वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥9॥
तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेद विचित्रु । कल्पूं कैंचा ॥94॥ तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥95॥ मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी । काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ॥96॥ ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाची बुद्धि चराचरीं । होय साम्याची उजरी । निरंतर ॥97॥ जे ते विश्वाळंकाराचे विसुरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडले एकेंचि भांगारें । परब्रह्में ॥98॥ ऐसें जाणणें जें बरवें । ते फावलें तया आघवें । म्हणोनि आहाचवाहाचें न झकवे । येणें आकारचित्रें ॥99॥ घापे पटामाजीं दृष्टी । दिसे तंतूंचि सैंघ सृष्टी । परि तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ॥100॥ ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुद्धी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥101॥ जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासी ॥102॥ जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धितें विये । देखें स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥103॥ विपायें जरी आठवलें चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥104॥
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः । एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥10॥
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणऊनि आपणपया आपणचि रिपु, जेणें वाढविला हा संकल्पु…
अर्थ
हितचिंतक, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, अप्रिय, नातलग, त्याचप्रमाणे सज्जन, पापी या सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. ॥9॥
त्याच्या ठिकाणी हितचिंतक आणि शत्रू किंवा उदास आणि मित्र अशा तर्हेची वेगवेगळ्या वृत्तींची कल्पना कोठून करावी? ॥94॥ मीच विश्व आहे, अशी प्रतीती ज्यास आली आहे, त्याला नातलग कोण आणि कशाचा? आणि त्याला वैरी तरी कोण? ॥95॥ मग त्याच्या दृष्टीने अर्जुना, वाईट-चांगले असेल काय? परिसाच्या कसोटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय? ॥96॥ ती परिसाची कसोटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम सोनेच करते, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो. ॥97॥ कारण, विश्वातील प्राणीरूप अलंकारांचे समुदाय जरी निरनिराळ्या आकारांचे आहेत तरी, ते एक परब्रह्मरूप सोन्याचेच बनले आहेत. ॥98॥ असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले, म्हणून तो वरवरच्या या नानाप्रकारच्या आकारांनी फसत नाही. ॥99॥ वस्त्राच्या आत पाहिले तर, त्या वस्त्रामध्ये (जिकडे तिकडे अनेक) तंतूंचीच रचना दिसते, तरीही त्या वस्त्रात एका सुतावाचून दुसरी गोष्टच नाही. ॥100॥ अशा या तंतुपटन्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो आणि असा ज्याचा अनुभव आहे, तोच समबुद्धी होय, यात अन्यथा नाही, असे समज. ॥101॥ ज्याचे नाव तीर्थराज आहे आणि ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते, ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते ॥102॥ ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धीला उत्पन्न करते, पाहा, स्वर्गसुखादिक (देणे) ही ज्याला खेळ आहेत, ॥103॥ अशा पुरुषाच्या नावाचे मनात सहज जरी स्मरण केले तरी, तो आपली योग्यता देतो; ते राहू दे, त्याची स्तुती केल्यास लाभ होतो. ॥104॥
अंत:करण आणि देह यांचे संयमन करून, निरिच्छ बनून, (अद्वैतानुभवावर आल्यामुळे) एकाकी आणि अपरिग्रह झालेला योगी, एकांतात नेहेमी आत्मानुभवात तल्लीन असतो. ॥10॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें मेघौनि सुटती धारा, तिया न रुपती जैसिया सागरा…


