माधवी जोशी माहुलकर
आज खूप दिवसांनी हंडीतला मसूर पुलाव केला. कधी कधी घरी एकटं असलं की, माझ्या आवडी निवडीनुसार स्वयंपाक करत असते. रोजच्या रामरगाड्यातून वेळ काढावाच लागतो कधी कधी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, नाही का? मसूर पुलाव मला विशेष आवडतो. करायला सोपा आणि वन पॅाट मिल म्हणून बेस्ट आहे.
साहित्य
- बासमती तांदूळ – एक वाटी
- अख्खा मसूर – अर्धी वाटी
- काजू – आठ ते दहा
- हिरवी मिरची – 3 ते 4
- आले – 1 इंच (बारीक चिरून घ्यावे)
- लसूण पेस्ट – 1 चमचा
- मसाला वेलची – 2
- दालचिनी – 1 इंच
- तमालपत्र – 2
- काळीमिरी – 2 ते 4
- लवंग – 3 ते 4
- दगडफूल – 1
- जिरे – 2 चमचे
- धणे पावडर – 2 चमचे
- लाल मिरची पावडर – 1 चमचा
- हळद – 1 चमचा
- गोडा मसाला – 1 चमचा
- एव्हरेस्ट पुलाव मसाला – 2 चमचे
- मीठ – चवीनुसार
- मोठा कांदा – 1 (उभा चिरलेला)
- कोथिंबीर – मूठभर
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात
कृती
- अख्खे मसूर एक तास भिजवून ठेवावेत आणि नंतर पाणी काढून टाकावे.
- मातीच्या हंडीमध्ये एक पळीभर तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरे टाकावे.
- जिरे तडतडल्यावर एक चमचा हिंग त्यात टाकावा, नंतर त्यात एक तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, मसाला वेलची, काळीमिरी, लवंग, दगडफूल टाकावे.
- त्या नंतर उभा चिरलेला कांदा अर्धा टाकून तो गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची, आले लसणाची पेस्ट टाकावी.
- आले लसणाची पेस्ट थोडी परतल्यावर प्रत्येकी एक चमचा हळद, लाल तिखट, गोडा मसाला टाकून सर्व मसाले थोडे परतून घ्यावेत.
- आता यामध्ये थोडे पाणी टाकून मसाल्यांचा फ्लेवर येऊ द्यावा.
- त्यात भिजवलेले मसूर आणि दोन ते तीन वाट्या पाणी टाकावे.
- मसूर अर्धवट शिजेपर्यंत बासमती तांदूळ धुवून बाजूला ठेवावे.
- कांद्याचे काप आणि काजू तळून ठेवावेत.
- पाचेक मिनिटे मसूर अर्धवट शिजल्यावर त्यात बासमती तांदूळ टाकावेत आणि सर्व मिश्रण एकत्र करून त्यामध्ये पुन्हा दीड वाटी पाणी घालावे. (शक्यतो गरजेनुसार पाणी टाकावे) मसूर पुलाव मंद आचेवर शिजवून घ्यावा.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी
टीप्स
- साधारण दहा-बारा मिनिटांत हा पुलाव तयार झाला की, वरून दोन चमचे साजूक तूप सोडावे. नंतर अर्धे लिंबू पिळून लगेच झाकण ठेवावे. यामुळे साजूक तूप आणि लिंबाचा फ्लेवर भातामधे मस्तपैकी मिक्स होतो.
- हा मसूर पुलाव सर्व्ह करताना वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून पुदिना चटणी, दहीबुंदी रायते किंवा मठ्ठा यासोबत सर्व्ह करावा.
- पुदिन्याची मूठभर पाने, थोडी कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, चवीनुसार साखर आणि मीठ तसेच दही घालून चटणी तयार करून घ्यावी.
- पुलाव मातीच्या हंडीत केल्याने या मसूर पुलावाला एक वेगळाच सुगंध प्राप्त होतो.


