माधवी जोशी माहुलकर
दिवाळीमुळे घरी मिठाईचे इतके बॉक्स गिफ्ट म्हणून येतात की, त्या मिठाया खाणेही होत नाही आणि टाकूनही द्याव्याशा वाटत नाहीत. इतरांना उचलून द्यायची म्हटले तरी ती मिठाई न्यायला कुणी तयार होत नाही. अशा वेळेस त्यांचं काय करावं, काही समजत नाही. काजूकतली, अंजीर बर्फी, संत्रा रोल, सोनपापडी किंवा बंगाली मिठाई खाऊन खाऊन किती खाणार? आता गोड पदार्थांकडे पहावेसही वाटतं नाही! पण काहीही असो बाहेरून विकत गोड पदार्थ आणण्यापेक्षा घरी केलेलं केव्हाही चांगलंच! अशाच प्रकारे, करायला अतिशय सोप्या अशा खवा पेढ्याच्या पोळीची रेसिपी पाहूयात.
साहित्य
- केशर पेढे – 10-12
- खवा – 50 ग्रॅम
- पिठीसाखर – अर्धी वाटी
- वेलची पावडर – चवीप्रमाणे
- मैदा – अर्धी वाटी
- कणिक – एक वाटी
- दोन ते चार टेबलस्पून तुपात गुलाबीसर भाजलेले बेसन (बाइडिंगकरिता)
हेही वाचा – Recipe : मोगरी घातलेले बेसनाचे लाडू!
कृती
- अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी कणिक छान मऊसर मळून तेलाचा हात लावून दहा मिनिटे झाकून ठेवा.
- मिक्सरमध्ये खवा, केशर पेढा क्रश करून घ्यावा म्हणजे तो एकजीव होईल.
- नंतर त्यामधे अर्धी वाटी पिठीसाखर आणि वेलची पावडर आणि तुपावर भाजलेले बेसन घालून छान गोळा करून घ्यावा.
- कणकेचा गोळा पुन्हा एकदा मळून घ्यावा आणि त्याचे छोटो छोटे गोळे करून घ्यावेत.
- या गोळ्यांची पातळ पारी लाटून त्यामधे पेढा आणि खव्याचे सारण भरून पातळ पण मऊसर पोळी लाटून घ्यावी.
- तव्यावर तूप लावत मंद आचेवर सोनेरी गुलाबीसर भाजून घ्यावी.
टीप
- ही पोळी इतकी सुंदर होते की, तोंडात टाकताच विरघळते, त्यामुळे तुमची ब्रम्हानंदी टाळी लागते.
- एवढ्या सारणात मध्यम आकाराच्या आठ ते दहा पोळ्या सहज होतात.
एकूण कालावधी – 30 ते 40 मिनिटे
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


