नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते…! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…
हल्ली वेगवेगळे डेज (days) आपण साजरे करतो… काही लोक म्हणतात, ‘नसती कौतुकं!’ मला मात्र हे असले सगळे डेज् साजरे करायला आवडतात…
असाच एके दिवशी माझ्या आयुष्यात ‘मदर्स डे’ आला. माझ्या लेकी म्हणाल्या, ‘आवडे (लाडात आल्या की, आईची ‘आवडी’, ‘आवडे’ होत असते!) आज आपण तुझ्यासाठी शॉपिंग करूयात.’ शॉपिंग म्हटलं की, मी नेहमीच खूश असते.
आम्ही तिघी निघालो… मॉलमध्ये गेलो… ‘Factory outlet’ जिथे 3500 ते 4000 रुपयांची जीन्स आम्हाला दीड हजार रुपयांना मिळाली. वेगवेगळ्या खूप जीन्स ट्राय केल्यानंतर मुलींना एक जीन्स परफेक्ट वाटली! काऊंटरवर गेलो, तशा लेकी म्हणाल्या, “हां, आई दे पैसे!”
मनात म्हटलं, ‘या दोन्ही लेकी माझ्या पैशानेच माझं शॉपिंग करणार आहेत का आज?’
हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!
जीन्स घेतली. मग बोरिवलीच्या आयसी कॉलनीमध्ये (IC colony) गेलो. तिथे अलीकडेच एक नवीन दुकान उघडल्यासारखं वाटलं. दुकानाला तोरण वगैरे… छानपैकी सजावट… गेलो आतमध्ये… 25 ते 30 टॉप्स पाहिले. एका टॉपवर दोघींचंही एकमत झालं… आणि “आई दे पैसे.”
आम्ही बाहेर पडलो. असेच बेली शूज आणि केक घेतला… पैसे मीच दिले. त्या दोघींनी एकेक गुलाबच फूल मात्र स्वतःच्या पैशाने विकत घेतलं!
घरी आलो. उशीर झालाच होता. मग काय जेवण बाहेरून मागवलं… “आई पैसे दे!” मी दिले पैसे. अशा तऱ्हेने माझा ‘मदर्स डे’ साजरा झाला!
मुली मुद्दामच अशा वागल्या, त्याचं कारणही त्यांनी सांगितलं… “आई तू स्वतःसाठी कधीच काही घेत नाहीस. सतत दुसऱ्यांचा विचार. No doubt तुझ्याकडे खूप साड्या आहेत. पण कुठे चांगल्या ठिकाणी जावं तर चांगले कपडे नाहीत. मग तू साडी नेसून जाणार. सगळीकडे काय तू साड्या नेसतेस. जरा सुटसुटीत पण राहत जा ना!”
हेही वाचा – ‘त्या’ राजस्थानी महिलांची ‘पॉवर बँक’!
मुली वयाने नाही तर विचाराने पण मोठ्या झाल्यायत… आईने बदलत्या जगात मागे पडू नये, असे जेव्हा तिच्या मुलांना वाटतं, तेव्हा सगळं भरून पावल्यासारखं वाटतं. बरं, मी काही ‘रांधा वाढा उष्टी काढा’वाली नव्हे. घर सांभाळून शूटिंग आणि थोडं सोशल वर्क करणारी बाई! पण खर्च करताना एक असा विचार येतोच ना की, 4 हजार, 5 हजार रुपयांची जीन्स घेण्यापेक्षा मस्तपैकी साड्या घेऊयात. मी जरा जास्तच साडीप्रेमी आहे.
पण मुलांच्या प्रेमळ हट्टापुढे काही चालत नाही! पण स्वतःपुरताच विचार न करता मुलं जेव्हा आपल्या आई-वडिलांचा पण विचार करतात ना तेव्हा आयुष्यच सार्थक झाल्यासारखे वाटतं…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


