चीत बसून दादाला हरतऱ्हेने समजावून सांगणारे आणि अधूनमधून आवाज उंचावून दादाला उत्तर देणारे आबा आरामखुर्चीच्या दोन्ही हातांच्या फळीवर जोरात हात आपटून उभे राहिले आणि त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या दादाला उद्देशून ते म्हणाले,
“विनायक बस झालं आता तुझं बाजू मांडणं. आजवर गावातून आणि आपल्या आळीतून तुझ्याबद्दल आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे मी दुर्लक्ष केले, तेच माझे चुकले. प्रत्येक वेळी तुला समजावत गेलो. जरी तू चुकत होतास तरी जात्याच तू तसा मुलगा नाहीस, याची खात्री होती मला. मी आणि तुझ्या माईने तुम्हा तीनही मुलांवर केलेले संस्कार तुमच्या मनाला कधीच भरकटून देणार नाहीत, हे मला पक्कं माहीत होते. तुला कितीतरी वेळा, कितीतरी पद्धतीने मी समजावून सांगितले. प्रत्येक वेळी तू ‘यापुढे असं होणार नाही,’ म्हणून मला वचन देत गेलास. पण आज मात्र हद्द झाली. तू लाजलज्जेच्या सगळ्या मर्यादा ओलांडत आपली चूक कबूल न करण्याचे धारिष्ट्य मला दाखवलेस आणि माझ्या नजरेला नजर देत वाद घालायची हिंमत दाखवलीस! तेव्हा मी आता काय सांगतो ते नीट ऐक. माझा निर्णय झाला आहे. घरातील सगळ्यांनी तो नीट ऐकावा. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी तू हे घर सोडून कायमचं निघून जावेस. उद्यापासून या घरात तुला थारा नाही. उद्यापासून तुझे आणि आमच्या सगळ्यांचे मार्ग वेगळे आहेत. तुझं आयुष्य तुझ्या इच्छेनुसार जगायला तू मोकळा आहेस. उद्यापासून या माझ्या घरावर मुलगा म्हणून तुझा काहीही हक्क उरणार नाही. मी तशी कागदपत्रे करून घेईन साठे वकिलांकडून तुला सगळ्यांतून बेदखल करण्याबाबत.”
इतकं बोलून आबा आरामखुर्चीत कोसळले. स्वयंपाकघराच्या दाराआडून आबा आणि दादांचं बोलणं ऐकणारी माई आरडाओरडा करत बाहेर आली. तिचा आवाज ऐकून मी आणि कुसुम देखील बाहेर आलो.
माई पदराने वारा घालायचा प्रयत्न करत होती. “अहो काय होतंय तुम्हाला… गणेश जा बरं आतून पाण्याचा तांब्या भांडं घेऊन ये,” माईचा रडवेला सूर. हे सगळं बघून सुद्धा दादा पुढे न येता तरातरा आमच्या दोघांच्या खोलीत निघून गेला. त्याचं वागणं बघून मला दादाचा खूप राग आला होता तेव्हा. पण आबांच्या काळजीने मी काहीच करू शकलो नाही तेव्हा…
घोटभर पाणी प्यायल्यावर आबा शांत झाले. नंतर त्यांनी माईला, मला आणि कुसुमला सांगितले की, “तुम्ही सगळं ऐकलं आहेतच. माझा निर्णय झाला आहे, तो अंतिम आहे. त्यात आता बदल होणं शक्य नाही. विनायक उद्या जाईल, अशी अपेक्षा आहे. कोणीही त्याला अडवायचा प्रयत्न करायचा नाही, हे लक्षात ठेवा. मला आता जरा आडवं व्हायचं आहे… अहो, तुम्ही परसदारी थांबून राहिलेल्या मजुरांना उरलेले काम करण्यासाठी जायला सांगा, म्हणावं नाटकाचा प्रयोग संपला आहे.”
असं म्हणून आबा त्यांच्या खोलीत जायला निघाले. मी आणि कुसुमने त्यांच्या दोन्ही हाताला पकडून त्यांना आधार देत त्यांच्या खोलीमधल्या पलंगावर झोपायला मदत केली. आम्ही परत बाहेर येऊन बघतो तो काय माई देवघरातील भिंतीला डोकं टेकवून हुंदके देत होती. मी आणि कुसुम हे बघून घाबरून गेलो होतो. आम्हाला बघून माईने खुणेनेच तिच्याजवळ बसायला सांगितले आणि आमच्या मांडीवर तिच्या हाताने थोपटायला लागली.
“माई, आपला दादा कुठे जाईल आता?” कुसुमने भेदरलेल्या अवस्थेत माईला विचारले पण माईकडे त्याचे उत्तर नव्हते. उरलेला दिवस असाच शांतपणे गेला. रात्री माईने फक्त पिठलं-भात केले होते. दादाला मी चार वेळा जेवायला ये, म्हणून सांगून आलो. पण तो काही आला नाही. त्या दिवशी निजानीज थोडी लवकरच झाली. आबा, माईच्या खोलीचा दिवा मात्र उशिरापर्यंत सुरू होता.
हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?
पहाटे मला जाग आली तेव्हा बाजूला दादा नव्हता. मी लगोलग उठून घरभर त्याला शोधत हिंडलो. पार शेताच्या शेवटच्या बांधापर्यंत धापा टाकत पोहोचलो, पण निराश होऊन परत घरी आलो.
मला पाहताच माई म्हणाली, “तुझ्या दादाने आबांचा निर्णय मान्य करत पहाटेच आपल्या घराचा निरोप घेतला.”
हे ऐकून मी माईला घट्ट मिठी मारली आणि कालपासून डोळ्यांत निग्रहाने अडवून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
क्रमशः
टीप: माझ्या आवडत्या कथांपैकी ही एक कथा आहे. कोकणातील घरात घडलेल्या एका मोठ्या घटनेने घरातील सगळ्यांची आयुष्य क्षणांत बदलून गेली होती. दोन वर्षांपूर्वी कोकणातील माझ्या वास्तव्यात ही घटना मी ओझरती ऐकली होती. त्यात थोडी काल्पनिक भर टाकून ही कथा लिहिली आहे. भावनांच्या हेलकावे खाणाऱ्या त्या घराच्या होडीत तुमचा प्रवास अविस्मरणीय होईल ह्याची खात्री आहे मला.


