डॉ. किशोर महाबळ
सर्व विद्यार्थी बुद्धीमान असतात, त्यांच्यात निसर्गदत्त अशा कोणत्या ना कोणत्या क्षमता, कौशल्ये असतातच, हे आपण मान्य केले आहे. आपल्याला विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा प्रकार, त्यांची कौशल्ये आणि क्षमता आपल्याला शोधून काढायच्या आहेत. शाळेतील सर्व उपक्रम सर्वांसाठी आयोजित करण्यातूनच हे शक्य होणार आहे. निवडक विद्यार्थ्यासाठी निवडक उपक्रम आणि काहीच विद्यार्थ्यांना वारंवार संधी देणे ही प्रचलित पद्धतच निकालात काढायला हवी आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना उपक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहनच न मिळाल्याने ते कधी भागच घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपल्या सुप्त क्षमता ओळखण्याची संधीच मिळत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व उपक्रम घ्यायला हवेत. या विविध उपक्रमांत भाग घेण्याने विद्यार्थ्यालाही आपल्या सुप्त क्षमता ओळखता येतील आणि शिक्षकांनाही हे उपयोगाचे ठरेल.
म्हणूनच जे विद्यार्थी आवडीने आणि नियमितपणे अभ्यास करतात अशांचा जाणीवपूर्वक शोध घ्यायला हवा. शाळेतील सर्वच विद्यार्थी अभ्यासू असले पाहिजेत आणि काही मूलभूत विषय त्यांनी नीट अभ्यासलेच पाहिजेत, असे आपल्याला वाटते. म्हणून अभ्यासू विद्यार्थ्यांचे कौतुक करायचे आणि त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, असा प्रयत्न आपण सुरू केला आहे. आपलेही नाव अभ्यासू विद्यार्थ्यांच्या यादीत असावे, अशी इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून सूचना फलकावर अभ्यासू विद्यार्थ्यांची नावेही लावली जावीत. हळूहळू अधिक विद्यार्थ्यांची नावे आपल्याला या यादीत लावावी लागतील, असा प्रयत्नही करायला हवा. तसेच विविध उपक्रमांद्वारे कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये भाषिक बुद्धिमत्ता आहे, हे शोधायला हवे.
सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते. प्रत्यक्षात ती स्पर्धा जे विद्यार्थी आपणहून भाग घेतात, त्यांच्यापुरतीच मर्यादित राहाते. कारण आत्मविश्वासाच्या अभावामुळे किंवा प्रोत्साहन न मिळाल्याने अनेक विद्यार्थी निबंध स्पर्धेत भागच घेत नाहीत. आपण मात्र ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करणार आहोत. या स्पर्धेची कोणतीही पूर्वसूचना आपण विद्यार्थ्यांना देणार नाही. प्रत्येक वर्गासाठी किंवा काही वर्गासाठी मिळून आपण एक विषय निश्चित करूया. निबंध स्पर्धेच्या विषयाची तसेच ती कोणत्या दिवशी होईल, याची कोणतीही कल्पना आपण विद्यार्थ्यांना आधी द्यायची नाही. दररोज भाषेचा तास असतोच. एका आठवड्यातील एका विशिष्ट दिवशी प्रत्येक वर्गातील भाषेच्या तासात शिक्षक वर्गात जातील. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एक एक कागद दिला जाईल. विद्यार्थ्यांनी खूप मोठा निबंध लिहिण्याची आपली अपेक्षाच नसेल. मात्र सर्वांनी निबंध लिहिलाच पाहिजे, अशी अपेक्षा असेल. वर्गात जाताच शिक्षक निबंधाचा विषय सर्व विद्यार्थ्याना सांगतील. त्या पूर्ण तासीकेत निबंध लिहिण्याचा उपक्रम होईल.
हेही वाचा – सर्वच विद्यार्थिनी अन् विद्यार्थी बुद्धीमान असतात…
निबंध लेखन शिकविणे हे भाषेच्या शिक्षणात अपेक्षितच असल्यामुळे हा उपक्रम घेणे हे अभ्यासक्रमाला पूरकच असेल. या पद्धतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना निबंध लेखनाची संधी मिळेल. ऐनवेळीस विषय दिल्याने विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, विचार करण्याची क्षमता, भाषेची जाण, अभ्यास, वाचन अशा असंख्य गोष्टी आपल्याला समजतील. शिवाय, विद्यार्थ्यांनाही आत्मपरीक्षण करण्याला आपण प्रेरित करणार आहोत. दिलेल्या विषयावर जर विद्यार्थ्याला काहीच लिहिता आले नाही तर, तो आपल्याला का लिहिता आले नाही, याचा साहजिकच विचार करू लागेल. ही गोष्टही त्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे. या उपक्रमासाठी शाळेच्या दैनंदिन वेळाव्यतिरिक्त कोणताही विशेष वेळ आपल्याला द्यावा लागणार नाही.
हेही वाचा – शिक्षक आणि प्रतिभेची ओळख
प्रत्येक वर्गाच्या भाषा शिक्षकानेच हे निबंध तपासून यातील चांगले निबंध कोणते आहेत, हे ठरवावे. यात फक्त तीनच निबंधांची निवड करण्याची पारंपरिक पद्धत न स्वीकारता जेवढे निबंध आशय, अभिव्यक्ति, विषयाचे आकलन या बाबतीत चांगले वाटतील, असे सर्व निबंध शिक्षकाने शोधावेत. संपूर्ण शाळेतील प्रत्येक वर्गातील चांगले निबंध लिहिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नावे प्रार्थनेच्या वेळी जाहीर करावीत आणि शाळेच्या सूचना फलकावर लावली जावीत. शिवाय, हे निबंध संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात वाचून दाखविण्यास प्रोत्साहन दिले तर अधिकच उत्तम. कोणत्या विद्यार्थ्याना चांगले लिहिता येते, हे आपल्याला या उपक्रमातून कळेल. या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर आपण लिहिण्यास प्रोत्साहन देत गेलो तर, या विद्यार्थ्यांमधील बौद्धीक क्षमता विकसित करण्यात आपण मोलाची मदत करू शकू.
(‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण!’ पुस्तकातून साभार)


