गजानन देवधर
सन 2005 सालचं कोकण मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरवायचं ठरलं. ठाण्याचे माजी खासदार आणि ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान हे प्रमुख भूमिकेत होते. संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध पत्रकार माधव गडकरी! एके दिवशी सतीश प्रधानांनी मला बोलावून विचारलं, “सर, संमेलनात तुम्ही सहभाग कसा घेऊ शकाल?”
मी क्षणभर गोंधळलो. मी साहित्यिक नाही, पण मराठी साहित्य वाचन मात्र मनापासून आणि भरपूर केलं होतं. लगेच विचार मनात आला – ‘माझा छंद छायाचित्रण, आणि हा साहित्यमहोत्सव… दोन्हींची सांगड घालता आली तर?’ मी प्रधानांना सांगितलं – “आपल्याला ‘साहित्यातील कोकण’ या विषयावर छायाचित्रांचं प्रदर्शन भरवता येईल.” कल्पना त्यांना आवडली. कोकणात प्रत्यक्ष फिरून फोटो काढावे लागतील आणि त्याला माझी तयारी आहे. कोकण मराठी परिषदेचा पदाधिकारी आणि आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक प्रदीप ढवळ याने माझी गाठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्याशी घालून दिली. कर्णिकांनी तर प्रदर्शनाची कल्पना नुसती उचलून धरली नाही तर, त्यांनी त्यांचा कोकणातला करुळचा पत्ता देत, “नक्की घरी या,” असं सांगितलं.
हातात होते फक्त अडीच-तीन महिने. ही प्रदर्शनाची कल्पना मी माझा माजी विद्यार्थी आणि फोटोग्राफीचा छंद असलेला उत्साही शशांक गुर्जर याला सांगितली आणि त्यालाही ती आवडली. त्याची नोकरी सांभाळून तोही कोकणात फिरायला तयार झाला. तसेच, आमच्या कॉलेजचे तरुण ग्रंथपाल, मूळ कोकणातले आणि तितकेच उत्साही महेश दळवी यांना बोलावलं. आम्ही तिघांची एक चांगली टीम तयार झाली. शनिवार-रविवार छायाचित्रणासाठी कोकण पिंजून काढायचं ठरलं.
हेही वाचा – असाधारण गाईड… इतिहासकार अन् वनस्पतिशास्त्रज्ञ!
योजना अशी — शुक्रवारी रात्री प्रवासाला निघायचं, शनिवार-रविवार फोटो काढायचे, रविवारी रात्री डोंबिवलीला परतायचं, आणि सोमवारी सकाळी कामावर हजर. कोकणात खूप छान अनुभव आले. आरवलीला साहित्यिक जयवंत दळवींच्या घरी गेलो. त्याचे पुतणे भेटले. छान गप्पा झाल्या. दळवींचं श्रद्धास्थान असलेल्या आरवलीच्या वेतोबाचं दर्शन घेतलं.
तेथून जवळच जिथे वि. स. खांडेकर रहायचे त्यांच्या घरातील ज्या खोलीत सलग नऊ दिवस बसून त्यांनी उल्का कादंबरी लिहिली ती खोली पाहिली, आरती प्रभूंच्या शाळेला भेट दिली, त्यांच्या खानावळीचे ठिकाण पाहिले, मधू मंगेश कर्णिकांच्या घरी पोह्यांचे आदरातिथ्य झाले. मुरुडला महर्षी धोंडो केशव कर्वेंचा पुतळा पाहिला. निसर्गाची विविध मनमोहक रुपं पहायला मिळाली. कोकणातली अनेक मंदिरं पाहिली, खाड्यामधून प्रवास केला. बर्यापैकी हवे तसे फोटो मिळाले.
गाडी माझी होती, ड्रायव्हिंगला शशांक, आणि माझ्या जवळच राहणारे कोकणप्रेमी श्री. कांदळगावकर यांनीही “मी तुमचा चक्रधर” म्हणत साथ दिली. हे सर्व आम्ही हौसेपोटी करत होतो. एका ट्रिपला आमच्या बरोबर डोंबिवलीचे इंजिनिअरींगचे प्राध्यापक समीर लेले हे त्यांची गाडी घेऊन आले होते. संमेलन समितीकडून काही पैसे मिळाले, उरलेला खर्च माझ्या पदरातून!
कोकण आमच्यासाठी एक वेगळंच जग होतं – सकाळचे सोनेरी समुद्रकिनारे, डोंगरांवरचं हिरवंगार आच्छादन, गावांच्या पायवाटा, कोकणी घरांचे उंबरठे, देवळांची शांतता आणि स्थानिकांच्या चेहऱ्यावरचं सहज हसू. प्रत्येक शनिवार-रविवार म्हणजे जणू एक नवीन अध्याय.
