स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –
- लाल भोपळा, खरबूज आणि कलिंगड यांच्या बिया धुऊन, पुसून आणि वाळवून ठेवाव्यात. फावल्या वेळात बियांची सालं काढून सोलून ठेवाव्यात. त्यांचा पदार्थांच्या सजावटीसाठी उपयोग करता येतो. भोपळ्याच्या बियांचे बदामासारखे काप करावेत. खरबुजाच्या बियांची फुले करावीत. कलिंगडाच्या बिया खारवून त्या भाजल्या की छान लागतात.
- पुलावाचा कांदा तळताना अर्धा टी-स्पून साखर घालून परतावा, कुरकुरीत होतो.
- नारळाचे खोवलेले ओले खोबरे उरले तर उन्हात वाळवून ठेवावे आणि वापरण्याच्या वेळी त्या खोबऱ्यात थोडे पाणी घालून ओल्या खोबऱ्यासारखे वापरता येते.
हेही वाचा – Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी…
- सुके खोबरे किसायला त्रास होतो. अशा वेळी एक तास पाण्यात खोबरे भिजवून नंतर किसावे. किस पण चांगला पडतो आणि त्रासही होत नाही.
- छोटी छोटी पाच-सहा मातीची बोळकी किंवा मडकी आणून ठेवावीत. पाच-सहा कप दूध चांगले तापवून उकळवून घ्यावे. गार झाले की, त्यात पाच-सहा चमचे साखर आणि वेलदोडे किंवा जायफळाची थोडीशी पूड टाकून त्यात विरजण लावावे. विरजण टाकलेले दूध चांगले मिसळून बोळक्यात थोडे थोडे दही लावावे. मातीचे भांडे पाणी शोषून घेते. त्यामुळे दही घट्ट लागते. दही झाल्याबरोबर फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. हे थंडगार दही चवीला फार छान लागले. शिवाय, मुलांना आईस्क्रीम वगैरेऐवजी द्यायलाही पौष्टिक आणि प्रकृतीस हितकर असते. मुलांना प्रत्येकी एक बोळके दही आणि चमचा दिला की, ती खूश होतात. दही खाऊन झाल्यावर नवीन दही लावायच्या आधी बोळके गरम पाण्याने धुऊन आणि गॅसवर तापवून गार करून घ्यावे.
- लसूण सोलण्याचा कंटाळा येतो, वेळ लागतो. मग एवढेच करा. आपण कांद्याच्या गोल चकत्या कापतो त्याच पद्धतीने विळीवर जवळजवळ लसूण कापा. मंग हातावर नुसता चोळा व फुंकर घाला. साले गायब! मग लसूण फोडणीत वापरा, चटणी करा किंवा फ्रीजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून द्या.
हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस…
- मिठाची पुडी आणली की, मोठ्या निर्लेप पॅनवर किंवा कढईत ओतून कोरडेच गरम होईतो भाजावे. फरक लगेच जाणवतो, हाताला न चिकटता भुरभुरीत होते. एक-दीड मिनिट गॅसवर ठेवावे. मग गार झाले की, बरणीत भरावे. कोशिंबिरीत अशा मिठामुळे पाणी सुटत नाही. या मिठातील भाज्या शक्यतो आंबत नाहीत. लोणच्यात या मिठाचा वापर केला तर लोणचे लवकर मुरते. खार लवकर सुटतो आणि खराब होत नाही. पापडाला हे मीठ वापरले तर, पापडाला कीड लागत नाही.


