Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari :  देखें मेघौनि सुटती धारा, तिया न रुपती जैसिया सागरा…

Dnyaneshwari :  देखें मेघौनि सुटती धारा, तिया न रुपती जैसिया सागरा…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपीं ॥82॥ हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळो जाणें आकाशा । आना ठाया ॥83॥ तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥84॥ आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणी । इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानांचीं ।।85॥ जे जया वाटा सूर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व होये । तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणउनि ॥86॥ देखें मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैशीं शुभाशभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥87॥

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः । युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥8॥

जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विचारितां जाहला वावो । मग लागला जंव पाहो । तंव ज्ञान तें तोचि ॥88॥ आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैसी । दुजेनवीण ॥89॥  ऐसा शरीरीचि परि कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके । जेणें जिंतलीं एके । इंद्रियें गा ॥90॥ तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणें सानें थोर नेणिजे । कवणे काळीं ।।91॥ देखें सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ । आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ॥ 92॥ पाहता पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें । देखे दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥93॥

हेही वाचा – Dnyaneshwari : तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे, तुझें नवल ना हें बोलणें…

अर्थ

ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर, तेच शंभर नंबरी सोने होते, त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता, जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेच आहे. ॥82॥ (घट फुटून) हा घटाचा आकार नाहीसा झाला असता, त्यातील पोकळीस आकाशाला मिळण्याकरिता ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी जावे लगत नाही, ॥83॥ त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणासह नाहीसा झाला आहे, तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे ॥84॥ आता थंड आणि उष्ण असे प्रकार, किंवा हे सुख आणि हे दु:ख अशी निवड, तसेच हा मान आणि हा अपमान अशी समजूत, या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत. ॥85॥ कारण की, सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होते, ते त्य़ाचेच स्वरूप आहे. (वर सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत.) ॥86॥ पाहा, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात, त्या ज्याप्रमाणे समुद्राला बोचत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभें ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे, यास ती द्वंद्वे प्रतीत होत नाहीत. ॥87॥

ज्ञान आणि विज्ञान यांच्या योगाने (विज्ञानाच्या निरासात खाली राहिलेले जे ज्ञान, तद्रूपच बनल्याने) ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांच्या ठिकाणी ज्यांची दृष्टी समान आहे, जो (अशा गुणांनी) युक्त आहे, त्याला योगी म्हणतात. ॥8॥

अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगत् त्याचा विचार करता, ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले आणि मग आपण कोण आहो, असे जेव्हा तो पाहावयास लागला, तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत, असे त्यास कळले. ॥88॥ आता द्वैत नसल्यामुळे (मी) व्यापक आहे किंवा मर्यादित आहे, अशी वाटाघाट करण्याचे (त्याच्या ठिकाणी) सहजच थांबते. ॥89॥ अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत, तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. ॥90॥ तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे तसेच त्याला लहान-थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही. ॥91॥ पाहा, शुद्ध सोन्याचा मेरुपर्वताएवढा प्रचंड ढीग आणि मातीचे ढेकूळ (तो) सारखेच मानतो. ॥92॥ पाहावयास गेले तर, पृथ्वीची किंमत ज्यापुढे काही नाही, असे शुद्ध अमूल्य रत्न (पण तो ते) दगडासारखेच मानतो, असा तो निरिच्छ असतो. ॥93॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणऊनि आपणपया आपणचि रिपु, जेणें वाढविला हा संकल्पु…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!