एक प्रसंग आजही आठवतो — 26 डिसेंबर 2004. आम्ही हर्णे बंदरावर छायाचित्रण करत होतो. समुद्र नेहमीसारखाच शांत भासत होता. रात्री साडेनऊला मुलाचा फोन आला — “बाबा, कारमधला रेडिओ लावा.” लावलाच, आणि तेव्हा कळलं — सुनामी आली आहे! आपल्याकडे फारसा परिणाम झाला नाही, पण समुद्राच्या पोटात चाललेली ती थरारक हालचाल आणि सुनामीची बातमी ऐकून अंगावर काटा आला…!!
छायाचित्रणाच्या दौऱ्यांमध्ये आम्ही अक्षरशः झपाटल्यासारखं काम केलं. कोकणातील निसर्गदृश्ये, समुद्रकिनारे, बाजारपेठा, उत्सव, लोकांचे हावभाव — सगळं कॅमेर्यात बंदिस्त होत होतं. आमचं काम पाहून पत्रकार दिलीप जोशी यांनी प्रत्येक फोटोला समर्पक अशी captions आवडीनं लिहून दिली, ज्यांचं भरभरून कौतुक झालं.
नंतर छायाचित्रं तयार करणं होतं. फोटो कार्ड पेपर्सवर लावले गेले, दररोज रात्री आमच्या घरी काम चालायचं. घरच्यांचंही प्रोत्साहन आणि मदत होती म्हणूनच सगळं शक्य झालं. तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर 120 निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन तयार झालं.
हेही वाचा – ग्वाल्हेर आणि जैसलमेरला भेटलेले असाधारण गाईड!
साहित्य संमेलनाच्या ठिकाणी – दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये – हे प्रदर्शन लावण्यात आलं. प्रदर्शनाचं उद्घाटन संमेलनाध्यक्ष माधव गडकरी यांच्या हस्ते झालं, तेव्हाही अनेक मान्यवर उपस्थित होते. 2 फूट बाय 24 फूट आकाराचा हर्णे बंदराचा फोटो तर लोकांच्या नजरा खिळवून ठेवणारा ठरला. हजारो नागरिकांनी आनंदाने फोटो पाहिले, चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, व्यवस्थापनातील मंडळी — सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं.
अनेक मान्यवर, कलाकार, साहित्यिक यांनी प्रदर्शनाला भेट दिली, अभिप्राय नोंदवले. त्यांचे अभिप्राय म्हणजे आमच्यासाठी बक्षीसच! लोकसत्ताचे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांनी काही निवडक फोटो मागवून घेतले आणि ते लोकसत्तात छापले. आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती.
हे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेताना आमच्या मनात फक्त एकच गोष्ट होती — कोकणाचे सौंदर्य, त्याचा निसर्ग, त्यातील लोक यांचं खरं रूप साहित्यातून जसं डोकावतं, तसंच छायाचित्रांतूनही लोकांपर्यंत पोहोचावं आणि खरंच, प्रेक्षकांच्या डोळ्यांतला आनंद बघून आम्हाला समाधान वाटलं.
या प्रदर्शनानंतर याच छायाचित्रांना आणखी एक संधी मिळाली. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील आंबा महोत्सवात सलग दोन वर्षे हे प्रदर्शन लावलं. त्यामुळे आणखी बऱ्याच लोकांपर्यंत कोकणाचा हा ‘साहित्यिक आणि छायाचित्रांचा संगम’ पोहोचला.
2005 ते 2010 या काळात आम्ही अशी तीन छायाचित्रांची प्रदर्शनं भरवली. प्रत्येक वेळी नवा विषय, नवे ठिकाण, आणि नवी मेहनत. पण या प्रदर्शनाची गोडी वेगळीच. कारण त्यातूनच आमचं ‘छंदातून साधलेलं समाधान’ हे तत्व खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळालं. आज त्या छायाचित्रांचा अल्बम मी उघडतो, तेव्हा प्रत्येक फोटोसोबत एखादी कथा जिवंत होते. पायवाटांवरून चालत गेलेली आमची पावलं, समुद्राच्या वाऱ्याने उडालेली केसांची बट, चहाच्या टपरीवरचे गरमागरम घोट, आणि कॅमेराच्या क्लिकसोबत मनात साठवलेले असंख्य क्षण… हे सगळं अजूनही ताजंच आहे. पैशाचा हिशेब, प्रवासाचा थकवा, वेळेचं गणित… हे सगळं त्या आठवणींच्या गोडीत विरघळून गेलं आहे. आयुष्यातल्या या प्रवासाने शिकवलं की, हौसेनं आणि मनापासून केलेलं काम हेच खरं स्मरणीय ठरतं, बाकी सगळं काळाच्या ओघात विरून जातं!
dscvpt@gmail.com / मोबाइल – 9820284859


